आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-तरुणाईच्या स्वप्नांना मिळणार पंख! वाईत २७ जूनला भव्य रोजगार महोत्सव.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-तरुणाईच्या स्वप्नांना मिळणार पंख! वाईत २७ जूनला भव्य रोजगार महोत्सव.

नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या पुढाकारातून ५ हजारांहून अधिक पदांसाठी भरती; नामांकित कंपन्या, बँका आणि वित्तीय संस्थांची थेट उपस्थिती.

सातारा

वाई दि. २३ : सातारा जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी आशेचा नवा किरण ठरणारा आणि करिअर घडविण्याची सुवर्णसंधी देणारा भव्य रोजगार महोत्सव येत्या शनिवार, दि. २७ जून २०२६ रोजी वाई येथे आयोजित करण्यात आला आहे. वाई नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल लक्ष्मण सावंत यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या उपक्रमात ५ हजारांहून अधिक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

गणपती मंदिरासमोर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यात देशातील नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्या, अग्रगण्य बँका आणि वित्तीय संस्था सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे उमेदवारांच्या थेट मुलाखती घेऊन जागेवरच निवड प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याने युवकांना रोजगार मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

या रोजगार महोत्सवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ५ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा आणि अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या युवक-युवतींसाठीही रोजगाराची दारे खुली करण्यात आली आहेत. उत्पादन, सेवा, विक्री, तांत्रिक, बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रातील विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती केली जाणार असून, युवकांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरीची संधी मिळणार आहे.

रोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी अधिकृत QR कोडद्वारे पूर्वनोंदणी करावी. तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधार कार्ड, बायोडाटा, पासपोर्ट फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील युवकांना रोजगारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा मेळावा ‘नोकरी तुमच्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करणारा ठरणार आहे. हजारो युवकांच्या करिअरला नवी दिशा देणारा आणि अनेक कुटुंबांच्या आशा-आकांक्षांना बळ देणारा हा रोजगार महोत्सव जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

2) वाई:-योगातून निरोगी भारताचा संदेश! द्रविड हायस्कूलमध्ये १,२५० विद्यार्थ्यांचा सामूहिक योगाभ्यास.

सातारा | प्रतिनिधी
वाई दि. २३ : योग ही केवळ शारीरिक कसरत नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे, हा संदेश देत डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित द्रविड हायस्कूल, वाई येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तब्बल १,२५० विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सामूहिक योगाभ्यासात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाला समितीचे अध्यक्ष नितीन पोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी शिक्षक तथा पतंजली योगपीठ, हरिद्वार येथे योगगुरू रामदेव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेले योगशिक्षक तुकाराम पवार उपस्थित होते.
संस्कृत शिक्षिका स्वाती जाधव यांच्या योग प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर तुकाराम पवार यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास कसा साधता येतो, याविषयी त्यांनी सोप्या भाषेत माहिती दिली. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने विविध योगप्रकार सादर करत कार्यक्रमात रंग भरला.
यावेळी मुख्याध्यापक दत्तात्रेय भोसले यांनी विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात योग, प्राणायाम आणि नियमित व्यायामाचे महत्त्व पटवून देत निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. त्यांनी प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सन्मान केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापिका नेत्रा मुळे यांनी केले. वैशाली गुरव यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत स्वागत केले. क्रीडा विभाग प्रमुख वैशाली गुरव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. पर्यवेक्षक घनःश्याम नवले यांनी फलक लेखन तर स्मिता सुतार यांनी कार्यक्रम पत्रिका तयार केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या साळी यांनी केले. महावीर कुपाडे यांनी आभार मानले. शिक्षक प्रतिनिधी सोनाली भोज यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे योग दिनाचा हा उपक्रम संस्मरणीय ठरला. शांततापूर्ण शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.

3) वाई:-“योगातून निरोगी जीवनाचा मंत्र!” पसरणीच्या श्री भैरवनाथ विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

सातारा |
वाई, दि. २३ : रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवनाथ विद्यालय, पसरणी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. आर्ट ऑफ लिव्हिंग आणि विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत योगाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एल. पवार यांनी योग मार्गदर्शकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी योग हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून तो निरोगी आणि सकारात्मक जीवनशैलीचा अविभाज्य भाग असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करून शारीरिक व मानसिक आरोग्य जपावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी प्रसिद्ध योग प्रशिक्षक किरण राजेंद्र शिर्के आणि आशुतोष राजेंद्र शिर्के यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम आणि सूर्यनमस्काराचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी प्रत्येक आसनाचे शास्त्रशुद्ध प्रात्यक्षिक करून विद्यार्थ्यांकडूनही ते करून घेतले. विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने योगासने सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.
योगामुळे शरीर सुदृढ राहण्याबरोबरच मन शांत, एकाग्र आणि सकारात्मक बनते, असे प्रतिपादन प्रशिक्षकांनी केले. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संतुलित आहाराचे महत्त्व अधोरेखित करत आरोग्यदायी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास शिक्षक बी. डी. बनसोडे, डी. सी. आखाडे, एस. एस. क्षीरसागर, पी. आर. सूर्यवंशी, शुभांगी मर्ढेकर, तसेच आयुष मर्ढेकर आणि अंकित शिर्के उपस्थित होते.
योग दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि योगाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून, विद्यालयाच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

4) वाई:-३१ वर्षांची निष्ठावंत सेवा पूर्ण; प्रसाद पिसाळ यांना बावधन हायस्कूलचा भावपूर्ण निरोप.

सातारा |
वाई, दि. २३ : सेवा, समर्पण आणि प्रामाणिकपणाचा आदर्श ठरलेले श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या बावधन हायस्कूलमधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रसाद वामन पिसाळ हे तब्बल ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला ‘सेवागौरव समारंभ’ भावनांनी ओथंबलेल्या वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
संस्थेच्या विविध शाळांमध्ये कार्यरत राहून प्रसाद पिसाळ यांनी वाघजाईवाडी, अरवडे आणि बावधन येथील शाळांमध्ये अत्यंत निष्ठेने सेवा बजावली. शिस्तप्रियता, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि सर्वांशी जपलेले आत्मीय संबंध यामुळे त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या सेवेमुळे शाळेच्या प्रगतीला आणि दैनंदिन व्यवस्थापनाला मोठा हातभार लागल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी सचिन भोसले पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून बावधनचे उपसरपंच उदयसिंह पिसाळ, माजी मुख्याध्यापक सी. के. जगताप, मुख्याध्यापक एस. आर. लोहार (क्षेत्र माहुली), माजी मुख्याध्यापक पी. आर. पाटील, कवी सुरेश पाटील तसेच चित्रपट अभिनेते व राष्ट्रसेवा दलाचे वाई तालुका अध्यक्ष दत्तात्रय महांगडे उपस्थित होते. याशिवाय बावधन व अरवडे (ता. तासगाव, जि. सांगली) येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पिसाळ यांना शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी बोलताना मान्यवरांनी, “सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा शेवट नसून नव्या आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात आहे,” असे सांगत प्रसाद पिसाळ यांच्या सेवाभावी वृत्तीचे आणि आदर्श कार्यशैलीचे कौतुक केले. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी आणि समृद्ध जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी प्रसाद पिसाळ यांचे बंधू, प्रसिद्ध उद्योजक तथा ‘रजनी ॲग्रो, वाई’ चे मालक महेश पिसाळ, जयश्री जाधव यांच्यासह संपूर्ण पिसाळ कुटुंबीय उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पिसाळ यांनी केले. मुनीर खाटीक यांनी आपल्या मनोगतातून प्रसाद पिसाळ यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापन मुख्याध्यापक एम. ए. मुकादम यांनी केले.
सेवेचा सुवर्ण अध्याय पूर्ण करताना प्रसाद पिसाळ यांना उपस्थितांनी उभे राहून मानवंदना दिली आणि त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा सेवागौरव सोहळा उपस्थितांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील असा ठरला.

5) वाई:-द्रविड हायस्कूलच्या एम.सी.व्ही.सी. विभागात इयत्ता ११ वीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात स्वागत समारंभ संपन्न.

वाई, दि. २३ : द्रविड हायस्कूल व उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण (एम.सी.व्ही.सी.) विभाग, वाई येथे इयत्ता ११ वीच्या नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेला स्वागत समारंभ उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. श्री. कौस्तुभ कानडे सर उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.सी.व्ही.सी. विभागाचे प्राचार्य प्रा. श्री. दत्तात्रय भोसले सर होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सौ. सोनम जाधव मॅडम यांनी प्रभावी शैलीत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. श्री. सुधीर शिंदे सर यांनी करत विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच नवीन शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व स्वागत प्रा. सौ. मनीषा जाधव मॅडम यांनी केले.
प्रमुख पाहुणे प्रा. श्री. कौस्तुभ कानडे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच शिस्त, आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन आणि कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. श्री. दत्तात्रय भोसले सर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी विचार मांडत उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रम, सातत्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. सौ. शीतल शिंदे मॅडम यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. नव्या शैक्षणिक वर्षाची सकारात्मक सुरुवात करणारा हा स्वागत समारंभ विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.
फोटो ओळ : द्रविड हायस्कूलच्या एम.सी.व्ही.सी. विभागात आयोजित स्वागत समारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे प्रा. कौस्तुभ कानडे सर व उपस्थित मान्यवर.

6) सातारा:-आरक्षणाच्या रक्षणासाठी एकजूट व्हा; कार्यकर्त्यांनी सत्तेत पोहोचले पाहिजे! – ॲड. अमन आंबेडकर

सातारा |
सातारा दि. २३ : आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी केवळ संघटनात्मक कामापुरते मर्यादित न राहता आमदार, खासदार बनून सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे युवानेते ॲड. अमन आनंदराज आंबेडकर यांनी केले. सातारा येथील निर्मल हॉलमध्ये आयोजित रिपब्लिकन सेनेच्या सातारा जिल्हा पदाधिकारी निवड व जाहीर पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशीलकुमार सूर्यवंशी, राज्य सचिव सोमनाथ भोसले, राज्य संघटक आनंद मोहन, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे, कामगार आघाडी अध्यक्ष डॉ. शंकर माने, युवक प्रदेशाध्यक्ष किरण धोंगडे तसेच विमल चॅरिटेबल ट्रस्टचे अमोल रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला.
मार्गदर्शन करताना ॲड. अमन आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांचे स्वप्न म्हणजे रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता सत्तेच्या मुख्य प्रवाहात जाऊन निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे होय. ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकांपुरते मर्यादित न राहता कार्यकर्त्यांनी विधानसभेत व संसदेत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. हिंदू-मुस्लिम, मराठा-ओबीसी यांच्यात वाद निर्माण केल्यानंतर आता उपवर्गीकरणाच्या नावाखाली बौद्ध आणि मातंग समाजामध्ये मतभेद निर्माण करून मागासवर्गीयांचे आरक्षण कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे समाजाने अधिक सजग आणि संघटित राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेश उबाळे यांनी आपल्या भाषणात पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला कुटुंबातील सदस्याप्रमाणे साथ व मदत दिली जाईल, असे सांगितले. ‘गाव तिथे रिपब्लिकन सेना’ अभियानाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात पक्ष संघटना मजबूत करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके उपलब्ध करून देण्यासारखे सामाजिक उपक्रम पक्ष राबवत असल्याची माहिती दिली.
या सोहळ्यात ॲड. अमन आंबेडकर यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये अक्षय कांबळे (लोकसभा अध्यक्ष), पूजा बनसोडे (जिल्हा महिला लोकसभा अध्यक्ष), विशाल वायदंडे (युवा लोकसभा अध्यक्ष), साईनाथ खंडागळे (लोकसभा मातंग आघाडी अध्यक्ष), जमीर शेख (अल्पसंख्याक लोकसभा अध्यक्ष), आयेशा पटणी (अल्पसंख्याक महिला आघाडी अध्यक्ष), अजय घाडगे (कामगार आघाडी अध्यक्ष) आणि नितीन रोकडे (जिल्हा महासचिव) यांचा समावेश होता.
दरम्यान, उपवर्गीकरणाच्या विरोधात येत्या ३० जून रोजी मुंबई येथे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही ॲड. अमन आंबेडकर यांनी केले. पक्ष आणि जातीय भेद विसरून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाजबांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button