कृषी व व्यापारक्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-“वाईच्या विकासाशी पंगा घेऊ नका; सावंतांचा थेट इशारा!” “दबावाला झुकणार नाही; विकास थांबणार नाही!”

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-“वाईच्या विकासाशी पंगा घेऊ नका; सावंतांचा थेट इशारा!”
“दबावाला झुकणार नाही; विकास थांबणार नाही!”

वाई | दि. ११ : वाई शहरातील विकासकामांवरून सुरू झालेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. विकासकामांमध्ये राजकारण आणून अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल, तर तो वाईकरांच्या हिताविरोधात आहे. विकासाची चाके रोखण्याचे कोणतेही प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा सावंत यांनी दिला.
शहरातील विविध विकासकामांबाबत काही जणांकडून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “विरोध करायचा असेल तर मुद्द्यांवर करा; सूचना असतील तर द्या. मात्र केवळ राजकीय हेतूने विकासकामांना विरोध करून वाईकरांचे नुकसान करू नका,” असे त्यांनी सुनावले.
नगराध्यक्षपदाची जबाबदारी ही जनतेने विश्वासाने सोपवली असून त्या विश्वासाला पात्र ठरणे हेच आपले प्राधान्य असल्याचे सावंत यांनी सांगितले. “वाईकरांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. हा विश्वास माझ्यासाठी सर्वांत मोठी ताकद आहे. पद मिळाले म्हणून काम करत नाही, तर जनतेने दिलेली जबाबदारी म्हणून काम करीत आहे,” असे ते म्हणाले.
‘माझ्या कामाच्या आड येण्याचा प्रयत्न करू नका’
आपल्या कामकाजावर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना सावंत म्हणाले, “लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून शहराच्या हिताचे निर्णय घेण्याचा मला अधिकार आणि त्यासोबतच जबाबदारीही आहे. निर्णयांवर चर्चा करा, प्रश्न विचारा; पण कामच थांबविण्याचा प्रयत्न करू नका.”
आपली राजकीय वाटचाल कोणत्याही मोठ्या राजकीय घराण्याच्या सावलीतून झालेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “मी सर्वसामान्य घरातून पुढे आलो आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नांची मला जाणीव आहे. त्यामुळे जनतेच्या अडचणी समजून घेऊन काम करणे हीच माझी भूमिका आहे,” असे सावंत यांनी सांगितले.
वृक्षछाटणीवरून विरोधकांना प्रत्युत्तर
मंडई परिसरातील वृक्षछाटणीच्या मुद्द्यावरून होत असलेल्या टीकेलाही सावंत यांनी उत्तर दिले. मंडई परिसरातील काही झाडांमुळे नागरिक, व्यापारी तसेच बँक परिसरातील लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. काही झाडे वाळवीमुळे कमकुवत झाल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“वृक्ष वाचले पाहिजेत, पर्यावरण जपले पाहिजे, याबाबत माझ्या मनात कोणताही प्रश्न नाही. मात्र एखाद्या झाडामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होत असेल, तर त्याकडेही गांभीर्याने पाहावे लागते. विकास आणि पर्यावरण यांची सांगड घालून निर्णय घेणे आवश्यक आहे,” असे सावंत म्हणाले.
आपण स्वतः शेतकरी असल्याचा दाखला देत त्यांनी सांगितले की, “झाडांचे महत्त्व आम्हाला चांगलेच माहीत आहे. माझ्या शेतात आणि प्रकल्पाच्या परिसरात शेकडो झाडे लावून ती जगवली आहेत. त्यामुळे वृक्षप्रेमाच्या नावाखाली राजकीय आरोप करणे योग्य नाही.”
‘सूडाचे राजकारण करायचे नाही’
राजकीय संघर्षाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सावंत यांनी सूडाच्या राजकारणाला स्पष्ट नकार दिला. “मला कोणाची जिरवाजिरवी करायची नाही. कोणाला खाली खेचणे किंवा राजकीयदृष्ट्या संपवणे हा माझा हेतू नाही. माझे लक्ष्य एकच आहे—वाईचा विकास आणि वाईकरांचे हित,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
वैयक्तिक टीका आणि राजकीय आरोपांमुळे विकासाचा मुद्दा बाजूला पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. “मतभेद हे लोकशाहीत असतात. पण मतभेदांचे रूपांतर विकासाला विरोध करण्यात होऊ नये. शहराच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर सर्वांनी एकत्र बसून चर्चा केली पाहिजे,” असे सावंत यांनी स्पष्ट केले.
‘माझ्यामागे खुर्ची नाही, जनतेची ताकद आहे’
आपल्याला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न झाला तरी विकासाचा अजेंडा सोडणार नसल्याचे सावंत यांनी ठणकावून सांगितले.
“मला पदाची ताकद दाखवायची नाही. माझ्या पाठीशी वाईकरांचा विश्वास आहे. त्यामुळे कुणाच्या दबावाला घाबरून किंवा कुणाच्या आरोपांमुळे मी विकासाची कामे थांबवणार नाही,” असे त्यांनी सांगितले.
वाईच्या भविष्यासाठी सर्वांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचे आवाहन करत सावंत म्हणाले, “वाईचा विकास ही कोणत्याही एका व्यक्तीची मालमत्ता नाही. हा प्रत्येक वाईकराच्या भवितव्याचा प्रश्न आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्र येऊया.”
दरम्यान, सर्व संबंधित मार्गदर्शक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांशी चर्चा करण्याची तयारी असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले. “माझ्याकडून काही चूक होत असेल तर सांगा, सूचना द्या. गरज पडल्यास दोन पावले मागे घेण्याचीही माझी तयारी आहे. मात्र केवळ विरोधासाठी विरोध स्वीकारला जाणार नाही. जनतेची सेवा आणि वाईचा विकास हा माझा अजेंडा आहे,” असे त्यांनी सांगितले.
“माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही; तो वाईच्या विकासासाठी आहे. त्यामुळे विकासाच्या वाटेवर अडथळे न आणता सर्वांनी सहकार्य करावे. वाईकरांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी शेवटपर्यंत काम करत राहणार,” असा निर्धार नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी व्यक्त केला.

2) सातारा:-दशमी’त गौरी इंगवलेचा दमदार अवतार; पडद्यावर दिसणार धगधगता अंदाज!

‘पांघरूण’नंतर थेट ‘दशमी’त आव्हानात्मक भूमिका; फर्स्ट लूकने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता.

सातारा | प्रतिनिधी :
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री गौरी इंगवले आता आगामी ‘दशमी’ या चित्रपटातून एका दमदार आणि आव्हानात्मक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकने सोशल मीडियासह रसिकांचे लक्ष वेधून घेतले असून, गौरीचा आक्रमक आणि वेगळा अंदाज चर्चेचा विषय ठरला आहे.
‘रावण दहन दसऱ्यालाच…’ या टॅगलाइनसह समोर आलेल्या पोस्टरमध्ये रक्तरंजित जखमा, आक्रमक भाव आणि गूढ वातावरणाची झलक पाहायला मिळते. त्यामुळे ‘दशमी’ हा केवळ मनोरंजनाचा चित्रपट नसून थरार, संघर्ष आणि सामाजिक आशयाचा वेध घेणारा सिनेमा असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
योगेश भोसले यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात गौरी इंगवले महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. ‘पांघरूण’सारख्या चित्रपटातून अभिनयाची ताकद दाखवलेल्या गौरीने यावेळी अधिक आव्हानात्मक भूमिका स्वीकारल्याचे दिसून येते.
चित्रपटात महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, विजय निकम, शाम माशाळकर, प्रसन्न केतकर, देवेंद्र गायकरवाड, राज कुंदन यांच्यासह अनेक कलाकारांच्या भूमिका आहेत. त्यामुळे ‘दशमी’च्या कलाकारांची फळीही दमदार आहे.
ऑक्टोबर २०२६ मध्ये चित्रपटगृहात दाखल होणाऱ्या ‘दशमी’च्या फर्स्ट लूकनेच वातावरण तापवले असून, गौरी इंगवलेच्या या नव्या भूमिकेत नेमकं काय दडलंय? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

3) दहिवडी:-नव्या मोबाईलचा वाद पेटला; मद्यधुंद पतीने पत्नीवर चाकू चालवला!

सातारा | दहीवडी, दि. १० : नव्या मोबाईलच्या खरेदीवरून सुरू झालेला किरकोळ वाद चांगलाच विकोपाला गेला. मद्यधुंद पतीने पत्नीशी शिवीगाळ व दमदाटी करत चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना माण तालुक्यातील आंधळी (देशपांडकी वस्ती) येथे ८ ऑगस्ट रोजी रात्री घडली. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, पतीविरोधात दहीवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका सयाजी चव्हाण (वय ३०) या पती सयाजी हरीबा चव्हाण, मुलगी आणि मुलासह आंधळी (देशपांडकी वस्ती) येथे राहतात. सयाजी याला दारूचे व्यसन असून तो मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.
८ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास नव्या मोबाईलच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढत गेल्यानंतर मद्यधुंद सयाजी याने पत्नीला शिवीगाळ व दमदाटी करत चाकूने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात प्रियंका गंभीर जखमी झाल्या.
दरम्यान, घरातील आरडाओरड ऐकून दीर पंकज हरीबा चव्हाण, जाऊ निकीता चव्हाण, सासू कमल आणि सासरे हरीबा यांनी घटनास्थळी धाव घेत भांडण सोडवले. त्यानंतर जखमी प्रियंका यांना उपचारासाठी दहीवडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेप्रकरणी प्रियंका चव्हाण यांच्या तक्रारीवरून सयाजी हरीबा चव्हाण याच्याविरुद्ध दहीवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश हांगे करत आहेत.

4) कराड:-कर्ज वसुलीला गेला अन् दगड-दांडक्यांनी हल्ला! कराडमध्ये फायनान्स एजंटला बेदम मारहाण; दोघांवर गुन्हा.

सातारा | कराड, दि. १० :
कर्जाच्या वसुलीसाठी गेलेल्या फायनान्स कलेक्शन एजंटला दारूच्या नशेत दोघांनी शिवीगाळ करत दगड आणि दांडक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना कराडमधील दांगटवस्ती, आगाशिवनगर येथे घडली. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत अनंत पालकर (वय २७, रा. विश्रामनगर, मलकापूर, कराड) हे ‘साईसिद्धी एजन्सी’मध्ये फायनान्स कलेक्शन एजंट म्हणून कार्यरत आहेत. ५ ऑगस्ट रोजी रात्री ते कर्जवसुलीच्या कामानिमित्त दांगटवस्ती, आगाशिवनगर येथे गेले होते.
यावेळी आरोपी रोहित चंद्रकांत लाखे याने फोन करून पालकर यांना बोलावून घेतले. त्यानंतर दारूच्या नशेत त्यांच्याशी शिवीगाळ करत जमिनीवरील दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला. दरम्यान, दुसरा आरोपी मोहित चंद्रकांत लाखे तेथे आला. त्यानेही ‘तुला मस्ती आली आहे का?’ असे म्हणत दांडक्याने पालकर यांच्या डोक्यात मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या पालकर यांना उपचारासाठी कराड येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यानुसार रोहित चंद्रकांत लाखे आणि मोहित चंद्रकांत लाखे (दोघे रा. दांगटवस्ती, आगाशिवनगर, कराड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सतीश पाटील करीत आहेत.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button