आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-कायद्याचा आदर करा, सुरक्षित रहा अन् जबाबदार नागरिक बना!

पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-कायद्याचा आदर करा, सुरक्षित रहा अन् जबाबदार नागरिक बना!

ज्ञानदीप स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थी, खेळाडूंचा गौरव; विद्यार्थी परिषद पदग्रहण सोहळाही उत्साहात.

वाई, दि. २१ : विद्यार्थ्यांनी कायद्याचे पालन करून शिस्त, सुरक्षितता आणि सामाजिक जबाबदारी जपत उत्तम नागरिक बनावे, असे आवाहन वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी केले.
ज्ञानदीप स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वाई येथे गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा पारितोषिक वितरण समारंभ तसेच विद्यार्थी परिषद पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना कायदा व सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले.
अल्पवयीन विद्यार्थ्यांनी वाहन चालवू नये. वाहन चालवल्यामुळे स्वतःच्या तसेच इतरांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय अशा प्रकरणात पालकांवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करून दिली.
छेडछाड, धमकी किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास तो लपवून न ठेवता तातडीने पालक, शिक्षक किंवा पोलिसांना माहिती द्यावी. अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये तसेच संकटाच्या प्रसंगी तातडीने पोलीस किंवा संबंधित हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात शासकीय शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थी, विश्वकोश ज्ञानवर्धन राज्यस्तरीय स्पर्धेत प्राविण्य मिळविणारे विद्यार्थी तसेच विविध क्रीडा प्रकारांत राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी नवीन विद्यार्थी परिषदेचा पदग्रहण समारंभही उत्साहात पार पडला. नवनियुक्त विद्यार्थी प्रतिनिधींना प्राचार्या शुभांगी पवार यांनी पदाची शपथ दिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास विद्यावर्धिनी संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त दिलीप चव्हाण, प्रा. दत्तात्रय वाघचवरे, ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर, प्राचार्या शुभांगी पवार आदी मान्यवर उपस्थित होते. विश्वस्त प्रा. दत्तात्रय वाघचवरे तसेच विद्यार्थ्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन लेंभे, शिला खाडे, अस्मिता भोसले, अर्चना जाधव, आरती भापकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
कु. श्रेया पोरे या शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थीनीचा सत्कार करताना पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी. शेजारी प्राचार्या शुभांगी पवार, प्रा. दत्तात्रय वाघचवरे, ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर व दिलीप चव्हाण.

2) वाई:-बिबट्याचा धुमाकूळ अन् वनविभाग सुस्त? पिराचीवाडीत कालवडीचा बळी!

शेळीनंतर कालवड फस्त; ग्रामस्थ संतप्त, वनविभागाला आंदोलनाचा इशारा.

सातारा | वाई, दि. २१ : वाई तालुक्यातील पिराचीवाडी-वेरुळी परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावराने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांतच पशुधनावर झालेल्या दोन हल्ल्यांमुळे बिबट्याची दहशत अधिकच गडद झाली आहे. पिराचीवाडी येथे संजय विष्णू मांढरे यांच्या मालकीच्या खिलार जातीच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून तिचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली.

रात्रीच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यानंतर सकाळी कालवड मृतावस्थेत आढळून आली. या घटनेने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली. यापूर्वी वेरुळी येथील जगन्नाथ पवार यांच्या शेळीवरही बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले होते. त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे स्पष्ट होत असून, पशुपालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणे, जनावरांची देखभाल करणे आणि गोठ्याजवळ वावर करणे शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. पशुधनाच्या सुरक्षेसाठी रात्रभर जागरण करण्याची वेळ पशुपालकांवर आली आहे.

दरम्यान, बिबट्याच्या बंदोबस्तासाठी वनविभागाला वारंवार माहिती देऊनही ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बिबट्याचा माग काढण्यासाठी गस्त वाढवावी, पिंजरा लावावा आणि संभाव्य हल्ले रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

“शेळी गेली, आता कालवडही गेली; उद्या एखाद्या माणसावर हल्ला झाल्यावरच वनविभाग जागा होणार का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

बिबट्याचा तातडीने बंदोबस्त न झाल्यास वनविभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा तसेच संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पिराचीवाडी-वेरुळी परिसरातील वाढत्या बिबट्याच्या दहशतीकडे प्रशासनाने आता गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

चौकट : ‘आता माणसाच्या जीवाची वाट पाहताय का?’

“पिराचीवाडी-वेरुळी परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. आधी शेळीचा बळी गेला आणि आता खिलार कालवड फस्त झाली. वारंवार माहिती देऊनही वनविभागाकडून ठोस उपाययोजना होत नाहीत. प्रशासनाने वेळीच दखल घेतली नाही तर एखाद्या नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल.”

— युवराज कोंढाळकर, सामाजिक कार्यकर्ते

3) वाई:-‘विश्वकोश’च्या राज्यस्तरीय स्पर्धेत द्रविड हायस्कूलची ज्ञानभरारी!

सातारा |
वाई, दि. २१ : महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीने आयोजित ‘विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धा २०२६’ मध्ये वाईच्या द्रविड हायस्कूलने दमदार कामगिरी करत राज्यस्तरावर आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. विद्यालयातील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. विरजा विद्या विजयकुमार साळी हिने राज्यस्तरावर चौथा क्रमांक पटकावत घवघवीत यश संपादन केले.
विरजाच्या या यशामुळे द्रविड हायस्कूलच्या शैक्षणिक शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांमधून झालेल्या या स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवणे ही विद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
ठाणे येथील गडकरी रंगायतन सभागृहात झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते विरजा साळी हिचा सन्मान करण्यात आला. यावेळी तिला ७ हजार ५०० रुपयांचे रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या उल्लेखनीय यशामागे विरजाची अभ्यासातील मेहनत, ज्ञानाची आवड आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तिला मराठी विभागप्रमुख उमाकांत कोळी आणि वैशाली हिरवे यांचे मार्गदर्शन लाभले.
विरजा साळी ही वाईतील ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर व वाई तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालिका सौ. आशा मर्ढेकर यांची नात आहे.
दरम्यान, विरजाच्या या राज्यस्तरीय यशाबद्दल ना. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, नगराध्यक्ष अनिल सावंत, विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे, माजी नगरसेवक चरण गायकवाड, शालेय समितीचे अध्यक्ष नितीन पोरे, मुख्याध्यापक दत्तात्रय भोसले, उपमुख्याध्यापिका सौ. नेत्रा मुळे, पर्यवेक्षक घनश्याम नवले, डॉ. विजय मर्ढेकर, सौ. शकुंतला साळी, सौ. रिद्धी तुषार जंत्रे यांच्यासह सर्व शिक्षक, पालक व हितचिंतकांनी विरजाचे अभिनंदन केले.
ज्ञान, मेहनत आणि गुणवत्तेच्या जोरावर राज्यस्तरावर झेंडा रोवणाऱ्या विरजा साळीच्या यशाने द्रविड हायस्कूलच्या शैक्षणिक परंपरेला नवी झळाळी मिळाली आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button