पुणे:-अनधिकृत केबल जोडताना कामगार गंभीर जखमी; महावितरणच्या परवानगीशिवाय काम सुरू असल्याचा आरोप.
पत्रकार संगीता फाळके पुणे शहर महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुणे:-अनधिकृत केबल जोडताना कामगार गंभीर जखमी; महावितरणच्या परवानगीशिवाय काम सुरू असल्याचा आरोप.
परवानगी नाही, वीजपुरवठा सुरूच अन् केबल जोडण्याचे काम! केशवनगरमध्ये विजेच्या धक्क्याने कामगाराचे दोन्ही हात गंभीर भाजले; दोषींवर कारवाईची नागरिकांची मागणी.
मुंढवा : केशवनगरमधील तुकाई माता मंदिर परिसरात अनधिकृतपणे भूमिगत केबल जोडण्याचे काम सुरू असताना वीज प्रवाहाचा धक्का लागून एका कंत्राटी कामगाराचे दोन्ही हात गंभीर भाजल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे परिसरातील वीजपुरवठाही काही काळ खंडित झाला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या दुर्घटनेत अनिल कुमार (वय २४, रा. बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी) हा कामगार गंभीर जखमी झाला आहे. कुमार हा एका इलेक्ट्रिकल एजन्सीमध्ये जॉइंटर म्हणून काम करतो.
केशवनगरमधील सर्व्हे क्रमांक ३६ येथे ग्राफिटी सब स्टेशनमधून विहार सोसायटीकडे गेलेली ११ केव्हीची भूमिगत केबल महावितरणची अधिकृत परवानगी न घेता जोडण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले आहे.
नियमानुसार अशा प्रकारचे काम सुरू करण्यापूर्वी विद्युत विभागाची अधिकृत परवानगी घेऊन संबंधित वीजप्रवाह खंडित करणे आवश्यक असते. मात्र, कोणतीही परवानगी न घेता आणि वीजप्रवाह सुरू असतानाच काम सुरू असल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे विनापरवाना काम करणाऱ्या संबंधित घटकांवर कारवाई करण्याबरोबरच ग्राहकांना वेठीस धरणाऱ्या प्रकाराचीही चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे सांगितले आहे.




