पुणे:-मोशीमध्ये ‘हिंदुभूषण’ संभाजीराजांच्या स्मारकाचा भव्य मानवंदना सोहळा.
पत्रकार अतुल भापकर नगर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुणे:-मोशीमध्ये ‘हिंदुभूषण’ संभाजीराजांच्या स्मारकाचा भव्य मानवंदना सोहळा.

५ हजारांहून अधिक ढोलवादकांचा गगनभेदी निनाद; १११ शंखांचा सामूहिक शंखनादाने मोशी दुमदुमणार.
मोशी, पुणे : स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देत इतिहासाच्या पानांवर शौर्य, स्वाभिमान आणि बलिदानाची अमिट गाथा कोरणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे भव्य मानवंदना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ या भव्य स्मारकाला मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्तांची पावले मोशीकडे वळणार असून, संपूर्ण परिसर शिवमय होणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे ते महाराष्ट्राच्या रणवाद्य परंपरेचे सामर्थ्य. ५ हजारांहून अधिक ढोलवादकांची नोंदणी झाली असून, सुमारे १५१ ढोल-ताशा पथके सामूहिक वादनात सहभागी होणार आहेत. हजारो ढोलांच्या एकसुरातील निनादाने आसमंत दुमदुमणार असून, संभाजीराजांच्या शौर्याला रणवाद्यांच्या गजरात अनोखी मानवंदना दिली जाणार आहे. या सामूहिक वादनातून नवा विश्वविक्रम नोंदविण्याचा आयोजकांचा संकल्प असून, त्याची अधिकृत पुष्टी कार्यक्रमानंतर करण्यात येणार आहे.
ढोल-ताशांच्या गगनभेदी निनादासोबतच १११ शंखांचा सामूहिक शंखनाद, ‘शिवशंभो गर्जना’, शाहिरी कार्यक्रम आणि मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिकेही सोहळ्याची शोभा वाढविणार आहेत. शंखनादाचा पवित्र स्वर, ढोल-ताशांचा कडकडाट आणि ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या जयघोषाने मोशीचा परिसर दुमदुमून जाणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे स्वराज्याच्या इतिहासातील तेजस्वी पर्व. संकटांच्या काळातही न झुकणारा स्वाभिमान, मृत्यूच्या छायेतही न डगमगणारे धैर्य आणि स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती त्यांच्या जीवनातून पुढील पिढ्यांना प्रेरणा देते. त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची स्मृती चिरंतन राहावी, याच भावनेतून उभारण्यात आलेल्या या भव्य स्मारकाला होणारी मानवंदना म्हणजे इतिहासाला वर्तमानातून दिलेली कृतज्ञ अभिवादनाची सलामी ठरणार आहे.
या ऐतिहासिक आणि भव्य सोहळ्याला शिवप्रेमी, इतिहासप्रेमी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
नगर तालुका प्रतिनिधी
अतुल भापकर




