कराड:-श्री शिवाजी विद्यालयात व्यसनमुक्ती शपथ कार्यक्रम उत्साहात.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कराड:-श्री शिवाजी विद्यालयात व्यसनमुक्ती शपथ कार्यक्रम उत्साहात.

कराड :-श्री शिवाजी शिक्षण संस्था ट्रस्ट, कराड संचलित श्री शिवाजी विद्यालय, कराड येथे जिल्हा परिषद शालेय विभाग, सातारा आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, शाखा कराड यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती शपथ कार्यक्रम उत्साहात पार पडला.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय तसेच नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यांच्या सहकार्याने प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने देशातील नागरिकांना व्यसनमुक्त करण्यासाठी ‘१० कोटी नशामुक्ती प्रतिज्ञा महाअभियान’ सुरू करण्यात आले आहे. हे अभियान राष्ट्रीय जनआंदोलन म्हणून राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. टी. डी. जाधव यांनी केली. डिजिटल युगात युवक नकळत विविध व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता वाढली आहे. चांगले चारित्र्य व व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, शाखा कराड यांच्या वतीने सुप्रिया दीदी व विद्या दीदी उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना ध्यानधारणेचे महत्त्व सांगताना, ध्यानामुळे आत्मविश्वास वाढण्यास तसेच तणावावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते, असे स्पष्ट केले. आत्मविश्वासाचा अभाव असलेली व्यक्ती तणावाच्या आहारी जाऊ शकते; त्यामुळे नियमित ध्यानधारणा, सकारात्मक विचार आणि उत्तम संगत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“आजचा युवक हेच उद्याच्या भारताचे भविष्य आहे. भारताला समृद्ध, सशक्त आणि महान बनवायचे असेल, तर आजचा तरुण व्यसनमुक्त असणे आवश्यक आहे,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
व्यसनमुक्त जीवनासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना ‘पाच मंत्र’ सांगितले—मोठे स्वप्न, चांगले मित्र, चांगले विचार, दररोज ईश्वराचे ध्यान आणि श्रेष्ठ चारित्र्य.
भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त भारताचा संकल्प केला. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पवार व्ही. आर. यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. रोडे ए. बी. यांनी केले. कार्यक्रमास विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





