वाई:-शिष्यवृत्ती परीक्षेत दिशा अकॅडमीचा दबदबा; ५ विद्यार्थ्यांची राज्य गुणवत्ता यादीत झेप!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-शिष्यवृत्ती परीक्षेत दिशा अकॅडमीचा दबदबा; ५ विद्यार्थ्यांची राज्य गुणवत्ता यादीत झेप!

वाई | दि. १३ : उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता सातवी)च्या अंतिम निकालात वाई येथील दिशा स्टडी सेंटरच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. पहिल्याच वर्षी राज्य गुणवत्ता यादीत तब्बल पाच विद्यार्थ्यांनी स्थान मिळवत दिशा अकॅडमीने शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे.
ग्रामीण विभागातून सारंग सागर गायकवाड याने ९४ टक्के (२८२ गुण) मिळवत राज्यात पाचवा, जिल्ह्यात दुसरा आणि तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. युगा प्रविण गायकवाड व तनीष्का धैर्यशील भिलारे-पाटील यांनी प्रत्येकी ९२.६६ टक्के (२७८ गुण) मिळवत राज्यात १३वा क्रमांक पटकाविला. तर विपुल विलास सणस व मेघना धनंजय घोरपडे यांनी प्रत्येकी ९२ टक्के (२७६ गुण) मिळवत राज्यात १५वा क्रमांक मिळविला.
दिशा स्टडी सेंटरच्या यशाची घोडदौड केवळ राज्य गुणवत्ता यादीपुरती मर्यादित राहिली नसून, जिल्हा गुणवत्ता यादीतही १९ विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. अखिलेश जमदाडे, असावरी चव्हाण, अक्षरा अडसूळ, स्वराली कावडे, स्वराली मोकाशी, सृष्टी पांढरे, ऋषभ जाधव, संस्कार जगताप (ग्रामीण विभाग), शमिका मोरे, आदित्य मोरे, समृद्धी माळी, अंजली सपकाळ, अर्पित नवले, आर्यन गायकवाड (ग्रामीण विभाग), सौम्या चव्हाण, आराध्य शिंदे, अक्षदा क्षीरसागर, हर्ष काळे आणि वेदराज अनपट यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकदार कामगिरी केली.
प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता चौथी)मध्येही अनुराग योगेश शिंदे याने २३६ गुण मिळवत जिल्ह्यात १४२वा क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे दिशा स्टडी सेंटरच्या अनुभवी व समर्पित शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि सातत्यपूर्ण सराव यांचा मोठा वाटा आहे. मराठी विषयासाठी सौ. अर्चना ढगे-जाधव व सौ. जयश्री फरांदे, गणित व बुद्धिमत्ता विषयासाठी श्री. निरंजन पवार, कु. नजहत मुजावर, कु. अंकिता कुंभार, सौ. शुभांगी बोंबले व श्री. प्रवीण जगताप, तर इंग्रजी विषयासाठी सौ. रेश्मा भगत यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन केले. अकॅडमीक हेड सौ. प्रियंका येवले-कोचळे यांनी संपूर्ण शैक्षणिक नियोजनाची धुरा सांभाळली.
दिशा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नितीन कदम व सचिव प्रा. रुपाली कदम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा आणि सातत्यपूर्ण सरावाची जोड दिल्यास यश निश्चित मिळते, असा विश्वास प्रा. रुपाली कदम यांनी व्यक्त केला.
2) महाबळेश्वर:-कत्तलीसाठी नेण्यात येणारे चार खिल्लार बैल गोशाळेतच; न्यायालयाचा वाहन व गोवंश परत देण्यास नकार.

सातारा | महाबळेश्वर, दि. २० : महाबळेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या पिकअप वाहनातून नेण्यात येणाऱ्या चार खिल्लार जातीच्या बैलांची सुटका करण्यात आली होती. या प्रकरणातील जप्त वाहन व गोवंश परत मिळावा, यासाठी संबंधित वाहनमालक व त्याच्या साथीदारांनी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, महाबळेश्वर यांच्या न्यायालयात केलेला मागणी अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे. तसेच जप्त गोवंशाचा ताबा गोशाळेकडेच ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
दि. १८ जुलै २०२६ रोजी रात्री महाबळेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पिकअप वाहनातून चार खिल्लार जातीचे बैल कत्तलीसाठी बेकायदेशीररीत्या नेले जात असल्याची गुप्त माहिती मानद पशू अधिकारी सिद्धार्थ लाखे व अभय शिंदे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ महाबळेश्वर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर महाबळेश्वर परिसरातील गोरक्षकांच्या मदतीने संबंधित वाहनावर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत चार बैलांसह वाहन जप्त करून गोवंशाची रवानगी गोवंश करुणा मंदिर गोशाळा, वेळे येथे करण्यात आली. प्रत्येक बैलाची अंदाजे किंमत ४० ते ५० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, संबंधित वाहनमालक व अन्य साथीदारांनी जप्त वाहन आणि गोवंश परत मिळण्यासाठी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, महाबळेश्वर यांच्या न्यायालयात मागणी अर्ज दाखल केला. न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी वकील तसेच गोशाळेचे म्हणणे मागविण्यात आले.
गोशाळेतर्फे अधिकारपत्रानुसार अविनाश रांजणे हजर झाले. त्यानंतर करुणा मंदिर गोशाळा, वेळेच्या वतीने अॅड. ऋषिकेश सकुंडे यांनी जप्त गोवंशाचा ताबा संबंधितांकडे देऊ नये, तसेच मागणी अर्ज फेटाळण्यात यावा, यासाठी न्यायालयात युक्तिवाद केला. त्यांना अॅड. अथर्व पाटील व अॅड. द्वारकाधीश चव्हाण यांनी सहकार्य केले.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने अर्जदारांनी दाखल केलेला जप्त वाहन व गोवंश परत मिळण्यासाठीचा मागणी अर्ज नामंजूर केला. तसेच संबंधित चारही गोवंशाचा ताबा गोशाळेकडेच ठेवण्यात यावा, असे आदेश न्यायालयाने पारित केले. त्यामुळे कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या चार खिल्लार बैलांना गोशाळेतच सुरक्षित आश्रय मिळाला आहे.
3) वाई:-शेतीपंपाच्या केबलवर चोरट्यांची नजर; तांबे विक्रीचा डाव वाई पोलिसांनी उधळला!

सातारा | वाई, दि. २० : शेतीपंपांच्या मोटारीची केबल चोरी करून ती जाळून त्यातील तांबे विक्री करण्याच्या प्रकाराचा वाई पोलिसांनी पर्दाफाश केला. तारांगण सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या पार्किंगमधून सुमारे १०० मीटर लांबीची कॉपर केबल चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना तांब्याच्या तारेसह ताब्यात घेतले आहे. समीर सुरेश तुपे (वय २०) आणि राहुल दादाराव पांचांगे (वय २४), दोघेही रा. गुरेबाजार झोपडपट्टी, सिद्धनाथवाडी, वाई, अशी त्यांची नावे आहेत.
दि. ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२६ दरम्यान तारांगण सहकारी गृहनिर्माण सोसायटी, सिद्धनाथवाडी, वाई येथील पार्किंगमध्ये ठेवलेली सुमारे १०० मीटर लांब, निळ्या रंगाची २.५ एमएम जाडीची ३-पेज कॉपर केबल वायर अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी १४ ऑगस्ट रोजी वाई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतीपंपांच्या केबल चोरीचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपासाला वेग दिला. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे व तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.
तपास पथकाने तांत्रिक माहिती तसेच गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून संशयितांचा शोध सुरू केला. दरम्यान, पसरणी रोड, वाई येथे दोन इसम तांब्याची तार विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पसरणी रोडवर सापळा रचला.
पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होताच तांब्याची तार विक्रीसाठी आलेल्या दोघांनी तेथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून दोघांना तांब्याच्या तारेसह ताब्यात घेतले. त्यांना वाई पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे समीर सुरेश तुपे आणि राहुल दादाराव पांचांगे अशी सांगितली.
चौकशीत दोघांनी १० ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास तारांगण सोसायटीच्या पार्किंगमधून कॉपर केबल चोरी केली. त्यानंतर केबल जाळून त्यातील तांबे वेगळा केला आणि तो विक्री करण्यासाठी पसरणी रोडवर आणल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईमुळे केबल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लागला असून, चोरीचा मुद्देमालही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन कदम, विक्रम धोत्रे, हेमंत शिंदे, विशाल शिंदे, मारोती लोलापोड आणि उमेश लोखंडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास अंमलदार मारोती लोलापोड करीत आहेत.
4) वाई:-मुलांवर स्वप्नांचे ओझे लादू नका; त्यांना संघर्ष करू द्या! — IPS बिरदेव ढोणे

यश-अपयशाचा विचार सोडून संघर्षाची वाट धरा; पाचवड येथे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन.

सातारा | वाई, दि. २० : “यश मिळेल की अपयश, याचा विचार करत बसण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी संघर्षाची वाट धरावी. संघर्षातून मिळणारा अनुभव आयुष्यभर दिशा देतो,” असा मोलाचा संदेश IPS बिरदेव ढोणे यांनी पाचवड येथे दिला.
पाचवड (ता. वाई) येथील आयएफएस राजेश स्वामी अभ्यासिका आणि तिरंगा एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
पालकांनी मुलांवर स्वतःची अपूर्ण स्वप्ने लादण्याची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे सांगत, मुलांना स्वतःचे निर्णय घेण्याची संधी द्यावी आणि त्यांना अपयशाचाही अनुभव घेऊ द्यावा, असे आवाहन करण्यात आले. IPS ढोणे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केलेल्या आपल्या संघर्षमय प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. सातत्य, मेहनत, संयम आणि आत्मविश्वास या चार गोष्टी यशाच्या प्रवासात अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या संघर्षाच्या काळातील आईच्या शिकवणीचा भावनिक प्रसंग सांगताना IPS ढोणे भावुक झाले. त्यांच्या या आठवणीने उपस्थितांचेही डोळे पाणावले.
दरम्यान, राज्यसेवा परीक्षेत यश संपादन केलेले आरोग्य अधिकारी रुपेश मोरे, फॉरेन्सिक अधिकारी अभिनया गायकवाड आणि श्रेयश इथापे यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. कांताताई नलावडे, भुईंज पोलीस ठाण्याचे सपोनि. पृथ्वीराज ताटे, प्राचार्य आर. एस. पाटील, संस्थेचे मार्गदर्शक-सचिव जयवंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्या वनिता पवार यांनी प्रास्ताविक केले, तर पत्रकार जयवंत पिसाळ आणि विजया पवार यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन घेणारे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
5) वाई:-वेरूळी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; शेतकऱ्याची शेळी केली ठार.

सातारा | वाई, दि. २० : वेरूळी (ता. वाई) परिसरात बिबट्याच्या वावराने शेतकरी आणि पशुपालकांची चिंता वाढली आहे. मंगळवारी (दि. १८) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बिबट्याने शेतात चरणाऱ्या शेळीवर हल्ला करून तिचा फडशा पाडला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वेरूळी येथील शेतकरी जगन्नाथ पवार यांची शेळी शेतात असताना अचानक बिबट्याने तिच्यावर झडप घातली. काही क्षणांतच बिबट्याने शेळीला ठार केले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संतोष मांढरे (फौजी) यांनी घटनास्थळी भेट देत पवार यांना धीर दिला. तसेच त्यांनी वन विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
खरिपाच्या हंगामातील शेतीची कामे सुरू असल्याने शेतकऱ्यांची शेतात ये-जा सुरू आहे. त्यातच जनावरांसाठी चारा आणण्यासाठीही शेतकऱ्यांना बाहेर पडावे लागत आहे. मात्र, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतात काम करताना जीवितास धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात पिंजरा लावून त्याला जेरबंद करावे, वन विभागाने नियमित गस्त घालावी आणि ग्रामस्थांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात शेळी गमावलेल्या जगन्नाथ पवार यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त होईपर्यंत शेतकऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सायंकाळी किंवा अंधार पडल्यानंतर एकट्याने शेतात जाणे टाळावे तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे, असे सांगण्यात आले आहे. वन विभागाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
6) कराड:-गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला ‘सक्षम’चा हातभार; शैक्षणिक साहित्याचे वाटप.

सातारा | कराड, दि. २० : श्री संत तुकाराम हायस्कूल, कराड येथे ‘सक्षम’ (समृद्धी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ) या सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मंगळवार, दि. १८ ऑगस्ट रोजी हा उपक्रम पार पडला.
‘सक्षम’चे सचिव राजेश चांडक, विजया माने (वार्ताहर) आणि यश कुलकर्णी यांच्या हस्ते ११ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्याला एक दप्तर, नऊ वह्या, ग्राफ बुक, कलर बॉक्स आणि कंपास पेटी देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पाटील एम. एन. यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कल्याणकर यांनी प्रास्ताविक केले. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या शिक्षणाला हातभार लावणाऱ्या ‘सक्षम’च्या सामाजिक उपक्रमाचे यावेळी उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे आभार ज्येष्ठ शिक्षिका काशिद यांनी मानले. शिक्षकवृंद, विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता झाली.
7) कराड:-मानवाधिकार समितीच्या सातारा जिल्हा महिला अध्यक्षपदी डॉ.शर्मिष्ठा गरुड.

सातारा | कराड, दि. २० : मानवाधिकार समितीच्या सातारा जिल्हा महिला अध्यक्षपदी डॉ. शर्मिष्ठा कृष्णाजी गरुड यांची निवड करण्यात आली आहे. महिलांचे हक्क, महिला सक्षमीकरण तसेच समाजातील वंचित व दुर्बल घटकांच्या मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
मानवाधिकार समितीचे महाराष्ट्र राज्य महासचिव अनिल कचरे यांच्या हस्ते डॉ. गरुड यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कार करून नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
महिला, बालक तसेच वंचित घटकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, अन्यायाविरोधात आवाज उठविणे आणि मानवाधिकारांबाबत जनजागृती करणे, या माध्यमातून डॉ. गरुड प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नियुक्तीनंतर डॉ. शर्मिष्ठा गरुड यांनी समितीने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत महिला आणि समाजातील गरजू घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी डॉ. गरुड यांचे अभिनंदन केले. यावेळी कुमारी उत्कर्षा गरुड, उल्हास माने, अलका माने, अनुसया यादव, विकास यादव, उमेश थोरात, सुनील बासुगडे, शीला बासुगडे, आदिल मोमीन, दत्तात्रय गरुड, निवास देसावळे, विशाल चोपदार, सिंधुताई कुंभार, शकुंतला कदम, रूपाली चांदे आदी उपस्थित होते.





