मुंबई:-“दोन दादांची मिठी; राहुरीच्या राजकारणात नवा अध्याय!”
पत्रकार आदिनाथ कडू अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“दोन दादांची मिठी; राहुरीच्या राजकारणात नवा अध्याय!”

आजोबा-नातवाच्या इतिहासाला उजाळा; प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशाने बदलणार राजकीय समीकरणे.
मुंबई |
राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणाऱ्या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मात्र या सोहळ्याचे खरे आकर्षण ठरले ते डॉ. सुजय विखे पाटील आणि प्राजक्त तनपुरे यांच्यातील गळाभेटीचा क्षण!
“मिठीतून व्यक्त झाला राजकीय संदेश”
राहुरी, पाथर्डी आणि नगर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांच्या साक्षीने झालेल्या या सोहळ्यात तनपुरेंनी प्रथम प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा आणि त्यानंतर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर झालेली दोन्ही नेत्यांची गळाभेट उपस्थितांसाठी चर्चेचा विषय ठरली.
एकेकाळी राजकीय प्रतिस्पर्धी असलेले हे दोन्ही नेते एकत्र आल्याने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. कार्यकर्त्यांनीही या क्षणाचे उत्स्फूर्त स्वागत केले.
“आजोबांनंतर नातवांचीही एकजूट”
कार्यक्रमादरम्यान अनेकांनी जुन्या राजकीय इतिहासाची आठवण करून दिली. विखे-तनपुरे घराण्यांतील पूर्वीचे राजकीय संबंध आणि आजोबांच्या काळातील समीकरणांचा उल्लेख होताच सभागृहात एकच हशा पिकला. “आजोबांनंतर आता नातवांचीही एकजूट झाली,” अशी प्रतिक्रिया उपस्थित कार्यकर्त्यांमधून उमटली.
“तनपुरे भाजपमध्ये; सुजय विखेंच्या राजकीय मुत्सद्देगिरीची चर्चा”
या पक्षप्रवेशामागे डॉ. सुजय विखे पाटील यांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. आजच्या कार्यक्रमातील घडामोडींनी त्या चर्चेवर शिक्कामोर्तब केल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही तनपुरेंसारखा अभ्यासू, प्रश्नांची जाण असलेला आणि जनतेत काम करणारा तरुण नेता भाजपमध्ये दाखल झाल्याने पक्षाला मोठी ताकद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
“राहुरीत नवे राजकीय समीकरण”
लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात काम केलेले सुजय विखे आणि प्राजक्त तनपुरे आता एकाच राजकीय व्यासपीठावर आले आहेत. त्यामुळे राहुरी, पाथर्डी आणि नगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
कार्यकर्त्यांच्या मते, “तनपुरे-विखे युती राहुरीच्या विकासाला नवी दिशा देईल. विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही नेते एकत्र आल्यास तालुक्याच्या राजकारणात मोठे परिवर्तन घडू शकते.”
“टाळ्यांच्या गजरात रंगला ‘अलिंगन सोहळा'”
कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरेंना मिठी मारत स्वागत केले. या क्षणाने संपूर्ण सभागृह भारावून गेले. टाळ्यांचा गजर, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे पक्षप्रवेश सोहळा एका संस्मरणीय राजकीय क्षणात परिवर्तित झाला.




