आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-‘दिशा’त नव्या स्वप्नांचे स्वागत! प्रवेशोत्सवात ११ वीच्या विद्यार्थ्यांना दिला आत्मविश्वासाचा मंत्र.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-‘दिशा’त नव्या स्वप्नांचे स्वागत! प्रवेशोत्सवात ११ वीच्या विद्यार्थ्यांना दिला आत्मविश्वासाचा मंत्र.

सातारा | वाई, दि. २० :
नवीन कॉलेज, नवे मित्र, नवे शिक्षक आणि भविष्यातील करिअरची नवी दिशा… अशा उत्साहवर्धक वातावरणात सुमन एज्युकेशन संस्थेच्या दिशा ज्युनिअर कॉलेज, वाई येथे इयत्ता ११ वीच्या नवागत विद्यार्थ्यांसाठी भव्य ‘प्रवेशोत्सव’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. १२ वीच्या विद्यार्थ्यांनी नवागतांचे स्वागत करत त्यांना आपलेपणाची भावना दिली.
कॉलेज जीवनाची सुरुवात करताना अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती आणि संभ्रम दूर करण्यासाठी वरिष्ठ विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. “घाबरू नका, दिशा हे आता तुमचे दुसरे घर आहे,” असा विश्वास देत त्यांनी नवागतांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा संदेश दिला.
कार्यक्रमात मागील वर्षी बारावी बोर्ड परीक्षा, MHT-CET, JEE तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागील संघर्ष, अभ्यासाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन आणि मेहनतीचे महत्त्व नवागतांसमोर उलगडले. “कष्टाला पर्याय नाही,” हा यशाचा मूलमंत्र त्यांनी दिला.
यावेळी अकरावी-बारावीच्या दोन वर्षांचे शैक्षणिक आणि करिअरच्या दृष्टीने असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. शिस्त, सातत्यपूर्ण अभ्यास आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यामुळेच यश संपादन करता येते, असे मार्गदर्शन करण्यात आले.
दिशा ज्युनिअर कॉलेजची शैक्षणिक गुणवत्ता, स्पर्धा परीक्षांसाठीचे विशेष मार्गदर्शन आणि समाजाभिमुख उपक्रमांची माहितीही विद्यार्थ्यांना देण्यात आली. रक्तदान शिबिरे, वक्तृत्व स्पर्धा, स्नेहसंमेलन यांसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले.
“आज आम्ही तुमचे स्वागत करत आहोत; पुढील वर्षी याच ठिकाणी उभे राहून तुम्ही नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत कराल,” असा प्रेरणादायी संदेश देत सिनिअर-ज्युनिअरमधील दरी मिटवणारा हा सोहळा उत्साहात पार पडला.
सुमन एज्युकेशन संस्थेच्या दिशा ज्युनिअर कॉलेजच्या प्रगतीमागे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम व संचालिका प्रा. रूपाली कदम यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच प्राचार्य ताजुद्दीन सय्यद, ॲडमिन हेड सारिका चव्हाण आणि अकॅडमी हेड अनुपम गांधी यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे.
प्रवेशोत्सवामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे आणि आत्मविश्वासाचे नवे वातावरण निर्माण झाले असून “We Are Team Disha” ही भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

2) वाई:-ढोल-ताशांच्या गजरात चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत; एकसर केंद्रशाळेचा प्रवेशोत्सव ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू!

वाई, दि. २० : नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी सजलेल्या जिल्हा परिषद केंद्रशाळा, एकसर येथे नवागत विद्यार्थ्यांच्या आगमनाने उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात आणि पारंपरिक पद्धतीने औक्षण करून जंगी स्वागत करण्यात आले. शाळेत आयोजित करण्यात आलेला ‘शाळा प्रवेशोत्सव’ ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अविस्मरणीय ठरला.
प्रवेशोत्सवानिमित्त संपूर्ण शाळा परिसर आकर्षक रांगोळ्या, फुलांची तोरणे आणि विविध सजावटींनी नटला होता. प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या गुढीमुळे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत होते. नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेतील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी विशेष तयारी केली होती.
यावेळी विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक साहित्य हातात मिळाल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
प्रवेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या ‘प्लास्टिकमुक्तीची शपथ’ घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. शालेय स्तरावरून पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा स्तुत्य उपक्रम ठरला.
या कार्यक्रमाला आरोग्य विस्तार अधिकारी मोरे साहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मयूर चव्हाण, सरपंच सुमन मालुसरे, पोलीस पाटील मीनल तरडे, माजी सरपंच दिपाली घाडगे, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी जोशी, सामाजिक कार्यकर्ते मनोज कळंबे, महेश घाडगे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका प्रभावती थोरवे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. इयत्ता पहिलीच्या वर्गशिक्षिका संपदा घोडके यांनी साकारलेली आकर्षक रांगोळी आणि सजावट विशेष लक्षवेधी ठरली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुनाथ राठोड यांनी केले, तर फुलचंद महांगडे यांनी आभार प्रदर्शन केले.
नवागत विद्यार्थ्यांचा निरागस उत्साह, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शाळेने केलेले आगळेवेगळे स्वागत यामुळे जिल्हा परिषद केंद्रशाळा, एकसरचा प्रवेशोत्सव परिसरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरला आहे.

3) कराड:-कृष्णातील परिवर्तन महाराष्ट्राला दिशादर्शक ठरेल : शशिकांत शिंदे

कालेतील प्रचारसभेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल; ‘संस्थापक पॅनेल’च्या विजयाचा विश्वास.

कराड, दि. २० : कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी परिवर्तनाचा निर्धार केला असून, कारखान्यात होणारे हे ऐतिहासिक परिवर्तन केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशातील सहकार चळवळीला नवी दिशा देणारे ठरेल, असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
काले (ता. कराड) येथे ‘संस्थापक पॅनेल’च्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी चेअरमन अविनाश मोहिते, काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील, बंडानाना जगताप, अजितराव पाटील-चिखलीकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, “वर्षानुवर्षे परस्परांविरोधात राजकारण करणारे अनेक नेते आज स्वार्थासाठी एका मंचावर आले आहेत. मात्र कृष्णा कारखान्याचे सामान्य सभासद पूर्ण ताकदीने संस्थापक पॅनेलच्या पाठीशी उभे आहेत. ही निवडणूक आता सभासदांच्या हाती गेली असून परिवर्तन अटळ आहे.”
यावेळी माजी चेअरमन अविनाश मोहिते यांनी सत्ताधाऱ्यांच्या दहा वर्षांच्या कारभारावर सडकून टीका केली. “आमच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा ३४१ कोटी रुपये अधिक दर दिला. वेळेवर ऊसतोड, सिंचन योजनांचे प्रभावी नियोजन आणि डिस्टिलरीचा नफा वाढवून कारखान्याची आर्थिक स्थिती मजबूत केली. मात्र आज कारखान्यावर तब्बल ९७७ कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे,” असा आरोप त्यांनी केला.
निवडणुकीच्या तोंडावर नव्या पाणी योजनांची घोषणा करणाऱ्यांनी गेल्या दहा वर्षांत विद्यमान योजना का टिकवल्या नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सभासदांनी पाच वर्षांच्या आणि दहा वर्षांच्या कारभाराची तुलना करून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बंडानाना जगताप यांनीही सत्ताधाऱ्यांवर घणाघाती आरोप करत, “कारखान्यावरील कर्ज जाणीवपूर्वक वाढवून कारखाना खासगीकरणाच्या दिशेने नेण्याचा डाव रचला जात आहे,” असा आरोप केला. तसेच कारखान्यातील कथित बोगस सभासदांमुळे खऱ्या सभासदांचे नुकसान होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.
अजितराव पाटील-चिखलीकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या प्रसिद्धीच्या राजकारणावर टीका करत, “कारखान्यातील उपपदार्थांच्या उत्पन्नातून शेतकऱ्यांना अधिक ऊसदर देणे शक्य होते. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट हा सभासदांच्या घामाच्या पैशातून उभा राहिला आहे,” असे सांगितले.
शेतकरी संघटनेचे विजय पाटील यांनी शेतकरी आणि सभासदांमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी असल्याचा दावा केला. तर शिवराज देसाई यांनी सत्ताधारी पॅनेलच्या जाहीरनाम्याला ‘फाजीलनामा’ अशी उपमा दिली.
दरम्यान, शिवराष्ट्र संघटनेचे चंद्रकांत पवार यांनी जाहीरपणे ‘संस्थापक पॅनेल’ला पाठिंबा जाहीर केला. सभेला काले व परिसरातील सभासद, शेतकरी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली. आभार प्रदर्शन हर्षवर्धन पाटील यांनी केले.

4) कराड:-“अधिकाऱ्यांच्या चुकीचा फटका शेतकऱ्यांना का?” ; पाणी उपसाबंदी रद्द करण्यासाठी बाळासाहेब पाटील आक्रमक.

जलसंपदा विभागाच्या ढिसाळ नियोजनावर ताशेरे; जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन.

कराड दि. २० : धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असतानाही जलसंपदा विभागाच्या चुकीच्या नियोजनामुळे अतिरिक्त पाणी सोडण्यात आले आणि आता त्याच चुकीचे खापर शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्थांवर फोडत नदीतील पाणी उपसाबंदी लागू करण्यात आली आहे. हा अन्यायकारक आदेश तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी माजी सहकार व पणन मंत्री तथा सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन आणि सह्याद्री सहकारी साखर कारखाना पुरस्कृत सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता अभय काटकर, कार्यकारी अभियंता प्रगती यादव तसेच महावितरणचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब हाळनोर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, १५ मे २०२५ ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राज्यात भरपूर पाऊस झाला होता. सर्व धरणे शंभर टक्के भरली होती. मात्र, जलसंपदा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पाणी सोडण्यात आले. परिणामी सध्याच्या काळात धरणांतील पाणीसाठा कमी झाला असून, त्याची भरपाई करण्यासाठी प्रशासनाने कृषी पंपधारक शेतकरी व सहकारी पाणीपुरवठा संस्थांवर नदीतून पाणी उपसा करण्यास बंदी घातली आहे.
ऐन उन्हाळ्यात लागू करण्यात आलेल्या या आदेशामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसमोर मोठे संकट निर्माण झाले असून, पिके करपण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाच्या चुकीची शिक्षा शेतकऱ्यांना देणे योग्य नसून, उपसाबंदीचा आदेश तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पै. संजय थोरात, पी. डी. पाटील बँकेचे संचालक उमेश कदम, श्रीराम सहकारी पाणीपुरवठा संस्था, तळबीडचे चेअरमन मधुकर गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या ग्रंथालय विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष संजय पिसाळ, आप्पासाहेब चव्हाण, मोहन मोहिते, मोहन चव्हाण, विजय थोरात कोर्टीकर यांच्यासह विविध पाणीपुरवठा संस्थांचे प्रतिनिधी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच सह्याद्री कारखान्याचे इरिगेशन इंजिनिअर एस. एम. क्षीरसागर, आर. जी. तांबे, किशोर पावशे, बी. डी. साळुंखे आणि बादशहा शेख यांनीही यावेळी सहभाग घेतला.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन उपसाबंदीचा आदेश मागे घ्यावा, अन्यथा शेतकरी व पाणीपुरवठा संस्थांच्या सहभागातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही बाळासाहेब पाटील यांनी दिला.

5) कराड:-साताऱ्याच्या राजकारणात ‘राजकीय भूकंपा’ची चाहूल! भरत नाना–अनिल बापूंची गुप्त बैठक चर्चेच्या केंद्रस्थानी.

अनिल बापू भाजपच्या वाटेवर? जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता.

कराड, दि. २० : सातारा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी एक महत्त्वपूर्ण घडामोड आज समोर आली आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सचिव तथा राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ (नवी दिल्ली) चे संचालक भरत पाटील (भरत नाना) आणि शेतकरी संघटना तसेच मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल बापू यांच्यात बंद खोलीत झालेल्या गुप्त बैठकीने राजकीय चर्चांना अक्षरशः उधाण आले आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ सविस्तर चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती, संघटनात्मक बांधणी आणि ग्रामीण भागातील जनसंपर्क वाढविण्याबाबत महत्त्वपूर्ण विचारविनिमय झाल्याचे समजते.
बैठकीत शेतकऱ्यांचे प्रश्न, मराठा समाजाच्या विविध मागण्या, ग्रामीण भागातील बदलती राजकीय परिस्थिती आणि सामाजिक संघटनांना मुख्य प्रवाहातील राजकारणाशी अधिक प्रभावीपणे जोडण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. तसेच आगामी काळात कार्यकर्त्यांच्या भावना आणि स्थानिक पातळीवरील राजकीय वास्तव लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यावरही दोन्ही नेत्यांचे एकमत झाल्याचे सांगितले जात आहे.
या भेटीनंतर सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती अनिल बापू यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत. राजकीय निरीक्षकांच्या मते, या बैठकीतून भविष्यातील मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळत असून अनिल बापू यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास जिल्ह्यातील अनेक राजकीय समीकरणे बदलू शकतात.
या अचानक घडलेल्या भेटीमुळे विरोधी पक्षांसह सर्वच राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सतर्क झाले आहेत. ही केवळ सदिच्छा भेट होती की आगामी राजकीय फेरबदलांची नांदी, याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
एकूणच, भरत नाना आणि अनिल बापू यांच्या या चर्चित बैठकीने सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नवा चर्चेचा विषय निर्माण केला असून, आगामी काही दिवसांत या भेटीचे राजकीय परिणाम अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

6) घोगाव:-(कराड)-डीपीवर मृत्यूचा थरार! घोगावमध्ये विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा जागीच अंत.

कराड, दि. २० : कराड तालुक्यातील घोगाव येथे अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, वीज वितरण कंपनीच्या डीपीवर जंप मारत असताना विजेचा जबरदस्त धक्का लागून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. शिवाजी दिनकर साळुंखे (वय अंदाजे ४५ ते ४७) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या दुर्घटनेमुळे घोगाव परिसरात शोककळा पसरली असून, महावितरणच्या कार्यपद्धतीबाबत संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने तो पूर्ववत करण्यासाठी शिवाजी साळुंखे हे डीपीवर जंप जोडण्यासाठी चढले होते. मात्र, यावेळी अचानक वीजप्रवाह सुरू असल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना ग्रामस्थांनी महावितरणच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. योग्य तांत्रिक नियोजनाचा अभाव आणि सुरक्षेतील त्रुटींमुळे हा बळी गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
दरम्यान, शिवाजी साळुंखे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, दोन भाऊ, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबातील प्रमुख कमावता व्यक्ती गमावल्याने साळुंखे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे.
या प्रकरणाची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्याची प्रक्रिया सुरू असून, घटनेची चौकशी करण्यात येत आहे. दुर्घटनेमागील नेमके कारण काय, तसेच कोणाचा निष्काळजीपणा होता का, याचा तपास सुरू आहे. चौकशी अहवालानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय होणार असल्याचे समजते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button