सातारा:-बिबट्याच्या दहशतीला आता लगाम घाला! जयच्या मृत्यूवर उदयनराजे आक्रमक.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा:-बिबट्याच्या दहशतीला आता लगाम घाला! जयच्या मृत्यूवर उदयनराजे आक्रमक.

‘आश्वासन नको, ठोस कारवाई हवी’; सोमवारी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक — नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाला स्पष्ट निर्देश.
सातारा | दि. ५ : न्हाळेवाडी (ता. सातारा) येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्या जयचा झालेला दुर्दैवी मृत्यू संपूर्ण सातारा जिल्ह्याला हादरवून गेला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बिबट्याच्या वाढत्या वावराला आळा घालण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत “आता केवळ आश्वासने नकोत; नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रत्यक्ष आणि ठोस कार्यवाही झालीच पाहिजे,” असा स्पष्ट इशारा प्रशासनाला दिला.
जयच्या मृत्यूने मन हेलावल्याचे सांगत उदयनराजे यांनी त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. “चिमुकल्या जयला गमावण्याचे दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. या दुःखाच्या प्रसंगी जयच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. कुटुंबाला आवश्यक ती सर्व प्रशासकीय व वैयक्तिक मदत केली जाईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
ग्रामस्थांचा संताप उदयनराजेंसमोर
न्हाळेवाडी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उदयनराजे यांची भेट घेऊन बिबट्याच्या सततच्या वावरामुळे निर्माण झालेली दहशत, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि प्रशासनाकडून अपेक्षित उपाययोजनांबाबतच्या मागण्या मांडल्या.
ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उदयनराजे यांनी वन विभाग, पोलीस, महावितरण आणि अन्य संबंधित यंत्रणांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
‘कागदावरच्या उपाययोजना नकोत, परिणाम दिसला पाहिजे!’
“एका निष्पाप मुलाचा जीव गेला आहे. आता केवळ बैठका, आश्वासने आणि कागदोपत्री कार्यवाही करून चालणार नाही. नागरिकांना प्रत्यक्ष सुरक्षितता जाणवली पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका उदयनराजे यांनी मांडली.
बिबट्याचा बंदोबस्त, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय आणि संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय याबाबत तातडीने निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
सोमवारी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक
या घटनेची गंभीर दखल घेत उदयनराजे यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्याशी संपर्क साधला असून, सोमवारी सर्व संबंधित प्रशासकीय व वन विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या बैठकीला ग्रामस्थांसोबत स्वतः उपस्थित राहून त्यांच्या अडचणी, मागण्या आणि सुरक्षेचा प्रश्न प्रशासनासमोर मांडणार असल्याचे उदयनराजे यांनी स्पष्ट केले.
गरज पडल्यास राज्य-केंद्र सरकारकडेही पाठपुरावा
नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे न्हाळेवाडी आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेपर्यंत आवश्यक उपाययोजनांसाठी पाठपुरावा सुरूच ठेवणार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
गरज भासल्यास राज्य तसेच केंद्र सरकारमधील संबंधित मंत्र्यांशी संपर्क साधून आवश्यक मदत आणि उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
“जयच्या कुटुंबाचे दुःख केवळ शब्दांनी कमी होणार नाही. सहवेदना व्यक्त करून थांबणार नाही; जयच्या कुटुंबाच्या न्याय्य मागण्या आणि परिसरातील नागरिकांची सुरक्षितता यासाठी शेवटपर्यंत खंबीरपणे उभे राहू,” असा निर्धार उदयनराजे यांनी व्यक्त केला.
2) वाई:-श्रमदानाची ताकद दाखवली; बदेवाडीत चार तासांत उभारला वनराई बंधारा!

ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका-मदतनीस आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग; जलसंधारणातून जलसमृद्धीचा निर्धार.
सातारा | वाई, दि. ०५ :
एकजुटीने केलेले श्रमदान आणि लोकसहभागाची साथ मिळाली, तर मोठे कामही काही तासांत पूर्ण होऊ शकते, याचा प्रेरणादायी प्रत्यय बदेवाडी येथे आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व सेवा संकल्प अभियानांतर्गत टंचाई निवारणासाठी भुईंज ग्रामपंचायतीने लोकसहभागातून अवघ्या चार तासांत वनराई बंधारा उभारून जलसंधारणाचा आदर्श निर्माण केला.
वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका-मदतनीस आणि ग्रामस्थांनी प्रत्यक्ष श्रमदानात सहभागी होत बंधारा उभारणीचे काम वेगाने पूर्ण केले.
यावेळी विस्तार अधिकारी शरद गायकवाड, ग्रामविकास अधिकारी मल्हारी शेळके, ग्रामपंचायत सदस्य गजानन भोसले, सनी शेवते यांच्यासह ग्रामपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी, अंगणवाडी सेविका-मदतनीस आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईला प्रभावीपणे सामोरे जाणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा… जलसमृद्ध भुईंज घडवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे जलसंधारणाचे काम हाती घेतले.
अवघ्या चार तासांत वनराई बंधारा पूर्ण झाल्याने लोकसहभाग, श्रमदान आणि प्रशासनाची इच्छाशक्ती यांची सांगड घातल्यास जलसंधारणाची कामे गतिमान होऊ शकतात, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले आहे.
या बंधाऱ्यामुळे बदेवाडी परिसरातील पावसाचे पाणी अडवून ते जमिनीत मुरण्यास मदत होणार असून, परिसरातील भूजलसाठा वाढण्यास हातभार लागणार आहे. त्याचा आगामी शेती हंगामातही फायदा होण्याची अपेक्षा आहे.
श्रमदानातून जलसंधारण आणि जलसंधारणातून जलसमृद्धी, असा सकारात्मक संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
3) कराड:- प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार एसटी सेवा देण्याच्या दृष्टीने कराड आगाराच्या ताफ्यात आणखी पाच नव्या ‘जिजाऊ’ बस दाखल.

आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ यांच्या हस्ते या बसचे लोकार्पण करण्यात आले. नव्या बसच्या आगमनामुळे कराड तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, आगाराच्या ताफ्यातील एकूण बससंख्या आता ९२ वर पोहोचली आहे.
कराड आगाराला दोन महिन्यांपूर्वी पाच जिजाऊ बस प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा पाच बस दाखल झाल्याने अवघ्या दोन महिन्यांत आगाराच्या ताफ्यात दहा नव्या बसची भर पडली आहे. यामुळे यापूर्वी ८२ असलेली बससंख्या आता ९२ झाली आहे.
लोकार्पणानंतर नव्याने दाखल झालेल्या पाचही बसची बसस्थानक ते एसजीएम कॉलेजमार्गे बनवडी फाटा अशी फेरी काढण्यात आली. या माध्यमातून नागरिक आणि प्रवाशांना नव्या बसमधील सुविधांचा अनुभव घेता आला. आधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या बसमुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.
या वेळी वाहतूक निरीक्षक नितेश पवार, शर्वरी पवार, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक सुरेंद्र जगदाळे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अनिल लटके, सुरज पाटील, अमित कोळी, जगन्नाथ शिंदे, शुभांगी जमदार, सुरेखा साळुंखे, पुनम कुंभार, महाराष्ट्र एस.टी. कामगार संघटनेचे कराड आगार सचिव अहमद तांबोळी यांच्यासह चालक, वाहक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, कराड हा मोठा तालुका असून ग्रामीण भागातील हजारो प्रवासी आजही एसटी सेवेवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. प्रवाशांची संख्या लक्षात घेता आगाराकडे उपलब्ध असलेल्या बसबरोबरच चालक आणि वाहकांची संख्या अपुरी असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नव्या बस उपलब्ध झाल्या असल्या तरी त्या पूर्ण क्षमतेने रस्त्यावर आणण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता दूर करणे आवश्यक आहे.
मर्यादित बस आणि उपलब्ध मनुष्यबळाच्या परिस्थितीतही कराड आगाराने उत्पन्नाच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी कायम ठेवली आहे. त्यामुळे नव्या बससोबतच चालक-वाहकांची संख्या वाढविल्यास कराड आगाराची प्रवासी सेवा आणि उत्पन्न दोन्ही आणखी उंचावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




