वाई:-जनता शिक्षण संस्थेने बदलती नवीन आव्हाने स्वीकारावीत : प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे
पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-जनता शिक्षण संस्थेने बदलती नवीन आव्हाने स्वीकारावीत : प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे

संस्थेच्या हीरकमहोत्सवानिमित्त गुंफले पहिले पुष्प
वाई : दि. १२ ऑगस्ट २०२६
जनता शिक्षण संस्था ही थोर स्वातंत्र्यसेनानी किसन वीर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रतापराव भोसले व नेतेमंडळी यांच्या त्यागातून उभा राहिली आहे. या लोकप्रतिनिधींनी ६० वर्षांपूर्वी जनसामान्यांच्या शिक्षणाचे स्वप्न पाहिले. आज आपण हीरकमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना बदलती नवीन आव्हाने स्वीकारून ते स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करावा. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमातील विशेष व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायण चौधरी, संचालक सुरेश यादव, सुनील शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, नंदाभाऊ जाधव, भैय्यासाहेब जाधवराव, मोहनआबा भोसले, ॲड्. जयवंतराव केंजळे तसेच संस्थेचे इतर सन्माननीय पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य लवटे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात आपले शिक्षण कसे असावे याचे स्वप्न महात्मा गांधी पाहत होते. त्यांनी नई तालीमच्या माध्यमातून शिक्षणपद्धती विकसित केली. स्वातंत्र्यानंतर सार्वत्रिक शिक्षणपद्धती आणि व्यावसायिक शिक्षण या दोन स्तरांवर शिक्षणाचा विकास झाला. कोणत्याही बालकाची तीन ते सहा या वयोगटात खरी जडणघडण होते. त्यामुळे बालवाडी पासून शिक्षणाचा विचार व्हायला हवा. युरोपमध्ये पीएच.डी. झालेले शिक्षक बालवाडीत शिकवतात त्यामुळे वर्तमानकाळात आपल्यालाही बालशिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जगात फिनलंडची शिक्षण पद्धती सर्वश्रेष्ठ आहे. बालवाडी व प्राथमिक शाळेमध्ये उत्तम नागरिक घडतो. त्यामुळे उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रथम बालवाडीकडे लक्ष द्यावे लागेल. महाविद्यालयांनी स्वावलंबी विद्यार्थी घडवावा. महाराष्ट्रातील नागरिकांची क्रयशक्ती कमी होत आहे. शिक्षणाने ती वाढायला हवी. त्यासाठी नवनवीन विकासाची परिमाणे मांडायला हवीत. ज्यांना स्वप्न पडत नाही त्यांना भविष्य नाही आणि ज्यांना प्रश्न पडत नाही ते घडू शकत नाहीत असे त्यांनी मत व्यक्त केले. डॉ. अब्दुल कलाम हे विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी संवाद साधत असत. शिक्षक क्रांती घडवू शकतात हे त्यांना माहिती होते. शिक्षकांनी विवेक जागृत ठेवून शैक्षणिक क्रांती घडवायला हवी. विकासाचा चेहरा मानवी असावा. वाढती लोकसंख्या हा आपल्या देशासमोरील मोठा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात मदनदादा भोसले म्हणाले, संस्थेची स्थापना करणाऱ्या धुरीणांची परंपरा लक्षात ठेवून, ज्या पूर्वसुरींनी शिक्षणाचा भक्कम पाया घालून दिला, त्यावर कळस चढवताना तंत्रज्ञानाचे भान ठेवणे गरजेचे आहे. आता एआय चा शिक्षणात प्रवेश झाला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करताना संस्थाचालकांची जबाबदारी वाढतेच शिवाय संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेही योगदान महत्त्वाचे आहे.
डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. कुमार सप्तर्षी व डॉ. डी. वाय. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपप्राचार्य प्रो. डॉ. विनोद वीर यांची पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. शिवाजी कांबळे यांनी आभार मानले. रेश्माबानो मुलानी यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास आजी-माजी प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी एन. सी. सी. छात्र व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.





