वाई:-विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता विकसित व्हावी – डॉ.जयवंत चौधरी.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई: दि.१९
विद्यार्थ्यांची रोजगार क्षमता विकसित व्हावी – डॉ.जयवंत चौधरी.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये संधींप्रमाणेच आव्हानेही आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे पदवीबरोबरच एखादे कौशल्यही द्यायला हवे. त्यांची रोजगार क्षमताही विकसित व्हायला हवी, असे प्रतिपादन जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील अंतर्गत दर्जा हमी कक्ष, स्टाफ वेल्फेअर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० ची अंमलबजावणी करताना” या विषयावर आयोजित कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी सुटा संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर. के. चव्हाण, शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य डॉ. मनोज गुजर, विद्यापीठाच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य डॉ. राजेश निमट, कागल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एल.कदम, लोणंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय गायकवाड यांची उपस्थिती होती.
डॉ. चौधरी म्हणाले, शिक्षणव्यवस्थेत विद्यार्थी हा केंद्रबिंदू असतो. शिक्षणाने त्याचा आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचा यथासांग प्रयत्न केला पाहिजे. उद्योग व्यवस्था व अर्थव्यवस्था यांना संस्थांनी चांगले मनुष्यबळ पुरवायला हवे. आपल्याकडे बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच अर्थार्जन करून शिक्षण पूर्ण करावे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अडचणींवर आणि आव्हानांवर चर्चा होणे अत्यंत गरजेचे आहे. सदर धोरणाचे यश व्यवस्था किती प्रामाणिकपणे आणि समर्पणाने काम करते यावर ठरणार आहे असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, परदेशातील व्यवस्था आणि भारतीय शिक्षण व्यवस्था यांची सांगड घालून धोरणाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सूक्ष्म पद्धतीने नियोजन करावे लागेल आणि त्यातील त्रुटी दूर कराव्या लागतील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. शिवाजी कांबळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय उपप्राचार्य प्रा. डॉ. विनोद वीर यांनी करून दिला. स्टाफ सेक्रेटरी डॉ. शिवाजी ताटे यांनी आभार मानले. डॉ. मंजुषा इंगवले आणि दिपाली चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रात साधनव्यक्ती म्हणून बोलताना डॉ. आर. के. चव्हाण यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०: उद्दिष्टे, अपेक्षा आणि वास्तव या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कोणत्याही धोरणामध्ये काही बलस्थाने व काही मर्यादा असतात, त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात राबविलेल्या शैक्षणिक धोरणाचा त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.
डॉ. मनोज गुजर हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० आणि शासन निर्णय या विषयावर बोलताना म्हणाले, कोणत्याही धोरणाचा शासननिर्णय आणि अंमलबजावणी यांचा मेळ घालताना दक्षता बाळगावी लागते. समाजातील प्रत्येक घटकाला या धोरणांचा कसा फायदा होईल हे पहावे लागते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या सर्व शासन निर्णयांचा त्यांनी उलगडा करून दिला.
चर्चासत्राच्या तिसऱ्या सत्रात शैक्षणिक धोरण: संधी आणि आव्हाने या विषयावर मत मांडताना, साधनव्यक्ती म्हणून डॉ. राजेश निमट म्हणाले, या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ नये या दृष्टिकोनातून विचार केला जात आहे. आपण स्वीकारलेले धोरण चांगल्या पद्धतीने राबवण्याची आपली जबाबदारी आहे असे मत त्यांनी मांडले. कागल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.एल.कदम यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि उच्च शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले.
प्रश्नोत्तराच्या खुल्या चर्चासत्रामध्ये प्राध्यापकांनी कार्यभार, पदभरती, शासनाची धोरणे याबद्दल साधनव्यक्तींना प्रश्न विचारले.
सदर चर्चासत्रासाठी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्राचार्य व प्राध्यापक, किसन वीर महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.




