वाई:-सातारा जिल्ह्याचा मान उंचावला! गरवारे टेक्नीकल फायबर्सचे हणमंत ढवळे राज्यस्तरीय ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’चे मानकरी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-सातारा जिल्ह्याचा मान उंचावला! गरवारे टेक्नीकल फायबर्सचे हणमंत ढवळे राज्यस्तरीय ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार’चे मानकरी.

सातारा | प्रतिनिधी
वाई येथील गरवारे टेक्नीकल फायबर्स कंपनीतील कर्मचारी हणमंत सिताराम ढवळे यांची महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या सन २०२४ च्या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय ‘विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारासाठी’ निवड झाली आहे. सातारा जिल्ह्यातून या पुरस्कारासाठी निवड होणारे ते एकमेव मानकरी ठरले असून, त्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाने १६ जून रोजी पुरस्कारांची अंतिम यादी जाहीर केली. यामध्ये राज्यभरातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण ५१ गुणवंत कामगारांची निवड करण्यात आली असून, सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान हणमंत ढवळे यांनी मिळविला आहे.
कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत निधी भरणाऱ्या कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या विशेष योगदानाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान केला जातो. हणमंत ढवळे यांनी साहित्य, सामाजिक कार्य, शिक्षण, क्रीडा तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये दिलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
राज्यस्तरीय या पुरस्कारामध्ये २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशामुळे गरवारे टेक्नीकल फायबर्ससह संपूर्ण सातारा जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हणमंत ढवळे यांच्या या यशाने मेहनत, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांची दखल राज्यस्तरावर घेतली गेल्याचे अधोरेखित झाले असून, जिल्ह्यातील कामगार वर्गासाठी ते प्रेरणादायी ठरले आहेत.
2) पुसेगाव:-‘कर्मचक्र’ला राज्यस्तरीय गौरव; मारुती वाघ यांना ‘उदय परिमल साहित्य पुरस्कार’

पुसेगाव प्रतिनिधी : पुसेगाव येथील साहित्यिक मारुती वाघ यांच्या ‘कर्मचक्र’ या पुस्तकाला पंढरपूर येथे आयोजित भव्य सोहळ्यात ‘उदय परिमल राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. परिमल सांस्कृतिक व्यासपीठ, रोपळे बुद्रुक (ता. पंढरपूर) यांच्या वतीने हा मानाचा पुरस्कार देण्यात येतो.
प्रकाशित पुस्तकाच्या माध्यमातून साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय पाऊल टाकणाऱ्या नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो. यंदा ‘कर्मचक्र’ या पुस्तकाची निवड झाल्याने साहित्य क्षेत्रात मारुती वाघ यांच्या कार्याचा गौरव झाला आहे.
यावेळी मंचावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव प्रा. डॉ. शिवाजी शिंदे, मराठी साहित्य परिषदेचे पंढरपूर शाखाध्यक्ष सिद्धार्थ ढवळे, युवा नेते प्रणव परिचारक, पुष्पलता निकम तसेच परिमल सांस्कृतिक व्यासपीठाचे अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सचिन कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करत व्यासपीठाच्या साहित्यविषयक उपक्रमांची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनी परिमल सांस्कृतिक व्यासपीठाच्या साहित्य संवर्धनाच्या कार्याचे विशेष कौतुक केले. साहित्य क्षेत्रात नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य अत्यंत स्तुत्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. उमाकांत आदमाने यांनी केले, तर विश्वविक्रमवीर कवी रवी वसंत सोनार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्यास महाराष्ट्रातील विविध भागांतून साहित्यिक, कवी, लेखक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
3) कराड:-स्वच्छ भारताचा फज्जा! कालेटेक परिसरात कचऱ्याचे साम्राज्य; भटक्या कुत्र्यांचा धोका वाढला.

कराड, दि. २१ : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत अभियान’ची अंमलबजावणी देशभरात जोरात सुरू असताना, कराड दक्षिणमधील कालेटेक ग्रामपंचायत हद्दीत मात्र या अभियानाला हरताळ फासला गेल्याचे चित्र दिसून येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसराचे विदारक चित्र समोर आले असून, प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
कालेटेक परिसरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला सर्रास कचरा टाकला जात असून, हॉटेल व्यावसायिक तसेच चिकन-मटण विक्रेत्यांकडून उघड्यावर फेकल्या जाणाऱ्या मांसजन्य कचऱ्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. या कचऱ्यावर ताव मारण्यासाठी मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री जमा होत असून, त्यांच्या वाढत्या वावरामुळे पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक वेळा ही कुत्री रस्त्यावरून जाणाऱ्यांवर धावून जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
परिसरातील प्रसिद्ध उंडाळे धरणाकडे जाणाऱ्या मार्गालाही कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी वेढले आहे. निसर्गसौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागाचे रूपांतर आता अक्षरशः कचरा डेपोमध्ये झाले आहे. पर्यटक आणि नागरिकांकडून याबाबत नाराजी व्यक्त होत असतानाही संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या समस्येबाबत अनेकदा तक्रारी करूनही ग्रामपंचायतीचा आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदारी झटकण्याचे काम करत आहेत. एकमेकांकडे बोट दाखवण्यापलीकडे कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या मुद्द्यावर सातत्याने अधिकाऱ्यांना सूचना देत असताना, कराड दक्षिणमधील परिस्थिती मात्र त्यांच्या आदेशांनाही हरताळ फासणारी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. “शासकीय यंत्रणा नेमकी काम कोणासाठी करते?” असा सवालही संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान, कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे दुर्गंधी, डास व इतर रोगराई वाढण्याचा धोका निर्माण झाला असून, साथीचे आजार पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने कचरा हटवून परिसर स्वच्छ करावा, तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
4) कराड:-वसंतगडाच्या सेवेला रोटरीचा सलाम! मानाचा ‘कराड रोटरी क्लब पुरस्कार’ टीम वसंतगडला.

कराड, दि. २१ : किल्ले वसंतगड संवर्धन, पर्यावरण संरक्षण, सामाजिक जागृती आणि निःस्वार्थ सेवाभावाच्या माध्यमातून समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘टीम वसंतगड’ ला यंदाचा प्रतिष्ठेचा ‘कराड रोटरी क्लब पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. रोटरी क्लबने टीमच्या सातत्यपूर्ण आणि समाजहिताच्या कार्याची घेतलेली ही दखल सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली असून, विविध स्तरांतून टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून टीम वसंतगड किल्ला संवर्धन, स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, वन्यजीव संरक्षण तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता सुरू असलेल्या या कार्याला मिळालेली ही मानाची पावती असल्याची भावना टीम सदस्यांनी व्यक्त केली.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर टीम वसंतगडच्या वतीने बोलताना सांगण्यात आले की, “हा सन्मान आमच्यासाठी आनंदाचा आणि जबाबदारी वाढवणारा क्षण आहे. हा पुरस्कार केवळ टीमचा नसून वसंतगड संवर्धनासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देणाऱ्या प्रत्येक सहकारी, हितचिंतक, मित्र आणि कुटुंबीयांचा आहे. त्यांच्या विश्वास, प्रेम आणि सहकार्यामुळेच हा प्रवास यशस्वी झाला आहे.”
टीमच्या विविध उपक्रमांना अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. यामध्ये कराडचे आरटीओ चैतन्य कणसे, नागपूरचे उपजिल्हाधिकारी विजय पवार आणि साताऱ्याचे नायब तहसीलदार युवराज पाटील यांचे विशेष योगदान राहिले असल्याचे नमूद करत टीमने त्यांचे तसेच रोटरी क्लब आणि सर्व शुभेच्छुकांचे आभार मानले.
रोटरी क्लबकडून मिळालेला हा सन्मान भविष्यात अधिक जोमाने गड-किल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण आणि जनहिताचे उपक्रम राबविण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करत टीम वसंतगडने समाजसेवेचा वसा अधिक ताकदीने पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.
या गौरव सोहळ्यास रोटरी क्लबचे पदाधिकारी, टीम वसंतगडचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




