आरोग्य व शिक्षणक्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-“लेखणी झुकणार नाही… धमक्यांना भीक घालणार नाही!”; पत्रकारांचा आक्रमक एल्गार ‘लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला’चा आरोप; अटक, गुन्हा आणि राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-“लेखणी झुकणार नाही… धमक्यांना भीक घालणार नाही!”; पत्रकारांचा आक्रमक एल्गार
‘लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला’चा आरोप; अटक, गुन्हा आणि राजीनाम्याच्या मागणीसाठी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा.

वाई, दि. २७ : पत्रकारांना कथितरित्या अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपांनंतर वाई तालुक्यात पत्रकारांचा संताप उफाळून आला आहे. “पत्रकारांना धमकावून सत्याचा आवाज दाबण्याचा कुठलाही डाव यशस्वी होऊ देणार नाही,” असा ठाम इशारा देत वाई तालुका मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेने प्रशासनाला निवेदन सादर करून तीव्र आंदोलनाचा एल्गार पुकारला.
पुणे विभागीय अधिस्वीकृती सदस्य तथा सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे आणि डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष संतोष (सनी) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांनी एकजुटीचे शक्तिप्रदर्शन करत प्रशासनाला स्पष्ट शब्दांत बजावले की, “धमकी देणाऱ्यांवर तातडीने कारवाई झाली नाही, तर आंदोलनाची धार आणखी तीक्ष्ण होईल.”
पत्रकार संघटनांनी निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीत पत्रकार हा जनतेचा आवाज असतो. त्या आवाजालाच दाबण्याचा प्रयत्न म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट घाला आहे. त्यामुळे संबंधित प्रकरणात पत्रकार संरक्षण कायद्यासह लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी, नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा आणि राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षिततेची हमी सरकारने द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
जिल्हा उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर म्हणाले, “सत्य मांडणाऱ्यांची लेखणी दाबण्याची भाषा आम्ही कदापि सहन करणार नाही. पत्रकारांना धमकावणाऱ्यांना कायद्याचा चाप बसलाच पाहिजे.”
वाई तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ननावरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “धमक्या देऊन लेखणी थांबेल, असा भ्रम कुणीही बाळगू नये. पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रत्येक प्रयत्न रस्त्यावर उतरून परतवून लावू.”
पत्रकार संघटनांनी प्रशासनाला २४ तासांचा निर्वाणीचा इशारा देत स्पष्ट केले की, या कालावधीत ठोस कारवाई झाली नाही, तर आंदोलन वाईपुरते मर्यादित राहणार नाही. जिल्हाभर आणि राज्यभर संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल. “पत्रकार झुकणार नाही… सत्य थांबणार नाही,” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

2) “पत्रकारांना धमकावणाऱ्यांना माफी नाही!”l
खा. संजय दिना पाटील यांच्या विरोधात साताऱ्यात पत्रकारांचा एल्गार; गुन्हा दाखल करण्याची मागणी.

सातारा, दि. २७ : पत्रकारांबद्दल कथित आक्षेपार्ह भाषा वापरून थेट धमकी दिल्याच्या आरोपावरून शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात साताऱ्यातील पत्रकार आक्रमक झाले असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना निवेदन सादर करण्यात आले. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर झालेल्या या कथित हल्ल्याचा पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध नोंदवला.
महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष तथा सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे आणि मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले.
सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २५ जून रोजी पत्रकारांशी बोलताना खासदार संजय दिना पाटील यांनी कथितरित्या अत्यंत आक्षेपार्ह भाषा वापरत पत्रकारांना धमकी दिली. हा संपूर्ण प्रकार कॅमेरे व ध्वनिमुद्रणात कैद झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अवमान करणाऱ्या या प्रकारावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली.
“पत्रकारांना धमकावून सत्य दडपले जाणार नाही. लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाची प्रतिष्ठा राखावी. पत्रकारांवर दबाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही,” अशी ठाम भूमिका पत्रकार संघटनांनी व्यक्त केली.
या वेळी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष सनी शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रतीक भद्रे यांच्यासह ज्ञानेश्वर भोईटे, उमेश बांबरे, अमित वाघमारे, अजित जगताप, पद्माकर सोळवंडे, प्रवीण शिंगटे, विनीत जवळकर, संदीप राक्षे, रिझवान सय्यद, जावेद खान, प्रमोद इंगळे, संजय शिंदे, गौरी आवळे, मीना शिंदे, अभिजीत माने, सचिन सापते, पलाश जवळकर, आर. डी. भोसले, मंगेश कुंभार, स्वप्नील गवाळे यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पत्रकार व छायाचित्रकार उपस्थित होते.
आता या प्रकरणी पोलीस प्रशासन कोणती कायदेशीर भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

3) वाई:-तोड नाही, जीवदान! वाई न्यायालय आवारातील २८ वृक्षांचे यशस्वी पुनर्रोपण.

वाई
विकासकामे आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल साधण्याचा आदर्श वाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने घालून दिला आहे. वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी अडथळा ठरणारी तब्बल २८ मोठी झाडे तोडण्याऐवजी त्यांचे यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले असून, या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाच्या जागेतील काही जुनी व मोठी झाडे बांधकामात अडथळा ठरत होती. मात्र, वृक्षतोड करण्याऐवजी त्यांना नवजीवन देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला.
सार्वजनिक बांधकाम विभाग, वाईचे उपअभियंता महेश गोंजारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. आवश्यक शासकीय व कायदेशीर परवानग्या मिळविल्यानंतर जेसीबी आणि पोकलंड यंत्रांच्या सहाय्याने झाडे मुळासकट अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आली. या प्रक्रियेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झाडांच्या मुळांना कोणतीही इजा होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली.
यानंतर वाई–सातारा रस्त्याच्या दुतर्फा शास्त्रोक्त पद्धतीने खड्डे तयार करून त्यामध्ये आवश्यक खत व औषधांची प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर सर्व २८ झाडांचे यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले.
या उपक्रमामुळे विकासकामांना गती मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देण्यात आला आहे. प्रशासनाचा संवेदनशील दृष्टिकोन आणि तज्ज्ञांचे अचूक नियोजन यामुळे २८ मौल्यवान वृक्षांना नवजीवन मिळाले असून, वाई व सातारा परिसरातील पर्यावरणप्रेमींकडून या उपक्रमाचे विशेष स्वागत होत आहे.
प्रतिक्रिया
“विकासकामे करताना पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. न्यायालयाच्या इमारतीच्या कामात अडथळा ठरणाऱ्या झाडांना जीवदान देण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी झाला, याचे समाधान आहे.”
— महेश गोंजारी, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाई.

4) सातारा:-ढोल-ताशांच्या गजरात साताऱ्यात भव्य ‘समता दिंडी’; सामाजिक न्याय योजनांची जनजागृती.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शनिवारी सातारा शहरात ढोल-ताशांच्या गजरात भव्य ‘समता दिंडी’चे आयोजन करण्यात आले. सामाजिक समतेचा संदेश देतानाच विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणाऱ्या या दिंडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथून समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सुनील जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दिंडीचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी उपस्थित मान्यवरांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दिंडीत सातारा शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिस्तबद्ध संचलन करत सामाजिक समतेचा संदेश दिला. ढोल-ताशांच्या गजरासह सामाजिक ऐक्य आणि समानतेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
दिंडीचे प्रमुख आकर्षण म्हणजे सामाजिक न्याय विभाग तसेच विविध विकास महामंडळांच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणारे जनजागृती फलक होते. या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रबोधन करण्यात आले.
दिंडीचा समारोप भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी समाज कल्याण अधिकारी श्रोती रकटे, विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, विकास महामंडळांचे प्रतिनिधी तसेच सातारा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

5) कराड:-जनसेवेच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा गौरव! पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार.

कराड तालुका ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेंद्र जयवंतराव जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त कराड तालुका कुस्ती संघ, कला-क्रीडा सांस्कृतिक ट्रस्ट महाराष्ट्र राज्य तसेच मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रशासनातील प्रामाणिक, शिस्तप्रिय आणि जनतेशी आत्मीयतेने वागणारे अधिकारी म्हणून महेंद्र जगताप यांनी कराड तालुक्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कार्याचा आणि समाजाभिमुख सेवाभावाचा गौरव करण्यासाठी कराड तालुका कुस्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ कुस्ती संघटक पै. तानाजी चवरे (साळशिरंबेकर) यांनी सहकाऱ्यांसह त्यांची भेट घेत सन्मानपत्र प्रदान केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी लोकमतचे कराड तालुका प्रमुख प्रमोद सुकरे, मुंबई कामगार केसरी पै. सचिन बागट, सुरेश पाटील, विकास पाटील (भैरवनाथनगर), नितीन मोरे (येवती) तसेच जननायक केसरी पै. किरण चोरगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
उपस्थितांनी पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या कर्तव्यनिष्ठ, लोकाभिमुख आणि प्रभावी कार्यशैलीचे कौतुक करत त्यांना निरोगी, दीर्घायुष्य लाभावे आणि भविष्यातही जनसेवेचे कार्य अशाच तळमळीने सुरू राहावे, अशा शुभेच्छा दिल्या.

6) कराड:-खुलेआम विक्री बंद… पण ‘अंडरग्राउंड’ गुटखा बाजार तेजीत! कराड तालुक्यात काळाबाजाराला उधाण.

राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने अवैध गुटखा विक्रीविरोधात सुरू केलेल्या कठोर कारवाईमुळे कराड शहर आणि तालुक्यातील गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. पूर्वी उघडपणे होणारी गुटखा विक्री जवळपास बंद झाली असली, तरी आता छुप्या पद्धतीने ‘ओळखीच्या ग्राहकां’नाच गुटखा पुरवला जात असल्याचे वास्तव समोर येत आहे. परिणामी, गुटख्याचा बाजार आता पूर्णपणे ‘अंडरग्राउंड’ झाला असून पुरवठा खंडित झाल्याने काळाबाजारही तेजीत आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर राज्यभर अवैध गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू झाली आहे. त्याचा परिणाम कराडमध्येही दिसून येत असला, तरी काही पानटपऱ्या, चहा-नाश्त्याचे स्टॉल आणि किराणा दुकानांमधून गुपचूप गुटखा विक्री सुरू असल्याची चर्चा आहे.
पूर्वी टपऱ्यांवर उघडपणे दिसणारा गुटखा आता पूर्णपणे गायब झाला आहे. मात्र, नियमित ग्राहकांकडून मागणी होताच विक्रेते गुप्तपणे गुटख्याच्या पुड्या देत असून, “इथे खाऊ नका, दूर जाऊन खा,” असा इशाराही देत असल्याचे सांगितले जाते. नवीन ग्राहकांना मात्र थेट नकार देऊन विक्रेते स्वतःची सुरक्षितता जपत आहेत.
प्रशासनाच्या कारवाईमुळे परराज्य व शेजारील जिल्ह्यांतून होणारा गुटख्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. पुरवठा कमी आणि मागणी कायम असल्याने गुटख्याच्या किंमती वाढल्या असून, काही विक्रेते केवळ विश्वासू ग्राहकांनाच जास्त दराने माल पुरवत असल्याचे समोर येत आहे. शहरात साठा ठेवणे धोक्याचे ठरत असल्याने अनेकांनी ग्रामीण आणि निमशहरी भागाकडे मोर्चा वळवल्याची चर्चा आहे.
टपरी चालकांच्या म्हणण्यानुसार, गुटखा विकणाऱ्या टपऱ्यांवर कारवाई होत असताना गुटखा न विकणाऱ्या प्रामाणिक पानटपरी चालकांनाही तपासणीचा त्रास सहन करावा लागत आहे. कारवाईच्या भीतीने सुमारे ३० ते ३५ टक्के टपऱ्यांनी गुटखा विक्री पूर्णपणे बंद केल्याचेही सांगितले जाते.
“एकदा कारवाई झाली की टपरी सील होते, मोठा दंड भरावा लागतो आणि कोर्टाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे आता गुटखा विकणेच बंद केले आहे,” अशी प्रतिक्रिया काही टपरी चालकांनी व्यक्त केली.
राज्यस्तरावर धडक कारवाया सुरू असताना कराड तालुक्यातील स्थानिक अन्न व औषध प्रशासनाची कारवाई तुलनेने कमी असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. गुटख्याचा काळाबाजार पूर्णपणे रोखण्यासाठी आणि अवैध साखळी उद्ध्वस्त करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने अधिक प्रभावी आणि सातत्यपूर्ण मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

7) कराड:-‘स्मार्ट मीटर’ सक्तीला अखेर ब्रेक! हायकोर्टात महावितरणची स्पष्ट भूमिका; ग्राहकांच्या संमतीशिवाय मीटर बदलणार नाही.

कराड | प्रतिनिधी
राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या घडामोडीत, स्मार्ट मीटर बसविण्याबाबत महावितरणने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रिपेड स्मार्ट मीटर बसविणे बंधनकारक नसून ते पूर्णपणे ऐच्छिक आहे. ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय कोणाचाही वीजमीटर बदलला जाणार नाही, असे महावितरणने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला सांगितले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात विद्यमान वीजमीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू होती. मात्र कराडसह अनेक भागांत नागरिक, ग्राहक संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी या मोहिमेला तीव्र विरोध दर्शविला होता. ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर लादले जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. “४८ तासांत स्मार्ट मीटर बसविण्यात येईल,” अशा संदेशांमुळे ग्राहकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांनी ग्राहकांची संमती न घेता मीटर बदलणे हे त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. काही ठिकाणी अधिकारी आणि कंत्राटदारांकडून ग्राहकांवर दबाव टाकला जात असल्याच्याही तक्रारी करण्यात आल्या.
यावर उत्तर देताना महावितरणने न्यायालयात स्पष्ट केले की, प्रिपेड स्मार्ट मीटर स्वीकारणे अथवा नाकारणे हा पूर्णपणे ग्राहकाचा वैयक्तिक निर्णय असेल. कोणत्याही ग्राहकावर स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही. ग्राहकांनी संमती दिल्यानंतरच मीटर बदलले जातील.
महावितरणच्या या भूमिकेमुळे राज्यातील लाखो वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, ग्राहकांच्या हक्कांना प्राधान्य मिळाल्याचे मानले जात आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी नागपूर खंडपीठात होणार असून, न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, महावितरणच्या या प्रतिज्ञापत्रामुळे स्मार्ट मीटरच्या सक्तीबाबत सुरू असलेल्या वादाला मोठा विराम मिळाल्याचे चित्र आहे.

8) कराडच्या सुपुत्र हिम्मतराव थोरात यांना शासनाचा प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर.

कराड तालुक्यातील पश्चिम सुपने गावचे सुपुत्र, रयत सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि प्रगतीशील शेतकरी हिम्मतराव हिंदुराव थोरात (पाटील) यांना महाराष्ट्र शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कराड तालुक्यासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हिम्मतराव थोरात यांनी आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि नाविन्यपूर्ण शेती पद्धतींचा यशस्वी अवलंब करून शेती क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. स्वतःच्या प्रगतीसोबतच परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन, शेतीविषयक नव्या संकल्पना आणि उत्पादनवाढीसाठी सातत्याने प्रयत्न केल्याने ते प्रगतीशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर केला आहे.
या पुरस्काराबद्दल रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील (उंडाळकर), संचालक मंडळ तसेच कारखान्याच्या प्रशासनाने हिम्मतराव थोरात यांचे विशेष अभिनंदन केले. “हा सन्मान एका प्रयोगशील, कष्टाळू आणि शेतीविकासासाठी आयुष्य वाहिलेलभूमीपुत्राचा गौरव आहे,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
पुरस्कारा ची घोषणा होताच पश्चिम सुपने गावात ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. कराड तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी, सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून हिम्मतराव थोरात (पाटील) यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button