वाई:-वक्तव्याचे पडसाद वाईत उमटले; वाघमारे यांच्या विरोधात तक्रार, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-वक्तव्याचे पडसाद वाईत उमटले; वाघमारे यांच्या विरोधात तक्रार, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक.

सातारा | वाई, दि. १८ : मराठा समाजाच्या भावना दुखावणारे तसेच मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे कथित आक्षेपार्ह व चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणाच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
गाढवेवाडी (ता. वाई) येथील आत्माराम साहेबराव चिकणे यांनी मंगळवारी (दि. १८) वाई पोलिसांकडे तक्रार दिली. ‘Saam TV News’ या यूट्यूब वाहिनीवर १६ ऑगस्ट रोजी प्रसारित झालेल्या व्हिडिओमध्ये वाघमारे यांनी मराठा समाजातील महिलांबाबत तसेच मराठा व ओबीसी समाजातील संबंधांबाबत आक्षेपार्ह स्वरूपाचे वक्तव्य केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
सदर व्हिडिओ सोशल मीडिया आणि विविध माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याने या वक्तव्याचे पडसाद व्यापक स्वरूपात उमटण्याची शक्यता असल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे. अशा वक्तव्यामुळे दोन समाजांमध्ये गैरसमज, द्वेष आणि सामाजिक तणाव वाढून सार्वजनिक शांतता व सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १९६, १९७ व २९९ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील लागू तरतुदींनुसार गुन्हा दाखल करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित व्हिडिओची लिंकही पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
दरम्यान, तक्रार दाखल करण्यापूर्वी वाई तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शिवतीर्थ येथून वाई पोलिस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठा सेवक या मोर्चात सहभागी झाले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
पोलिस ठाण्यात पोहोचल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रदीप जाधव यांना निवेदन देण्यात आले. संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांची गंभीर दखल घेऊन कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दरम्यान, तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपासणे आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करणे ही पोलिस तपासाची बाब आहे. त्यामुळे वाई पोलिस या प्रकरणात कोणती कारवाई करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
2) वाई:-दुर्मिळ वन्यजीवाचे दर्शन; सर्पमित्रांच्या सतर्कतेने खवल्या मांजर सुरक्षित.

सातारा | वाई दि. १८ : रविवार पेठेतील पटेल वाडा परिसरात सोमवारी रात्री फजल पटेल यांच्या घराजवळ दुर्मिळ खवल्या मांजर आढळून आले. अचानक वन्यजीव दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने सर्पमित्रांना माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत खवल्या मांजराला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
सर्पमित्र अंकुश पवार, शाहरुख पटेल, अजीज शेख, सौरभ कासार आणि तोसिफ मुजावर यांनी काळजीपूर्वक या वन्यजीवाची सुटका केली. खवल्या मांजर पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, घटनेची माहिती वनविभागाचे RFO एस. सी. रेड्डी पाटील व संग्राम मोरे यांना देण्यात आली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर खवल्या मांजर त्यांच्या ताब्यात देण्यात आले. आवश्यक तपासणी केल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
खवल्या मांजर हा दुर्मिळ वन्यजीव असून त्याच्या संवर्धनाची गरज आहे. वन्यजीव आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्याला त्रास अथवा इजा न करता वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. सर्पमित्र आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे दुर्मिळ वन्यजीव सुरक्षितपणे वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला.
3) वाई:-६.३ कोटींच्या आराखड्यातून वाईच्या स्वच्छतेला नवी दिशा.

घराघरातून १०० टक्के कचरा संकलनाचे लक्ष्य; GPS, QR कोडसह तंत्रज्ञानाचा वापर प्रस्तावित.
सातारा | वाई, दि. १८ : ‘स्वच्छ वाई–सुंदर वाई–वारसा जपणारे वाई’ या उद्दिष्टातून वाई शहराच्या घनकचरा व्यवस्थापनासाठी तब्बल ६.३ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. PLAN Foundationच्या वतीने तयार करण्यात आलेला घनकचरा व्यवस्थापनाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) सोमवारी वाई नगरपरिषदेसमोर सादर करण्यात आला. शहरातील कचरा संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया आणि देखरेख अधिक शास्त्रीय व तंत्रज्ञानाधारित करण्यावर या आराखड्यात भर देण्यात आला आहे.
वाई शहरात सध्या दररोज सुमारे २१.३८ टन कचरा निर्माण होतो. लोकसंख्या आणि कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेता २०४६ पर्यंत दररोज सुमारे ३०.२६ टन कचरा निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासाठी सुमारे ३,२०० मालमत्तांचा सर्वेक्षणात्मक अभ्यास करण्यात आला असून, शहरातील ६७ कचरा संवेदनशील ठिकाणांचे (Garbage Vulnerable Points) मॅपिंग करण्यात आले आहे.
सध्या शहरात केवळ ४४ टक्के कचरा वर्गीकरण होत असल्याने हे प्रमाण शंभर टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक घरातून नियमित कचरा संकलन करून ओला, सुका, धोकादायक आणि इतर अशा चार प्रकारांत कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची व्यवस्था प्रस्तावित आहे. कचरा संकलनाच्या वाहनांवर GPS व OBD प्रणाली, तसेच QR कोड आणि रिअल-टाइम मॉनिटरिंगचा वापर करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
सोनापूर येथील विद्यमान चार हजार चौ.फुटांच्या शेडसोबत आणखी सहा हजार चौ.फुटांचे शेड उभारण्याची आवश्यकता असून, संपूर्ण घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी अंदाजे ६.३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
वाईची ओळख असलेल्या कृष्णा नदी, घाट आणि ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठीही आराखड्यात विशेष उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. संत गाडगे महाराजांच्या स्वच्छतेच्या विचारांचा संदर्भ देत नगरसेविका केतकी मोरे पाटणे यांनी नागरिकांच्या सक्रिय सहभागातून शहरात व्यापक स्वच्छता चळवळ उभारण्याचे आवाहन केले.
या बैठकीस नगराध्यक्ष अनिल सावंत, उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के यांच्यासह भाजपचे नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित शिंदे, जीविता जमदाडे आणि शारदा काळे यांची उपस्थिती होती. मात्र इतर काही नगरसेवकांच्या अनुपस्थितीची चर्चा बैठकीनंतर रंगली.
आराखडा कागदावर तयार झाला असला, तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी, सातत्यपूर्ण देखरेख आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यावरच वाईच्या स्वच्छतेचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
4) वाई:-नागपंचमीनिमित्त वाई तालुक्यात भक्तिमय वातावरण; ‘नागोबा यात्रा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद.

सातारा | वाई, दि. १८ : श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा सण असलेल्या नागपंचमीनिमित्त वाई तालुक्यात भक्तिमय आणि पारंपरिक वातावरण पाहायला मिळाले. शहरासह ग्रामीण भागातील नागमंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. विशेषतः महिलांनी नागदेवतेचे पूजन करून पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा केला.
वाई शहरातील पारंपरिक ‘नागोबा यात्रा’ यंदाही उत्साहात पार पडली. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या ऐतिहासिक नागनाथ मंदिरासह परिसरातील विविध नागमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यात्रेनिमित्त खेळणी, प्रसाद, बांगड्या तसेच विविध वस्तूंची दुकाने थाटण्यात आली होती. लहान मुलांसाठी उभारण्यात आलेले पाळणे व मनोरंजनाची साधने यात्रेचे विशेष आकर्षण ठरले. किसनवीर चौकापासून नागमंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर दिवसभर मोठी गर्दी होती.
वन्यजीव संरक्षणाच्या नियमांमुळे जिवंत नागाच्या पूजनाऐवजी महिलांनी नागाच्या मूर्ती, प्रतिमा तसेच वारुळाचे भक्तिभावाने पूजन केले. घराघरांत चिखलाच्या किंवा पितळी नागमूर्तीची स्थापना करून दूध, लाह्या व दुर्वा अर्पण करण्यात आल्या. नागदेवतेला पारंपरिक पुरणाच्या दिंडाचा नैवेद्य दाखविण्यात आला.
निसर्गचक्रातील महत्त्वाचा घटक आणि शेतकऱ्यांचा मित्र मानल्या जाणाऱ्या नागदेवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी वर्गाने शेतातील नांगरणी व खणकामाची कामे टाळली. वाई शहरातील ऐतिहासिक ‘रामाचा गोट’ परिसरातील नागाच्या पारावर पूजेसाठी सुवासिनींच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या.
पूजनानंतर महिला व तरुणींनी पारंपरिक गाणी म्हणत झिम्मा, फुगडी आणि झोक्यांचा आनंद घेतला. या माध्यमातून वाईची समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा उत्साहात जपला गेला.
दरम्यान, यात्रेच्या पार्श्वभूमीवर गर्दीचे नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
5) पाटण:-देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे झिजणे म्हणजेच खरे देशप्रेम : ॲड. सुरेश सावंत.

पाटण | दि. १८ : देशावर केवळ प्रेम व्यक्त करणे म्हणजे देशप्रेम नव्हे, तर देशाच्या प्रगतीसाठी आणि संरक्षणासाठी प्रामाणिकपणे झिजणे, कर्तव्य बजावणे आणि सामाजिक बांधिलकी जपणे म्हणजे खरे देशप्रेम होय, असे प्रतिपादन ॲड. सुरेश सावंत यांनी केले.
मिरगाव-चाफेर येथील इंग्लिश स्कूलमध्ये ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवरत्न सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप तसेच पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या वतीने परिसरातील जिल्हा परिषदेच्या पाच शाळांमधील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पुस्तके, वह्या, पेन, खोडरबर यासह शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ॲड. सावंत म्हणाले, देशप्रेम हे केवळ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीपुरते मर्यादित न राहता शाळा, एसटी बस तसेच सार्वजनिक व सरकारी मालमत्तेचे जतन करण्यातही दिसून आले पाहिजे. देशावर संकट आले असता जात-पात, पक्षभेद बाजूला ठेवून देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हेदेखील खरे देशप्रेम आहे.
स्वातंत्र्य म्हणजे मोकळेपणाने विचार करण्याचा आणि स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार; मात्र स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नव्हे. दुसऱ्याच्या अधिकारांना बाधा न आणता जबाबदारीने वागणे, हेच खरे स्वातंत्र्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आजच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर टाळून त्याचा उपयोग ज्ञानवृद्धीसाठी करावा, चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात आणि वाईट गोष्टींपासून दूर राहावे, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. मिरगाव-चाफेर येथील विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव तालुका तसेच महाराष्ट्र स्तरावर उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिवरत्न सामाजिक संस्थेचे संस्थापक विशाल बाबर, अध्यक्ष, खजिनदार व सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजनबद्ध आयोजन केले. यावेळी पत्रकारांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. सामाजिक उपक्रमांनी यंदाचा ८०वा स्वातंत्र्य दिन अधिक अर्थपूर्ण आणि उत्साहपूर्ण ठरला.





