वाई:-रोटरी क्लब ऑफ वाईचा पदग्रहण समारंभ प्रकल्पांसह उत्साहात संपन्न.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-रोटरी क्लब ऑफ वाईचा पदग्रहण समारंभ प्रकल्पांसह उत्साहात संपन्न.

वाई, दि. 11 : रोटरी क्लब ऑफ वाईचा पदग्रहण समारंभ विविध समाजोपयोगी प्रकल्पांच्या उद्घाटनासह उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी मावळते अध्यक्ष रो. कुणाल शहा यांनी अध्यक्षपदाची धुरा नवनिर्वाचित अध्यक्ष रो. अनघा दातार यांच्याकडे, तर मावळते सचिव अनुपम गांधी यांनी सचिवपदाची सूत्रे रो. अनुराधा जोशी यांच्याकडे सुपूर्द केली.
समारंभाला रोटरी क्लब ऑफ बॉम्बेचे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. संदीप आगरवाला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. स्वाती हेरकळ, सातारा जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या आयुक्त भाग्यश्री फरांदे आणि सहाय्यक प्रांतपाल रो. स्वप्नील परदेशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी चिखली व वरखडवाडी येथील ग्रामस्थांना गांडूळखत निर्मितीसाठी 100 ड्रमचे वाटप करण्यात आले. तसेच धोम हायस्कूल आणि ग्लोरी चिल्ड्रन अकॅडमी, मेणवली या शाळांना हँडवॉश युनिटचे वितरण करण्यात आले. ‘ओंकार स्वरूपा’ या सुमधुर गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पीडीजी रो. स्वाती हेरकळ यांनी केले. यावेळी रोटरी क्लबच्या वर्षारंभ विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मावळते अध्यक्ष रो. कुणाल शहा यांनी आपल्या कार्यकाळातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला, तर नवनिर्वाचित अध्यक्ष रो. अनघा दातार यांनी आगामी वर्षातील सेवा प्रकल्पांची दिशा स्पष्ट करत नव्या संचालक मंडळाची घोषणा केली.
डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जयेशभाई पटेल यांचा संदेश सहाय्यक प्रांतपाल रो. स्वप्नील परदेशी यांनी वाचून दाखवला. कार्यक्रमादरम्यान रो. प्रेरणा ढोबळे, रो. संजीवनी कद्दू आणि रो. जितेंद्र पाठक यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
कृषी आयुक्त भाग्यश्री फरांदे यांनी आपल्या मार्गदर्शनात शेतीविषयक विविध योजना व सातारा जिल्ह्यातील कृषी विकासाबाबत माहिती दिली. प्रमुख पाहुणे रो. संदीप आगरवाला यांनी रोटरी क्लब ऑफ वाईने आजपर्यंत यशस्वीपणे पूर्ण केलेल्या 13 ग्लोबल ग्रँट प्रकल्पांचे विशेष कौतुक करत क्लबच्या समाजाभिमुख कार्याची प्रशंसा केली आणि नव्या अध्यक्षांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. रूपाली अभ्यंकर यांनी केले. या समारंभाला रोटरी क्लब ऑफ पाचगणी, महाबळेश्वर, कराड, सातारा, पाटण आणि मलकापूर येथील रोटेरियन्स, तसेच चिखली, वरखडवाडी, धोम, मेणवली येथील ग्रामस्थ आणि वाई परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




