आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-डॉक्टरांवर हल्ले थांबवा! डोंबिवली घटनेच्या निषेधार्थ वाईत वैद्यकीय क्षेत्राचा एल्गार; तहसील कार्यालयावर धडक मोर्चा.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-डॉक्टरांवर हल्ले थांबवा! डोंबिवली घटनेच्या निषेधार्थ वाईत वैद्यकीय क्षेत्राचा एल्गार; तहसील कार्यालयावर धडक मोर्चा.

सातारा | वाई दि. १२ : डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयात महिला डॉक्टर आणि परिचारिकांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ वाई शहरातील संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र रस्त्यावर उतरले. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्राच्या आवाहनानुसार डॉक्टर, परिचारिका, फिजिओथेरपिस्ट, लॅब तंत्रज्ञ, केमिस्ट आणि विविध वैद्यकीय संघटनांनी काळ्या फिती लावत तहसील कार्यालयावर शांततामय मोर्चा काढून शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात डोंबिवली प्रकरणातील दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची, पीडित महिला डॉक्टर व परिचारिकांना न्याय आणि संपूर्ण सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच राज्यातील सर्व शासकीय, महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही, प्रशिक्षित सुरक्षा रक्षक आणि तातडीची पोलीस प्रतिसाद यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणीही करण्यात आली.
आयएमए, निमा, जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन, केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संघटना आणि फिजिओथेरपिस्ट असोसिएशनसह सरकारी व खासगी रुग्णालयांतील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले.
विशेष म्हणजे आंदोलन सुरू असतानाही डॉक्टरांनी सामाजिक जबाबदारी जपत आपत्कालीन आणि अत्यावश्यक रुग्णसेवा अखंड सुरू ठेवली. त्यामुळे रुग्णांना कोणताही त्रास होऊ दिला नाही.
“आरोग्य कर्मचाऱ्यांवरील वाढते हल्ले थांबवण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. अन्यथा राज्यभर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशारा वैद्यकीय संघटनांनी दिला.
या निवेदनावर आयएमए वाई शाखेच्या अध्यक्षा डॉ. मंगला आहिवळे, सचिव डॉ. लता पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. सतिश बाबर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, आंदोलनात वाई परिसरातील विविध वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी, डॉक्टर, परिचारिका, लॅब टेक्निशियन, फिजिओथेरपिस्ट आणि केमिस्ट प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

2) वाई:-शाळेवर दरडीचं संकट; सभापती ऋतुजा शिंदेंची तात्काळ धाव! १५ लाखांचा निधी मंजूर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता प्रथम.

सातारा | वाई दि. ११ : वाई तालुक्यातील दत्तनगर (पिराचीवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर मुसळधार पावसामुळे दरडीचे गंभीर संकट ओढवले आहे. शाळेच्या पाठीमागील डोंगराचा उतार मोठ्या प्रमाणात खचल्याने मातीचा भराव आणि दगड-गोटे थेट संरक्षण भिंतीलगत येऊन पोहोचले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेत बावधन जिल्हा परिषद गटाच्या सदस्या तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजा शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत तब्बल १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
सततच्या पावसामुळे झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेत शाळेच्या शौचालयाचे आणि किचनशेडचे मोठे नुकसान झाले आहे. आणखी पाऊस झाल्यास उर्वरित डोंगराचा भागही खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत होती. यामुळे संरक्षण भिंत उभारणे, खचलेली माती हटवणे आणि नुकसानग्रस्त भागाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत ऋतुजा शिंदे यांनी संरक्षण भिंतीसाठी ९ लाख रुपये, शौचालय दुरुस्तीसाठी ३ लाख रुपये आणि किचनशेडच्या पत्र्यांसाठी ३ लाख रुपये असा निधी मंजूर करून कामे युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.
यावेळी बोलताना ऋतुजा शिंदे म्हणाल्या, “शाळेची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये, यासाठी स्थानिक मंदिरात तात्पुरती शैक्षणिक व्यवस्था करण्यात येणार आहे.”
या पाहणीवेळी गटशिक्षणाधिकारी किरणकुमार मोरे, अभियंता केदार गायकवाड, चंद्रकांत मांढरे, सर्जेराव कोंडके, सामाजिक कार्यकर्ते युवराज कोंढाळकर, ग्रामसेविका धायगुडे मॅडम, शाळेचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वेळेवर घेतलेला निर्णय, तातडीने मंजूर केलेला निधी आणि शिक्षणाची पर्यायी व्यवस्था यामुळे ग्रामस्थांनी सभापती ऋतुजा शिंदे यांच्या तत्पर व संवेदनशील कार्यशैलीचे कौतुक करत आभार व्यक्त केले.

3) वाई:-“एकाच रात्री ३ घरांवर चोरट्यांचा हल्ला! ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठी चोरी टळली; पसरणीत खळबळ”

सातारा | वाई दि. ११ : वाई तालुक्यातील पसरणी येथील कामाजी माळ परिसरात अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री सलग तीन बंद घरे फोडण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, स्थानिक ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे चोरट्यांचा मोठा डाव फसला आणि तिन्ही घरांमधून कोणतीही चोरी होऊ शकली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल बंडू यादव (रा. यादववाडी, पसरणी) तसेच थोपटे आणि शिर्के यांच्या मालकीच्या बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. मात्र परिसरात संशयास्पद हालचाली दिसताच ग्रामस्थ सतर्क झाले. ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा होत असल्याचे लक्षात येताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी पी.एस.आय. सुर्वे यांनी सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेनंतर कामाजी माळ परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे.

4) मसूर:-लग्नानंतर अवघ्या आठवड्यातच हुंड्याचा छळ! ‘५० हजार, कपाट-पलंग आण; नाहीतर नांदवणार नाही’ — पतीसह चौघांवर गुन्हा.

सातारा | मसूर दि. ११ : लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध मसूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “लग्नात कपाट, पलंग दिला नाही, माहेरून ५० हजार रुपये घेऊन ये; तरच नांदवू,” अशी मागणी करत विवाहितेचा सातत्याने छळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचा विवाह १ मार्च २०२६ रोजी अनिल चंद्रकांत भंडारे (रा. मरळोशी, ता. पाटण) यांच्याशी झाला. विवाहानंतर ९ मार्चपासूनच पती अनिल भंडारे, सासू मालन भंडारे, चुलत जाऊ प्रियांका भंडारे आणि चुलत दीर महेंद्र भंडारे यांनी लग्नात संसारोपयोगी साहित्य, कपाट आणि पलंग न दिल्याचा मुद्दा उपस्थित करत तिचा मानसिक छळ सुरू केला.
“तुझ्या वडिलांनी काहीच दिले नाही,” असे म्हणत वारंवार टोमणे मारणे, फरशीवर झोपण्यास भाग पाडणे, स्वयंपाक व घरकामाच्या कारणावरून अपमान करणे, उपाशी ठेवणे आणि २२ मार्च रोजी पती व सासूकडून मारहाण झाल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर १ एप्रिल रोजी गोड बोलून माहेरी सोडण्यात आले. मात्र, सासरी परत येण्यासाठी “५० हजार रुपये, कपाट आणि पलंग घेऊन आलीस तरच तुला नांदवू,” अशी अट घालण्यात आली. मुलीचा संसार टिकावा म्हणून तिचे वडील व भाऊ समजूत काढण्यासाठी सासरी गेले असता, “तुमची मुलगी वेडी आहे; पैसे आणल्याशिवाय तिला पाठवू नका,” असे म्हणत त्यांना परत पाठविल्याचा आरोपही तक्रारीत आहे.
अखेर सततच्या छळाला कंटाळून पीडितेने मसूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पती अनिल चंद्रकांत भंडारे, सासू मालन चंद्रकांत भंडारे, चुलत जाऊ प्रियांका महेंद्र भंडारे आणि चुलत दीर महेंद्र पांडुरंग भंडारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विक्रम बबनराव पोतेकर करीत आहेत.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button