वाई:-ज्ञानदानाच्या ३८ वर्षांच्या प्रवासाला मानाचा मुजरा!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-ज्ञानदानाच्या ३८ वर्षांच्या प्रवासाला मानाचा मुजरा!

डॉ.अर्जुन जाधव यांचा सेवागौरव सोहळा उत्साहात; ना.मकरंद पाटील यांच्याकडून कार्याचा गौरव.
सातारा | वाई दि. १२ :
तब्बल ३८ वर्षे ज्ञानदानाचे व्रत जपत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी मोलाचे योगदान देणारे किसन वीर महाविद्यालय, वाई येथील भौतिकशास्त्र विभागाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. अर्जुन साहेबराव जाधव यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा सेवागौरव सोहळा उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास जनता शिक्षण संस्थेचे संचालक मिलिंद पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी ना. मकरंद पाटील म्हणाले, “डॉ. अर्जुन जाधव यांनी आपल्या अफाट ज्ञानाचा उपयोग ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी केला. भौतिकशास्त्रासारखा अवघड विषय विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगण्याचे कसब त्यांच्याकडे आहे. त्यांची ३८ वर्षांची ज्ञानसेवा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”
डॉ. जाधव यांच्या शैक्षणिक कारकिर्दीतील उल्लेखनीय कामगिरीचाही यावेळी गौरव करण्यात आला. भौतिकशास्त्र विषयातील पदव्युत्तर परीक्षेत त्यांनी सुवर्णपदक मिळवून किसन वीर महाविद्यालयाचे पहिले सुवर्णपदक विजेते विद्यार्थी होण्याचा मान मिळवला. कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असतानाच जिद्द, चिकाटी आणि अभ्यासाच्या जोरावर त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन करून शिक्षण क्षेत्रात आदर्श निर्माण केला.
सेवागौरव सोहळ्यात डॉ. आकांक्षा जाधव, प्रा. राजश्री जाधव, प्रा. माधवराव गुरव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, विठ्ठल शिंदे, राजेंद्र भोसले आणि प्रा. मोहन भोसले यांनी मनोगते व्यक्त करून डॉ. जाधव यांच्या कार्यातील आठवणींना उजाळा दिला. प्रा. गणेश चव्हाण व प्रा. गणेश कोरे यांनी त्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, वृषाली चव्हाण, महादेव मस्कर, अविनाश फरांदे यांच्यासह महाविद्यालयातील आजी-माजी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि विविध गावांतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल माने यांनी केले, तर आभार प्रा. गणेश चव्हाण यांनी मानले.
2) वाई:-वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपली! शिक्षकेतर भरतीचा अखेर ‘शासन निर्णय’

कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक पदांचा मार्ग मोकळा; हजारो उमेदवारांना मोठा दिलासा.
सातारा | वाई, दि. १२ : महाराष्ट्रातील शिक्षकेतर कर्मचारी आणि नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांसाठी अखेर मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर पदभरतीला शासनाने हिरवा कंदील दाखवला असून, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे.
या निर्णयामुळे माध्यमिक शाळांमधील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक या महत्त्वाच्या संवर्गातील रिक्त पदे नियमानुसार भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी शासनाकडे निवेदने, पत्रव्यवहार तसेच विविध स्तरांवर बैठका घेत त्यांनी भरतीचा मुद्दा सातत्याने लावून धरला.
दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रधान सचिवांसोबत झालेल्या बैठकीत खांडेकर यांनी शिक्षक भरतीच्या धर्तीवर शिक्षकेतर पदांची भरती तातडीने सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती. या मागणीवर प्रधान सचिवांनी सकारात्मक भूमिका घेतल्यानंतर अवघ्या सहा दिवसांत शासनाने भरतीसंदर्भातील GR जारी केला.
शाळांमध्ये लिपिक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यकांची पदे रिक्त असल्याने शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामकाजावर मोठा ताण निर्माण झाला होता. त्यामुळे हा निर्णय केवळ रोजगाराच्या दृष्टीनेच नव्हे, तर शाळांच्या दैनंदिन व्यवस्थेला गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.
या निर्णयामुळे प्रलंबित पदोन्नती, अनुकंपा नियुक्ती तसेच नव्याने रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
“हा विजय कोण्या एका व्यक्तीचा नसून, महाराष्ट्रातील तमाम शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींच्या एकजुटीचा आणि सातत्यपूर्ण संघर्षाचा विजय आहे,” अशी भावना शिक्षकेतर कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, या निर्णयासाठी घेतलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल वाई तालुका तसेच सातारा जिल्ह्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून शिवाजीराव खांडेकर यांचे अभिनंदन आणि आभार व्यक्त होत आहेत.
संघर्षाला सातत्याची जोड दिली, तर शासनदरबारी न्याय मिळवता येतो, हे शिक्षकेतर भरतीच्या या निर्णयाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.
3) वाई:-जि.प.शाळांना नवा चेहरा देण्यासाठी ऋतुजा शिंदे मैदानात; विकासकामांना मिळणार गती!

सातारा | वाई, दि. १२ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासोबतच विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार भौतिक सुविधा मिळाव्यात, यासाठी महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती ऋतुजा विराज शिंदे यांनी वाई तालुक्यातील वरखडवाडी आणि पांडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. त्यांच्या या दौऱ्यामुळे शाळांच्या विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
वरखडवाडी येथील शाळेच्या पाहणीदरम्यान सभापती शिंदे यांनी वर्गखोल्या, पटांगण, स्वच्छतागृहे, उपलब्ध भौतिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी शाळेतील अडचणी व गरजा जाणून घेतल्या. तसेच शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आवश्यक सूचना केल्या.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप फणसे, उपाध्यक्ष सुधीर फणसे, शिक्षण विस्तार अधिकारी वाळेकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी राहुल आदमूलवाड, मेणवली केंद्राचे केंद्रप्रमुख गाडे, मुख्याध्यापिका भारती कांबळे, शाखा अभियंता केदार गायकवाड आणि समग्र शिक्षा अभियंता पोरे मॅडम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यानंतर सभापती शिंदे यांनी पांडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेलाही भेट देऊन शाळेतील विकासकामे, विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधा आणि शैक्षणिक वातावरणाची पाहणी केली. शाळेच्या आवश्यक गरजा जाणून घेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधितांशी चर्चा केली.
यावेळी सरपंच संतोष फणसे, उपसरपंच सुभाष चव्हाण, केंद्रप्रमुख गाडे, मुख्याध्यापक नितीन फरांदे, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दर्जेदार शिक्षण, भक्कम पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यांना प्राधान्य देत जिल्हा परिषद शाळांच्या विकासाला चालना देण्याचा संदेश या दौऱ्यातून मिळाला. सभापती ऋतुजा शिंदे यांच्या प्रत्यक्ष पाहणीमुळे शाळांच्या गरजा आणि विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली.
4) वाईत सार्वजनिक ठिकाणे बनली मद्यपींचे अड्डे!

महिला-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर; पोलिसांच्या गस्तीवरही नागरिकांचे सवाल.
वाई, दि. १२ : दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या वाई शहराच्या लौकिकाला सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या मद्यपींच्या उच्छादाने गालबोट लागत आहे. शहरातील नदीघाट, बसस्थानक परिसर, रविवार पेठ, सोनगीरवाडी स्मशानभूमी आणि उद्यान परिसरात सायंकाळनंतर मद्यपींच्या टोळक्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
कृष्णा नदीकाठ आणि गणपती घाटासारख्या ऐतिहासिक परिसरांसह शहरातील विविध सार्वजनिक जागांवर काही जण उघडपणे मद्यपान करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. नशेत आरडाओरड, शिवीगाळ, भांडणे आणि असभ्य वर्तनाचे प्रकार घडत असल्याने या परिसरातील वातावरण बिघडत आहे. काही ठिकाणी अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचाही वावर असल्याचा आरोप केला जात आहे.
महिला-विद्यार्थिनींना नाहक मनस्ताप
सायंकाळच्या वेळेत कामावरून घरी परतणाऱ्या महिला, बाजारपेठेतून जाणाऱ्या नागरिक तसेच शिकवणीवरून परतणाऱ्या विद्यार्थिनींना मद्यपींच्या टोळक्यांचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी आहेत. असभ्य शेरेबाजी आणि त्रासामुळे महिलांना या परिसरातून जाणेही धोक्याचे वाटत असल्याचे नागरिक सांगतात.
तक्रारी करूनही परिस्थिती जैसे थे?
या प्रकाराबाबत नागरिकांकडून पोलिसांकडे वारंवार तक्रारी होत असतानाही रात्रीच्या वेळी प्रभावी पोलीस गस्त आणि कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. कारवाईचा धाक नसल्याने सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांचे धाडस वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वाई पोलिसांसमोर आता कारवाईचे आव्हान
शहरातील सार्वजनिक ठिकाणांना मद्यपींचे अड्डे होण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. संवेदनशील ठिकाणी रात्रीची गस्त वाढवून सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा वाईकर नागरिकांनी व्यक्त केली आहे.
5) सातारा:-दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाला आता गती!

‘निवारा’ नव्हे, १८ नागरी सुविधांसह सन्मानाचे जीवन
सुधारित पुनर्वसन धोरण लवकरच; मंत्रालयातील बैठकीत महत्त्वाचे निर्णय — भैरवगड, पाटणसह कराड उत्तरच्या प्रश्नांवर प्रशासनाला निर्देश.
सातारा | दि. १२ : अतिवृष्टी, महापूर, भूस्खलन आणि दरडींच्या संकटाने घरदार गमावलेल्या नागरिकांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न आता निर्णायक टप्प्यावर आला आहे. आपत्तीग्रस्तांना केवळ चार भिंतींचा निवारा न देता रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण यांसह १८ मूलभूत नागरी सुविधांनी युक्त सुरक्षित आणि सन्मानजनक जीवन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून सुधारित पुनर्वसन धोरण तयार करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेऊन राज्यातील दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित प्रस्ताव, जागेचे प्रश्न, मूलभूत सुविधांचा अभाव आणि पुनर्वसन प्रक्रियेतील अडथळे यावर बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, रोजगार हमी मंत्री ना. भरत गोगावले, आ. मनोज घोरपडे, आ. शेखर निकम, आ. बाबाजी काळे, आ. शंकर मांडेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नव्या धोरणात स्थानिक वास्तवाला प्राधान्य देण्यात येणार असून लोकप्रतिनिधींच्या व्यवहार्य सूचनांचा समावेश केला जाणार आहे. पुनर्वसित गावांमध्ये केवळ घरे उभारून प्रशासनाची जबाबदारी संपणार नसून, आवश्यक १८ नागरी सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात येणार आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील भैरवगड येथील भूस्खलनग्रस्त कुटुंबांचे सासपडे येथे पुनर्वसन करण्याच्या प्रस्तावावर पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच पाटण गावाचे गायरान जमीन गट क्रमांक ४०६ मध्ये पुनर्वसन करण्यासंदर्भात आवश्यक प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
कराड उत्तर मतदारसंघातील पुनर्वसित गावांमध्ये अद्याप प्रलंबित असलेल्या नागरी सुविधांचा प्रश्नही बैठकीत ऐरणीवर आला. संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून ही कामे तातडीने मार्गी लावावीत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
“आपत्तीग्रस्तांना केवळ निवारा देणे हा शासनाचा उद्देश नाही; त्यांना सुरक्षित वातावरणात सन्मानाने जगता यावे, यासाठी आवश्यक सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करून सुधारित धोरण अंतिम करण्यात येईल आणि लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केले जाईल,” असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.
या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील भैरवगड, पाटण आणि कराड उत्तरसह राज्यातील अनेक दरडग्रस्त व पूरग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनाला नवी दिशा आणि गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
6) सातारा:-चिमुकल्या हातात तिरंगा, मनात राष्ट्राभिमान!

सातारा जिल्हा परिषदेचा ‘बाल देशभक्त अभियान’ उपक्रम; अंगणवाड्यांमध्ये तीन दिवस रंगणार देशप्रेमाचा उत्सव.
सातारा | दि. १२ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर बालमनात देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रीय एकात्मतेची बीजे रुजवण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या वतीने ‘बाल देशभक्त अभियान’ राबविण्यात येणार आहे. दि. १३ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये हा उपक्रम उत्साहात साजरा केला जाणार आहे.
चिमुकल्यांना देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची ओळख व्हावी आणि तिरंग्याबद्दल अभिमानाची भावना निर्माण व्हावी, यासाठी खेळ, देशभक्तीपर गीते, गोष्टी, चित्रकला, रंगभरण, ठसेकाम, वेशभूषा आणि विविध सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले आहे. बालवयात मिळालेले संस्कार आयुष्यभर सोबत राहतात, या विचारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
केवळ स्वातंत्र्यदिनापुरता उत्सव मर्यादित न ठेवता देशप्रेम आणि राष्ट्रनिष्ठा हा बालकांच्या दैनंदिन संस्कारांचा भाग बनविण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक तसेच स्थानिक नागरिकांनी सहभागी होऊन बालकांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
“बालमनात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटवणे ही सामूहिक जबाबदारी!”
“आजची अंगणवाडीतील चिमुकली मुले ही उद्याच्या भारताची जबाबदार नागरिक आहेत. त्यांच्या कोवळ्या मनावर देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचे संस्कार रुजवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. ‘बाल देशभक्त अभियान’ हा केवळ तीन दिवसांचा उपक्रम नसून, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालमनात राष्ट्रप्रेमाची कायमस्वरूपी ज्योत प्रज्वलित करण्याचा जिल्हा परिषदेचा संकल्प आहे.”
— ऋतुजा विराज शिंदे, सभापती, महिला व बालकल्याण समिती, सातारा जिल्हा परिषद
तीन दिवस… तीन देशभक्तीचे रंग!
१३ ऑगस्ट — ‘देशभक्ती रंगांमध्ये’
ठसेकामातून तिरंगा साकारणे आणि तिरंगा रंगभरणाच्या माध्यमातून बालमनात देशाभिमान जागविणे.
१४ ऑगस्ट — ‘माझा देश, माझा अभिमान’
स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषेत बालकांचा सहभाग तसेच देशभक्तीपर वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन.
१५ ऑगस्ट — ‘स्वातंत्र्यदिन विशेष’
जिल्हा परिषद शाळांमध्ये ध्वजारोहण, राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीते आणि प्रभातफेरीच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित केला जाणार.
7) नांदलापूर:-प्रज्ञाशोध, नवोदय अन् मंथन परीक्षेत १० विद्यार्थ्यांची दमदार कामगिरी; यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव.

नांदलापूर | दि. १२ :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि जिद्द असेल तर यशाची शिखरे गाठता येतात, हे नांदलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. प्रज्ञाशोध, नवोदय आणि मंथन या विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तब्बल १० विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटविला.
इयत्ता चौथीतील स्वरा धर्मराज गायकवाड, स्वरांजली उमाजी ढगे आणि पियुष निषाद यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत पात्रता मिळवली. तर इयत्ता पाचवीतील शुभ्रा प्रवीण शिर्के, अथर्व पांडुरंग कुंभार, प्रांन्सी निषाद आणि रुद्राक्ष अभिजीत येडगे यांनी नवोदय परीक्षेत यश संपादन केले. विशेष म्हणजे प्रांन्सी निषाद हिने शिष्यवृत्ती परीक्षेतही यश मिळवत आपल्या गुणवत्तेची चमक दाखवली.
मंथन परीक्षेत इयत्ता तिसरीतील पल्लवी सचिन पवार आणि शिवानी अमोल कचरे या विद्यार्थिनी पात्र ठरल्या. एकाच शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पालक, ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमींकडूनही विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीतर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. समितीचे अध्यक्ष शिवाजीराव थोरात, उपाध्यक्ष दिनेश शिर्के, तसेच स्वरूप निकम, सुरेश ढगे, कविता ढेबे, माळी मॅडम, ईश्वर गोळे, मनोज गायकवाड आणि लहू जाधव यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शाळेचे शिक्षक सातपुते सर, पाटील मॅडम, शिर्के मॅडम, कुंभार मॅडम, रवलेकर मॅडम आणि कोमल शिर्के उपस्थित होते.
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा आणि शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाल्यास मोठ्या स्पर्धात्मक परीक्षांमध्येही यश मिळविता येते, याची प्रेरणादायी झलक नांदलापूरच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिली आहे.
8)
शिरवळ जिमखाना बुद्धिबळ स्पर्धेत M.E.S. इंग्लिश मीडियम स्कूलची हॅटट्रिक; सहा विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
शिरवळ दि. १२ : शिरवळ जिमखाना आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत M.E.S. English Medium School, Shirwal ने आपला दबदबा कायम राखत सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी कबुले हॉल, शिरवळ येथे झालेल्या या स्पर्धेत शाळेच्या सहा बुद्धिबळपटूंनी विविध वयोगटात उल्लेखनीय यश मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. विद्यार्थ्यांनी बुद्धिमत्ता, चिकाटी आणि एकाग्रतेचे उत्कृष्ट प्रदर्शन करत हे यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशाबद्दल महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, क्रीडावर्धिनीचे पदाधिकारी, शाळा समिती, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, १९९६ साली स्थापन झालेली M.E.S. English Medium School ही शिरवळमधील पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा असून, शाळेत शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा सुविधांना विशेष महत्त्व दिले जाते,
9) पावनखिंडीत पोवाड्याचा हुंकार! बाजीप्रभूंच्या शौर्यगाथेने दुमदुमली ऐतिहासिक भूमी
६० ट्रेकर्स झाले इतिहासाच्या जागराचे साक्षीदार
सातारा | पावनखिंड, दि. १२ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यरक्षणासाठी प्राणांची बाजी लावणारे वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या अतुलनीय शौर्याला पावनखिंडीत पोवाड्याच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. शिव राष्ट्र ट्रेकर्स, सातारा यांच्या वतीने आयोजित ‘पन्हाळा ते पावनखिंड’ पदभ्रमण मोहिमेच्या समारोपप्रसंगी शाहीर शरद यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या दमदार पोवाड्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला.
पन्हाळगड ते पावनखिंड असा पायी प्रवास पूर्ण करून आलेल्या सातारा जिल्ह्यातील सुमारे ६० ट्रेकर्स तसेच पर्यटकांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक जागर रंगला. पोवाड्यातून बाजीप्रभूंच्या पराक्रमाची, त्यागाची आणि स्वराज्यनिष्ठेची गाथा प्रभावीपणे मांडण्यात आली. ऐतिहासिक भूमीत घुमलेल्या पोवाड्याच्या शब्दांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले.
या सादरीकरणासाठी शाहीर शरद यादव यांना सचिन पवार, उद्धव निकम आणि राजेंद्र गायकवाड (बोपर्डी) यांनी सहकार्य केले. विश्वनाथ कांबळे यांनी ढोलकीची दमदार साथ देत सादरीकरणात रंगत आणली.
शाहीर शरद यादव हे जिल्हा परिषद नागेवाडी शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून, पंचायत समिती वाईच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणी ऐतिहासिक पोवाड्यांचे गायन व सादरीकरण करून नव्या पिढीपर्यंत इतिहास आणि शिवकालीन शौर्याची गाथा पोहोचविण्याचे कार्य करीत आहेत.
सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या पदभ्रमण मोहिमेत ६० ट्रेकर्सनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी शिव राष्ट्र ट्रेकर्सचे अध्यक्ष सचिन सावंत, कार्याध्यक्ष उद्धव पवार, सचिव सचिन जाधव, कोषाध्यक्ष रमेश चव्हाण, नीलेश पोरे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
10) “हक्काची घरे द्या, अन्यथा १५ ऑगस्टला उपोषण!”
झोपडपट्टीधारकांचा कराड नगरपरिषदेला थेट इशारा; कचरा डेपो, दुर्गंधी, संविधान भवन अन् उर्दू शाळेचे प्रश्नही ऐरणीवर
कराड | दि. ११ : झोपडपट्टीधारकांच्या हक्काच्या घरांचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवणाऱ्या प्रशासनाविरोधात आता संतापाचा उद्रेक झाला आहे. पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे मिळावीत, पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लागावा, यासह विविध प्रलंबित प्रश्नांवर १५ ऑगस्ट रोजी कराड नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एकदिवसीय उपोषण करण्याचा इशारा जनहिताय फाउंडेशन (हजारमाची, कराड) यांनी दिला आहे.
याबाबत नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, झोपडपट्टीधारकांचा तातडीने सर्व्हे करून पुनर्वसन करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. बाराडबरी परिसरातील घनकचरा प्रकल्पालगतच्या धोकादायक झोपड्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांचा प्रश्नही गंभीर बनला असून, झोपड्यांच्या दुरुस्तीला परवानगी द्यावी किंवा संबंधित कुटुंबांचे नियमानुसार पुनर्वसन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, घनकचरा व बायोगॅस प्रकल्पातून पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या समस्येवर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मुजावर कॉलनीतील संविधान भवन आणि उर्दू शाळेचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून ते नागरिक व विद्यार्थ्यांसाठी खुले करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच परिसरातील कचरा डेपो हटवून त्या जागेचा उपयोग बगीचा किंवा विद्यार्थ्यांसाठी मैदान म्हणून करावा, वाढत्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.
या सर्व प्रश्नांवर तातडीने निर्णय घेऊन लेखी उत्तर द्यावे, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एकदिवसीय उपोषण करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा फाउंडेशनने दिला आहे.
हक्काच्या घरांसह मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी आता झोपडपट्टीधारक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असल्याने, नगरपरिषद प्रशासन या इशाऱ्याची दखल घेऊन काय निर्णय घेते, याकडे कराडकरांचे लक्ष लागले आहे.


RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION



