वाई:-अतिवेगाचा अंदाज जीवघेणा ठरला? वाईजवळ भीषण अपघातात चालक ठार; महिला गंभीर जखमी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-अतिवेगाचा अंदाज जीवघेणा ठरला? वाईजवळ भीषण अपघातात चालक ठार; महिला गंभीर जखमी.

सातारा | प्रतिनिधी
वाई तालुक्यातील जोर-वाई मार्गावरील व्याहळी कॉलनी हद्दीत काळुबाई मंदिराजवळ शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात एका चारचाकी वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनातील महिला गंभीर जखमी झाली. अपघाताच्या तीव्रतेमुळे वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे सुमारे ३.३२ वाजण्याच्या सुमारास महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडी जोर गावाहून वाईच्या दिशेने येत होती. व्याहळी कॉलनीतील काळुबाई मंदिराजवळ आल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील गाडी रस्त्यालगतच्या खोल चरात जाऊन जोरदार आदळल्याने भीषण अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच वाई पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या चित्रा आनंदा फरांदे (रा. बोरीव, ता. वाई) यांना स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढून ‘१०८’ रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की चालक वाहनाखाली दबला गेला होता. ग्रामस्थांनी अथक प्रयत्न करून त्याला बाहेर काढले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मृत चालकाची ओळख अभिजित श्रीनाथ यादव (रा. खडकवासला, पुणे) अशी पटली असून पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली आहे.
घटनास्थळाच्या पाहणीत अपघातस्थळापूर्वी सुमारे ५० मीटरपर्यंत टायरचे ठसे आढळून आले. यावरून चालकाने वाहनावरील नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते. प्राथमिक तपासात रस्त्याच्या परिस्थितीचा अचूक अंदाज न आल्याने तसेच वाहनाचा वेग अधिक असल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
“पहाटेचा प्रवास ठरला अखेरचा; काळुबाई मंदिराजवळील भीषण अपघाताने एकाचा बळी” अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
2) पाचगणी:-३६ वर्षांची यशस्वी वाटचाल! दापवडीतील कळंबे महाराज पतसंस्थेचा वर्धापन दिन; गुणवंतांचा होणार नागरी सत्कार.

सातारा |
पाचगणी, दि. १३ : जावळी तालुक्यातील दापवडी येथील सामाजिक बांधिलकी जपणारी कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (काटवली) आज, शनिवार (दि. १३) आपला ३६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करत आहे. या निमित्ताने विविध स्पर्धा परीक्षा व शासकीय सेवांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत युवक-युवतींचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
दापवडी येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हा कार्यक्रम होणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
सहकार क्षेत्रात आर्थिक प्रगती साधताना सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनाही प्राधान्य देणाऱ्या या संस्थेने स्थानिक गुणवंतांना कायम प्रोत्साहन दिले आहे. यंदाच्या वर्धापन दिनानिमित्त सई प्रतापराव पाटील (भारतीय वायूसेनेत निवड), अजय अशोक साळुंखे (महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस पदी निवड) आणि अक्षदा नथुराम रांजणे (महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदी निवड) या तीन गुणवंतांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
देशसेवा, सुरक्षा आणि शासकीय क्षेत्रात यश मिळवलेल्या या तरुणांमुळे दापवडीसह संपूर्ण जावळी तालुक्याचा गौरव वाढला असून, त्यांच्या यशातून ग्रामीण भागातील युवकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.
याबाबत बोलताना संस्थेचे ज्येष्ठ संचालक बाबुराव रांजणे म्हणाले, “दापवडी व परिसरातील शेतकरी, छोटे व्यावसायिक, महिला आणि तरुणांना आर्थिक बळ मिळावे, या उद्देशाने संस्थेची स्थापना करण्यात आली. विश्वासाची ३६ वर्षे पूर्ण करताना केवळ आर्थिक व्यवहार न करता समाजातील गुणवंतांना प्रोत्साहन देणे हेही आमचे कर्तव्य असल्याची भावना आम्ही जपली आहे.”
दरम्यान, या गौरव सोहळ्यास दापवडी, काटवली आणि परिसरातील सभासद, ठेवीदार, हितचिंतक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे व्हा. चेअरमन हरिश्चंद्र गावडे व ज्येष्ठ संचालक बाबुराव रांजणे यांनी केले आहे.
3) वाई:-शिक्षण क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व हरपले! सेवानिवृत्त प्राचार्या सौ. कल्पना चव्हाण यांचे निधन.

सातारा |
वाई दि. १३ : शिक्षण क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व, कर्तव्यदक्ष शिक्षिका आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग असलेल्या सेवानिवृत्त प्राचार्या सौ. कल्पना शरद चव्हाण (वय ६९) यांचे पुणे येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने वाई परिसरातील शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
सौ. चव्हाण यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या बावधन, बुध आणि धोम येथील संस्कृतीकेंद्रांमध्ये शिक्षिका, पर्यवेक्षिका तसेच मुख्याध्यापिका म्हणून प्रदीर्घ काळ उल्लेखनीय सेवा बजावली. शिस्तप्रियता, कर्तव्यनिष्ठा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेला जिव्हाळा यामुळे त्यांनी शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक यशाबरोबरच उत्तम व्यक्तिमत्त्व विकास साधला.
वाईतील पुरोगामी विचारसरणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या चव्हाण कुटुंबाच्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग राहिला. रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान तसेच यशवंतराव चव्हाण ज्ञान-विज्ञान मंडळाच्या उपक्रमांत त्यांनी मोलाचे योगदान दिले. शिक्षणावरील निष्ठा, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि सेवाभावी वृत्तीमुळे त्या सर्वांच्या आदराचे स्थान बनल्या होत्या.
त्यांच्या पश्चात पती शरद चव्हाण, मुलगा चेतन चव्हाण, मुलगी सौ. तनुजा, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
सौ. कल्पना चव्हाण यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील एक संवेदनशील, अभ्यासू व प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
4) वाई महसूल विभागाविरोधात ‘सिने स्टाईल’ आंदोलनाचा इशारा; विक्रम वाघ आक्रमक.

सातारा |
वाई, दि. १३ : वाई तहसीलदार कार्यालयातील कथित अनियमितता, महसूल विभागाचा मनमानी कारभार आणि विविध प्रकरणांतील प्रलंबित निर्णयांविरोधात राष्ट्रीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या सर्व प्रकारांच्या निषेधार्थ सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यातील पहिले अनोखे ‘सिने स्टाईल’ आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना विक्रम वाघ यांनी महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करत काही प्रकरणांमध्ये निष्काळजीपणामुळे गंभीर परिणाम घडल्याचा दावाही त्यांनी केला.
धोम धरणातील गाळ काढण्याच्या प्रक्रियेबाबत बोलताना वाघ म्हणाले, “धरणातील गाळ काढण्यास आमचा विरोध नाही. मात्र या प्रक्रियेच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांना आणि भ्रष्ट प्रवृत्तींना आम्ही विरोध करणार आहोत. जनहिताच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट सहन केली जाणार नाही.”
वाई तालुक्यातील अनधिकृत बांधकामे, बेकायदेशीर उत्खनन, रस्ते प्रकरणे तसेच महसूल विभागाने दिलेल्या काही संशयास्पद निर्णयांबाबत आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला. हे सर्व पुरावे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर करून संबंधित प्रकरणांची जाहीरपणे पोलखोल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, ही आंदोलनाची प्रमुख मागणी असल्याचे सांगत, कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार वाघ यांनी व्यक्त केला.
आपल्या आगळ्यावेगळ्या आंदोलन पद्धतीमुळे चर्चेत राहिलेले विक्रम वाघ यांचे हे आगामी आंदोलन जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन या इशाऱ्याकडे कसे पाहते आणि पुढे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
5) सातारा:-अपमानाचा वचपा की दगाफटक्याची भीती? धैर्यशील कदमांची मनधरणीसाठी जोरदार धावपळ.

सातारा |
सातारा दि. १३ : सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत सत्ता हातात असूनही भारतीय जनता पक्षाला विजयासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्चस्व कायम राखण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद पणाला लावली असली, तरी विरोधकांच्या आक्रमक प्रचारामुळे आणि महायुतीतील अंतर्गत नाराजीमुळे निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे.
राज्यात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती सत्तेत असली, तरी सातारा जिल्हा परिषद सत्तास्थापनेवेळी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे मित्रपक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. या नाराजीचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने भाजपच्या गोटात चिंता वाढली आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी मित्रपक्षांतील नाराज नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी वाढवल्या आहेत. संभाव्य नाराजी दूर करून महायुतीतील मतदार एकत्र ठेवण्यासाठी ते सातत्याने मनधरणी करत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, भाजपनेही निवडणुकीची गंभीरता लक्षात घेऊन आपल्या प्रमुख नेत्यांना मैदानात उतरवले आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यांत पक्षाच्या बैठका, दौरे आणि मेळाव्यांची संख्या वाढली असून विजयासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेस यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महायुतीतील अंतर्गत मतभेद, स्थानिक प्रश्न आणि विविध आरोपांच्या मुद्द्यांवर विरोधकांनी प्रचाराची धार वाढवली आहे.
त्यामुळे ही निवडणूक केवळ एका जागेची लढत न राहता महायुतीतील एकजूट आणि विरोधकांच्या ताकदीचीही कसोटी ठरणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. शेवटी मित्रपक्षांतील नाराजीवर मात करण्यात भाजपला कितपत यश मिळते, यावरच या निवडणुकीचे चित्र मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.
6) सातारा:-साताऱ्यात शिवसेनेत उभी फूट? मुलाखतींच्या कार्यक्रमावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर.

सातारा | प्रतिनिधी
सातारा जिल्हा शिवसेनेतील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली असून, पदाधिकारी नियुक्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या मुलाखतींच्या कार्यक्रमावरून पक्षातील मतभेद तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केलेल्या नाराजीनंतर आता दुसरे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनीही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांवर थेट निशाणा साधला आहे.
आगामी पदाधिकारी नियुक्त्यांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर हा वाद अधिकच चिघळला. “गेली अनेक वर्षे पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मुलाखती काल-परवा पक्षात आलेले लोक घेणार का?” असा सवाल चंद्रकांत जाधव यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर रणजितसिंह भोसले यांनीही जाहीर भूमिका घेत पक्षातील सद्यस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
भोसले म्हणाले की, शिवसेनेत परंपरेने नियुक्त्या या मुलाखतीद्वारे नव्हे तर पक्षाच्या आदेशाने होत असतात. साताऱ्यात सुरू असलेली मुलाखतींची प्रक्रिया ही शिवसेनेच्या संस्कृतीशी विसंगत असून ती काँग्रेसच्या पद्धतीचे अनुकरण असल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी त्यांनी पक्षात काही “लाभार्थी गट” सक्रिय झाल्याचा गंभीर आरोपही केला. या गटाकडून स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असून, आर्थिक स्वार्थ असलेल्या व्यक्तींना पुढे आणले जात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
हा प्रश्न नवीन नसून यापूर्वीही अनेक बैठकींमध्ये याबाबत चर्चा झाल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले. साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत ज्येष्ठ जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार यांनी पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख दगडू सपकाळ यांच्यासमोर ही बाब मांडली होती. तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिकांना होणारा कथित त्रास थांबवून पक्ष संघटनेत समन्वय निर्माण करण्याची मागणीही पुढे येत आहे. येत्या काळात पक्षाच्या अधिकृत बैठकीत हा विषय अधिक तीव्रतेने चर्चिला जाण्याची शक्यता असून, शिवसेना नेतृत्व या वादावर काय भूमिका घेते याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
7) भुईंज:-‘सुरक्षित गाव, सजग नागरिक’ संकल्पनेला बळ; भुईंज पोलिसांकडून १०० ग्रामसुरक्षा दल सदस्यांना टी-शर्ट वाटप.

सातारा |
भुईंज, दि. १३ : ग्रामीण भागातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने भुईंज पोलीस ठाण्याने स्तुत्य पुढाकार घेत ग्रामसुरक्षा दल बळकटीकरण आणि सक्षमीकरण उपक्रमांतर्गत १०० ग्रामसुरक्षा दल सदस्यांना अधिकृत टी-शर्टचे वाटप केले. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना ग्रामसुरक्षा दलांची प्रभावी उभारणी करण्याच्या सूचना दिल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलिसांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.
यावेळी आयोजित बैठकीत ग्रामसुरक्षा दल सदस्यांना गावाच्या सुरक्षेसाठी असलेल्या जबाबदाऱ्यांची सविस्तर माहिती देण्यात आली. गावात येणाऱ्या अनोळखी व्यक्ती, फिरते विक्रेते तसेच संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देणे, चोरी व घरफोडी रोखण्यासाठी रात्री गस्त घालणे, यात्रा-उत्सवांच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करणे, तसेच जुगार, अवैध दारू विक्रीसारख्या बेकायदेशीर व्यवसायांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले.
याशिवाय पूर, भूकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी प्रशासन आणि नागरिकांना मदतीसाठी तत्पर राहण्याचेही निर्देश सदस्यांना देण्यात आले. ग्रामसुरक्षा दल हे केवळ स्वयंसेवकांचे पथक नसून, पोलीस आणि ग्रामस्थ यांच्यातील विश्वासाचा मजबूत दुवा ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
“सुरक्षित गाव, सजग नागरिक” ही संकल्पना प्रभावीपणे राबवत गावाच्या सुरक्षिततेत सक्रिय योगदान देण्याचे आवाहन पोलिसांनी ग्रामसुरक्षा दल सदस्यांना केले. या उपक्रमामुळे भुईंज परिसरातील गावांमध्ये सुरक्षेची भावना अधिक दृढ होणार असून, नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत आणि कौतुक केले जात आहे.




