वाई:-हुंड्यासाठी २० लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पतीसह सासरच्या सात जणांवर गुन्हा.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-हुंड्यासाठी २० लाखांची मागणी; विवाहितेचा छळ, पतीसह सासरच्या सात जणांवर गुन्हा.

सातारा | वाई, दि. १९ : माहेरून २० लाख रुपये हुंडा आणण्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सांगवी (पिंपळे गुरव) येथील गांगाडेनगर परिसरात २५ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, तिचा विवाह २५ जानेवारी २०२६ रोजी संकेत दीपक सुतार याच्याशी झाला. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी माहेरून २० लाख रुपये आणावेत, अशी मागणी करत तिचा छळ सुरू केला. या दरम्यान तिला उपाशी ठेवणे, शिवीगाळ करणे तसेच मारहाण करण्याचे प्रकार घडल्याचा आरोप आहे.
तसेच, विवाहावेळी माहेरून दिलेले दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे सासरच्या मंडळींनी ताब्यात घेतल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पतीकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आणि छळ असह्य झाल्यानंतर पीडितेने वाई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी संकेत दीपक सुतार, पुष्पा दीपक सुतार, दीपक वामन सुतार, प्रतिमा राहुल पंडित, राहुल सुरेश पंडित, सागर दशरथ सुतार आणि तृप्ती सागर सुतार (सर्व रा. सांगवी, पिंपळे गुरव, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार राहुल भोईर करीत आहेत.
2) महामार्गावरील अपघातात सावंतवाडीच्या तरुणाचा बळी.

सातारा | भुईंज, दि. १९ : सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कवठे (ता. वाई) हद्दीत मोपेड घसरून झालेल्या भीषण अपघातात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शिवराम यशवंत गावडे (रा. सरमळे, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना १२ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवराम गावडे हे मुंबईहून मोपेडवरून सावंतवाडीकडे निघाले होते. कवठे गावानजीक आल्यानंतर परिसरात पाऊस सुरू असल्याने महामार्गाचा रस्ता ओला झाला होता. त्याचवेळी त्यांची मोपेड अचानक घसरली. वाहन दुभाजकाला घासल्यानंतर ते रस्त्याच्या कडेला खाली कोसळले.
अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पावसाचे वातावरण आणि रस्त्यावरील ओलसरपणामुळे अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर एका सतर्क ट्रॅक्टरचालकासह स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी नोंद घेतली. मृत शिवराम गावडे यांचे बंधू हरी यशवंत गावडे यांनी भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पावसामुळे रस्ता ओला झालेला असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, पुढील तपास पोलीस हवालदार भाऊ ढिगुडे करीत आहेत.
3) वाई:-लोकसेवक रुपेश मिसाळ यांना ‘अण्णाभाऊ साठे समाजभूषण’ पुरस्कार.

सामाजिक, शैक्षणिक आणि कामगार क्षेत्रातील योगदानाचा गौरव.
सातारा | वाई, दि. १९ : शिक्षण, समाजकारण आणि सामाजिक न्यायाच्या चळवळीत सातत्याने योगदान देणारे व्याजवाडी, ता. वाई येथील लोकसेवक रुपेश लक्ष्मण मिसाळ यांना ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रतिकूल प्रतिष्ठान, वाई आणि दलित विकास आघाडी, वाई यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. १८) टिळक ग्रंथालय, वाई येथे मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मिसाळ यांनी शालेय जीवनापासूनच सामाजिक कार्याची मुहूर्तमेढ रोवली. वक्तृत्व व क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत त्यांनी शाळेसह गावाचे नाव उज्ज्वल केले. पुढे नागरिकांच्या अडचणी सोडविणे, अन्यायाविरोधात आवाज उठविणे आणि समाजाला संघटित करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने सुरू ठेवले.
सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्यावर व्याजवाडी गावच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. या माध्यमातून अनेक वाद सामोपचाराने मिटवून सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) कामगार आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळताना गवंडी, बिगारी, सुतार यांसह बांधकाम क्षेत्रातील कामगारांची नोंदणी करून त्यांना रोजगार व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
ऊसतोड कामगारांसाठीही त्यांनी उल्लेखनीय उपक्रम राबविले. थंडी आणि पावसापासून संरक्षण मिळावे यासाठी सुमारे १ हजार ५०० ऊसतोड मजुरांना ब्लँकेट, कानटोपी आणि जर्किनचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच ऐतिहासिक वैराटगड परिसरात सुमारे एक हजार वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यालाही त्यांनी हातभार लावला.
शैक्षणिक क्षेत्रात न्यू इंग्लिश स्कूल, व्याजवाडी तसेच शाळा क्रमांक १, वाई येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढदिवसानिमित्त वेळे येथील गोशाळेतील जनावरांसाठी गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने चारा उपलब्ध करून देण्याचा उपक्रमही ते राबवत आहेत. सरकारी रुग्णालयातील रुग्णांना फळे व आवश्यक साहित्याचे वाटप करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
वडील लक्ष्मण आनंदा मिसाळ यांच्या निधनानंतर आई गुंपा मिसाळ यांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. पत्नी पूनम तसेच मुले ओम आणि स्वामिनी यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे सामाजिक कार्याची प्रेरणा मिळत राहिली, असे रुपेश मिसाळ यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या रुपेश मिसाळ यांचा झालेला हा सन्मान आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी अभिमानाची बाब असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक प्रा. सतीश कुलकर्णी, वाई पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह नायकवडी, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन मधु आप्पा भोसले, वाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ननावरे, नायब तहसीलदार प्रकाश जाधव, ज्येष्ठ विचारवंत जयसिंग पवार, ज्येष्ठ पत्रकार दिलीप कांबळे यांच्यासह वाई तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
4) वाई:-हुंड्यासाठी छळ अन् मारहाण; पतीसह सासरच्या तिघांविरोधात गुन्ह्याची तक्रार.

वाई, दि. १९ : हुंड्यासाठी वारंवार टोमणे मारून दुचाकी व तांब्याची भांडी आणण्याचा तगादा लावत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू-सासऱ्यांविरोधात वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर, मुंबई येथील संबंधित विवाहितेचा विवाह ६ फेब्रुवारी २०२२ रोजी वेलंग, ता. वाई येथील सागर गुलाब निगडे याच्याशी रितीरिवाजानुसार झाला होता. विवाहापूर्वीच तिच्या वडिलांनी आर्थिक परिस्थितीमुळे अधिक हुंडा अथवा सोन्याचे दागिने देणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, लग्नानंतर काही महिने सुरळीत गेल्यानंतर सासरच्या मंडळींकडून हुंड्यावरून तिला त्रास देण्यास सुरुवात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
‘माहेरून काहीच आणले नाही, कसली भिकारी सून भेटली,’ अशा शब्दांत सासू मालन गुलाब निगडे, सासरे गुलाब किसन निगडे आणि पती सागर गुलाब निगडे यांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे. तसेच दुचाकी आणि तांब्याची भांडी माहेरून आणावीत, यासाठी पतीकडून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
विवाहितेच्या सातव्या महिन्यातील डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमावरूनही सासरच्या मंडळींनी त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. बाळाच्या जन्मानंतरही सासरच्यांनी तिची कोणतीही विचारपूस केली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
सततच्या छळाला कंटाळून अखेर विवाहितेने वाई पोलीस ठाणे गाठून पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार श्रीनिवास बिराजदार करीत आहेत.
5) शिरवळ:-पुणे-सातारा महामार्गावर कारची ट्रकला जोरदार धडक; पती-पत्नी गंभीर जखमी.

शिरवळ, दि. १९ : पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ हद्दीतील वैष्णवी हॉटेलसमोरील पुलावर भरधाव कारने पुढे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कारचालकासह त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. अपघातानंतर नागरिकांनी तातडीने धाव घेत दोघांना कारमधून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार भिमराव गलांडे (वय ३८, रा. वडकी, ता. हवेली, जि. पुणे) हे १७ ऑगस्ट रोजी सकाळी एशियन पेंट कंपनीचा माल घेऊन ट्रकने पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. दुपारी पावणेबाराच्या सुमारास त्यांचा ट्रक शिरवळ हद्दीतील वैष्णवी हॉटेलसमोरील पुलावर आला असता, पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने ट्रकच्या उजव्या मागील बाजूस जोरदार धडक दिली.
धडक एवढी भीषण होती की कार ट्रकच्या मागील भागात घुसून कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. या अपघातात कारचालक विक्रम संभाजी दोरके (वय ४०) आणि त्यांची पत्नी स्वाती विक्रम दोरके (वय ३०, दोघे रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव, जि. सातारा) गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत कारमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी शिरवळ येथील डॉ. जोगळेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवत अपघातास कारणीभूत ठरल्याचा आरोप करत ट्रकचालक तुषार गलांडे यांच्या तक्रारीवरून शिरवळ पोलिसांनी कारचालक विक्रम दोरके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संजय केंगळे करत आहेत.
6) खंडाळा:-सातारा-पुणे महामार्गावर मध्यरात्री भीषण धडक; दोन ट्रॅव्हल्सचा चक्काचूर, तिघे गंभीर.

सातारा | खंडाळा, दि. १९ : सातारा-पुणे महामार्गावरील धनगरवाडी हद्दीत अंबिका हॉटेलसमोर मध्यरात्री दोन ट्रॅव्हल्स बसची जोरदार धडक झाली. तांत्रिक बिघाडामुळे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्सला पाठीमागून भरधाव आलेल्या दुसऱ्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की, दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातात तिघे प्रवासी गंभीर जखमी झाले असून, काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री सुमारे १.१५ वाजता हा अपघात झाला. अमितकुमार हरिलालप्रसाद शर्मा (वय ३२, रा. उत्तर प्रदेश) हे पुण्याहून गोव्याच्या दिशेने ट्रॅव्हल्स बस घेऊन जात होते. धनगरवाडी येथील अंबिका हॉटेलसमोर बसच्या इंजिनमध्ये अचानक बिघाड झाल्याने त्यांनी बस महामार्गाच्या डाव्या बाजूला उभी केली होती. पार्किंग लाईट सुरू करून रेडिएटरची पाहणी करत असतानाच पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या ट्रॅव्हल्सने त्यांच्या बसला जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत बालाजी नागराव मळगदे, वत्सला बालाजी मळगदे आणि ऋतुजा भारत मार्कड (सर्व रा. पुणे) हे गंभीर जखमी झाले. अपघातामुळे दोन्ही ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले असून, घटनास्थळी वाहनांचे तुटलेले भाग व काचा विखुरल्या होत्या.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. डायल ११२ वर माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना तातडीने शिरवळ येथील डॉ. जोगळेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
या प्रकरणी दुसऱ्या ट्रॅव्हल्स बसचा चालक अजिंक्य रामदास ऐडके (रा. चिखली, पिंपरी-चिंचवड, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार दत्तात्रय धायगुडे पुढील तपास करीत आहेत.
7) सातारा:-‘क्वांटम एआय’च्या जाळ्यात चहा दुकानदार; २७ लाखांचा ऑनलाइन गंडा!

सातारा, दि. १९ : इन्स्टाग्रामवरील फसव्या जाहिरातीला भुलून ‘क्वांटम एआय’मध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळेल, या आमिषाला बळी पडलेल्या साताऱ्यातील ६४ वर्षीय चहा पावडर दुकानदाराला तब्बल २७ लाख ४२ हजार ५०१ रुपयांचा ऑनलाइन गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नेहा शर्मा, रवी शर्मा यांच्यासह इतर संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समर्थनगर, आय.टी.आय. रोड, सातारा येथील हर्षद विनेद्रलाल शहा हे २५ मे २०२६ रोजी इन्स्टाग्रामवर रिल्स पाहत असताना त्यांना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावाचा वापर करून एआयमध्ये गुंतवणुकीसंदर्भातील जाहिरात दिसली. जाहिरातीखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून त्यांनी आपली माहिती भरली.
यानंतर नेहा शर्मा आणि रवी शर्मा या नावाने व्यक्तींनी व्हॉट्सॲप तसेच फोनद्वारे शहा यांच्याशी संपर्क साधला. ‘क्वांटम एआय’चे सदस्यत्व, परदेशातील गुंतवणूक आणि कायदेशीर सल्ल्याच्या नावाखाली विविध बँक खात्यांवर पैसे जमा करण्यास त्यांना सांगण्यात आले.
सुरुवातीला १४ हजार रुपये भरल्यानंतर संशयितांनी ऑनलाइन डॅशबोर्डवर डॉलरच्या स्वरूपात गुंतवणुकीची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दाखवले. त्यामुळे शहा यांचा विश्वास बसला. मात्र, प्रत्यक्ष रक्कम काढण्याची वेळ आली तेव्हा खाते ‘फ्रीज’ झाल्याचे सांगण्यात आले. पैसे काढण्यासाठी टॅक्स, चार्जेस आणि ट्रेडिंग परवान्याच्या नावाखाली पुन्हा-पुन्हा रक्कम भरण्यास सांगण्यात आले.
या आमिषाला बळी पडून २५ मे ते ३० जुलै २०२६ या कालावधीत शहा यांनी विविध बँक खात्यांवर तब्बल २७ लाख ४२ हजार ५०१ रुपये ऑनलाइन पाठवले. मात्र, त्यानंतरही पैसे परत मिळाले नाहीत. रक्कम परत मागितल्यानंतर संशयितांकडून टाळाटाळ आणि उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शहा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून नेहा शर्मा, रवी शर्मा आणि इतर संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, सोशल मीडियावरील आकर्षक गुंतवणूक जाहिराती, एआय ट्रेडिंग आणि अल्पावधीत भरघोस परताव्याच्या आमिषांना नागरिकांनी बळी पडू नये. अनोळखी व्यक्तींच्या सांगण्यावरून कोणत्याही बँक खात्यावर ऑनलाइन पैसे पाठवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
8) फलटण:-डिव्हायडरला स्कूटीची जोरदार धडक; २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, आई-बहीण जखमी.

सातारा | फलटण, दि. १९ : तरडगाव (ता. फलटण) हद्दीत लोणंद-फलटण मार्गावर स्कूटीचा ताबा सुटून ती सिमेंटच्या डिव्हायडरला धडकून झालेल्या भीषण अपघातात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्याची आई आणि बहीण जखमी झाल्या आहेत. दि. १५ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेसमोरील पुलावर हा अपघात झाला.
लोणंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिता मारुती क्षीरसागर (वय ३५, रा. हातवन, ता. जि. जालना, सध्या रा. पिंपरी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांचा मुलगा समाधान मारुती क्षीरसागर (वय २०) याने काही दिवसांपूर्वीच होंडा कंपनीची काळ्या रंगाची नवीन स्कूटी घेतली होती.
दि. १४ ऑगस्टच्या रात्री सुनिता, त्यांची मुलगी आणि समाधान हे खोपोलीहून पिंपरीकडे स्कूटीवरून जात होते. पहाटेच्या सुमारास तरडगाव गावच्या हद्दीत पुलावरून जात असताना समाधानचा स्कूटीवरील ताबा अचानक सुटला. त्यामुळे स्कूटी रस्त्याच्या मधोमध असलेल्या सिमेंटच्या डिव्हायडरला वेगाने जाऊन धडकली.
या धडकेत समाधानच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर १०८ रुग्णवाहिकेने त्याला लोणंद ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. समाधानची आई आणि बहीण यांनाही अपघातात हात, पाय, कपाळ आणि चेहऱ्यावर दुखापत झाली आहे.
दरम्यान, अपघातानंतर एका वाहनचालकाने मदत करत जखमींना रुग्णालयात पोहोचवले. अपघातात स्कूटीचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अंमलदार राणी गायकवाड पुढील तपास करीत आहेत.
9) माण:-RTI अर्जाचा जाब विचारताच तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला.

सातारा | माण, दि. १९ : ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज करून माहिती मागितल्याचा जाब विचारत पांगरी येथे एका तरुणावर लोखंडी हत्याराने हल्ला करण्यात आला. या मारहाणीत तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, दहीवडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कैलास अशोक दडस (वय ३१, रा. पांगरी, ता. माण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गजानन दडस, अर्जुन दडस (दोघे रा. पांगरी) आणि हनुमंत पाटील (रा. बिदवड, ता. माण) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास कैलास दडस हे घरी झोपले असताना आरोपी त्यांच्या घरासमोर आले. ग्रामपंचायतीमध्ये माहिती अधिकाराचा अर्ज का केला, अशी विचारणा करीत त्यांनी कैलास यांच्यासह त्यांच्या आई-वडिलांना व बहिणीला शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
यानंतर वाद वाढल्यानंतर गजानन दडस याने लोखंडी गोलाकार हत्याराने कैलास यांच्या डोक्यात प्रहार केला. तर इतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
हल्ल्यात जखमी झालेल्या कैलास यांनी दहीवडी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार दहीवडी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार विठ्ठल विरकर करीत आहेत.
10) फलटण:-तामखड्यात दोन गटांत राडा; ग्रामपंचायत सदस्याच्या वादातून आणि सोशल मीडिया भांडणातून हाणामारी.

सातारा | फलटण, दि. १९ : फलटण तालुक्यातील तामखडा येथे १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी दोन गटांत झालेल्या परस्परविरोधी हाणामारीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायत सदस्याला जाब विचारल्याच्या वादातून एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला, तर काही तासांनी सोशल मीडियावरील जुन्या वादातून दुसऱ्या गटात मारामारी झाली. या दोन्ही प्रकरणांत फलटण ग्रामीण पोलिसांनी एकूण १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
पहिली घटना सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. चंद्रकांत खुषाबा ठोंगिल हे कुटुंबीयांसह दुचाकीवरून शिंगणापूर येथे देवदर्शनासाठी जात होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य दीपक सुळ यांना, किरकोळ कारणावरून मुलांना घरी बोलावून मारहाण करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. या कारणावरून वाद वाढला.
आरोपानुसार, दीपक सुळ यांनी ठोंगिल यांना घरात बोलावून वाद घातला. त्यानंतर चंद्रकांत ठोंगिल व त्यांच्या मुलांना लोखंडी रॉड, दगड तसेच लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या श्रीरंग ठोंगिल यांनाही रोखण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. सरपंचांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद थांबला.
या प्रकरणी चंद्रकांत ठोंगिल यांच्या तक्रारीवरून दीपक कुंडलक सुळ, कुंडलक शंकर सुळ, बनाजी साहेबराव सुळ, सार्थक बनाजी सुळ, ऋषिकेश बापूराव सुळ, अविष्कार सुरेश सुळ, बापूराव सोपान सुळ, वेदांत बापूराव सुळ, आदित्य संजय सुळ, अजय दिलीप ठोंगिल आणि प्रतिक बनाजी सुळ अशा ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, त्याच दिवशी रात्री सातच्या सुमारास तामखडा येथे दुसऱ्या गटातही मारामारी झाली. प्रियंका दीपक सुळ यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा पुतण्या अविष्कार सुळ आणि आमोळ ठेंगिल व गौरव सुळ यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून सोशल मीडियावरील वादातून मतभेद होते.
याच जुन्या वादातून प्रियंका सुळ आणि त्यांचे पती दीपक सुळ जनावरांची धार काढत असताना आरोपी तेथे आले. यावेळी दीपक सुळ यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या महिलांसह इतरांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच आमोळ ठेंगिल याने धारदार कोयत्याने सार्थक याच्यावर वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या झटापटीत प्रियंका सुळ यांच्या गळ्यातील मंगळसूत्र गायब झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी आमोळ श्रीरंग ठेंगिल, गौरव मानसिंग सुळ, चंद्रकांत खुशाबा ठोंगिल, श्रीरंग खुशाबा ठोंगिल, परशुराम सर्जेराव ठोंगिल, सचिन रामदास सुळ, मानसिंग रामदास सुळ आणि औधुद चंद्रकांत ठोंगिल अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही घटनांतील जखमींवर फलटण येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्ही प्रकरणांचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष गंगाधर मठापती करीत आहेत.
11) पाटण कॉलनीच्या प्रश्नावर आमदारांना घेरा; ‘१५ दिवसांचे आश्वासन’ दोन वर्षांत कुठे गेले?

कराड, दि. १९ : पाटण कॉलनी येथील झोपडपट्टीच्या प्रश्नावरून दक्षिण कराडचे आमदार चव्हाण कुटुंबावर आरोप करीत असताना, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नामदेव पाटील यांनी आमदारांनाच सवालांच्या भडिमाराने घेरले आहे. निवडणुकीपूर्वी १५ दिवसांत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले होते; मग दोन वर्षांत काय केले? असा थेट सवाल पाटील यांनी उपस्थित केला.
पाटण कॉलनीतील झोपडपट्टीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. जमिनीची मालकी आणि न्यायालयीन वादामुळे या प्रश्नाला कायदेशीर गुंतागुंत आहे. मात्र, ही वस्तुस्थिती माहिती असतानाही निवडणुकीपूर्वी झोपडपट्टीधारकांना अल्पावधीत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे आता इतरांवर आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी गेल्या दोन वर्षांत काय प्रयत्न केले, याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा, अशी मागणी पाटील यांनी केली.
दक्षिण कराड विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या जाहीर सभेत निवडून आल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत पाटण कॉलनी झोपडपट्टीचा प्रश्न मार्गी लावून झोपडपट्टीधारकांना कायमस्वरूपी जमिनीचे हक्क मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आश्वासनाला जवळपास दोन वर्षे उलटली तरी प्रश्न जैसे थेच असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
दरम्यान, पाटण कॉलनीच्या प्रश्नावर आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले असून त्यावर ‘त्वरित कारवाई करा’ असा शेरा देण्यात आल्याचे सांगितले जाते. मग मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रशासनाने कोणती पावले उचलली? किती बैठका झाल्या? कोणते प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले? न्यायालयीन अडचणी दूर करण्यासाठी कायदेशीर पातळीवर कोणते प्रयत्न झाले? या सर्व प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी म्हटले.
पाटण कॉलनीचा प्रश्न हा राजकीय श्रेयाचा नसून हजारो नागरिकांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. झोपडपट्टीधारकांना कायमस्वरूपी हक्क मिळवून देण्याचे आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण झाले, तर त्याचे स्वागतच करू; मात्र आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा कामाचा कृती अहवाल जनतेसमोर ठेवावा, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
जनतेचे थेट सवाल
न्यायालयीन प्रकरणाची सध्याची स्थिती काय?
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर काय कारवाई झाली?
किती बैठका झाल्या आणि कोणते प्रस्ताव पाठविले?
कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी काय प्रयत्न झाले?
झोपडपट्टीधारकांना कायमस्वरूपी हक्क कधी मिळणार?
‘१५ दिवसांत प्रश्न सोडवू’ या आश्वासनाला दोन वर्षे उलटली; त्यामुळे आता आश्वासन नव्हे, तर कृतीचा हिशोब द्या, अशी मागणी नामदेव पाटील यांनी केली.
12) शिरवळ महामार्गावर कार ट्रकच्या मागे घुसली; दाम्पत्य गंभीर.

सातारा | शिरवळ, दि. १९ : पुणे-सातारा महामार्गावर शिरवळ हद्दीतील वैष्णवी हॉटेलसमोरील पुलावर भरधाव कारने पुढे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारचालक विक्रम संभाजी दोरके (वय ४०) आणि त्यांच्या पत्नी स्वाती विक्रम दोरके (वय ३०, दोघेही रा. वाठार स्टेशन, ता. कोरेगाव, जि. सातारा) गंभीर जखमी झाले. दोघांवर शिरवळ येथील डॉ. जोगळेकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कारचालकाविरुद्ध शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार भिमराव गलांडे (वय ३८, रा. वडकी, ता. हवेली, जि. पुणे) हे १७ ऑगस्ट रोजी सकाळी एशियन पेंट कंपनीचा माल घेऊन ट्रकने पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. दुपारी पावणेबाराच्या सुमारास त्यांचा ट्रक शिरवळ हद्दीतील वैष्णवी हॉटेलसमोरील पुलावर आला असता, पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या कारने ट्रकच्या उजव्या पाठीमागील भागाला जोरदार धडक दिली.
धडक एवढी भीषण होती की, कारचा पुढील भाग ट्रकच्या मागील बाजूमध्ये घुसला. त्यामुळे कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी तातडीने धाव घेत कारमध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी शिरवळ येथील डॉ. जोगळेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून कार हयगयीने व निष्काळजीपणे चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ट्रकचालक तुषार गलांडे यांच्या तक्रारीवरून कारचालक विक्रम संभाजी दोरके यांच्याविरुद्ध शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार संजय केंगळे करीत आहेत.





