खटाव:-पुसेसावळीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत कदम-पाटील यांचे निधन.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुसेसावळीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत कदम-पाटील यांचे निधन.

पुसेसावळी, ता. खटाव : खटाव तालुक्यातील सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत शंकरराव कदम-पाटील (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पुसेसावळी गावासह संपूर्ण खटाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
चंद्रकांत कदम-पाटील यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात जनतेच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले. खटाव पंचायत समितीचे उपसभापती म्हणून काम करताना त्यांनी ग्रामीण भागातील विकासकामे, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण आणि सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी केला.
शांत, संयमी, अभ्यासू आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे लोकनेते म्हणून त्यांची ओळख होती. राजकारणात कार्यरत असतानाही त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रमांना पाठबळ दिले. त्यामुळे त्यांना गावासह परिसरात मोठा मान आणि आदर प्राप्त झाला होता.
ते पुसेसावळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुरेश पाटील यांचे बंधू तर विद्यमान पंचायत समिती सदस्य संग्राम पाटील यांचे वडील होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सहकार क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थांनी दुःख व्यक्त केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर पुसेसावळी येथे आज चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
चंद्रकांत कदम-पाटील यांच्या निधनाने खटाव तालुक्याने एक अनुभवी, लोकाभिमुख, सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा आणि विकासकामांसाठी सातत्याने झटणारा नेता गमावला असल्याची भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.
— आरपीएस स्टार न्यूज, सातारा जिल्हा




