वाई:-गोरक्षकांचा ‘अलर्ट’ अन् पोलिसांची धडक! रविवार पेठेत कथित कत्तलीचा पर्दाफाश; ६० किलो मांस जप्त.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-गोरक्षकांचा ‘अलर्ट’ अन् पोलिसांची धडक! रविवार पेठेत कथित कत्तलीचा पर्दाफाश; ६० किलो मांस जप्त.

वाई, दि. २२ : वाई शहरातील रविवार पेठ परिसरात कथित बेकायदा जनावरांच्या कत्तलीचा प्रकार गोरक्षक व प्राणीमित्रांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. पोलिसांनी तातडीने छापा टाकून सुमारे ६० किलो गोसदृश्य मांस जप्त केले. यासोबतच लोखंडी सतूर, लाकडी ओंडका, इलेक्ट्रिक वजनकाटा व अन्य साहित्य असा सुमारे १२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास मानद प्राणी कल्याण अधिकारी तथा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अभय धनंजय शिंदे यांना रविवार पेठेतील एका घरात कथितपणे बेकायदा जनावरांची कत्तल करून मांसविक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी सहकाऱ्यांसह तातडीने वाई पोलीस ठाणे गाठून पोलिसांना याबाबत माहिती दिली.
त्यानंतर पोलिस पथकाने पंच व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संशयित समि अहमद अन्सार चौधरी याच्या घरावर छापा टाकला. घराच्या पुढील खोलीची झडती घेतली असता गोसदृश्य मांस आणि कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. संबंधित कत्तलीसाठी सक्षम प्राधिकरणाची लेखी परवानगी अथवा परवाना नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले.

कारवाईदरम्यान लोखंडी अँगलला लटकवलेले गोसदृश्य मांस, गोणीत साठवलेले मांस, लोखंडी सतूर, मांस तोडण्यासाठीचा लाकडी ओंडका, इलेक्ट्रिक वजनकाटा तसेच अन्य साहित्य असा एकूण १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी अभय शिंदे यांच्या तक्रारीवरून संशयित समि अहमद अन्सार चौधरी याच्याविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीवायएसपी सुनील साळुंखे आणि पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अरुण पाटणकर पुढील तपास करीत आहेत.
सतर्कतेमुळे कारवाईला वेग
रविवार पेठ परिसरातील कथित बेकायदा कत्तलीची माहिती वेळीच पोलिसांपर्यंत पोहोचल्याने तातडीने कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली असून, शहरातील अशा कथित बेकायदा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.





