वाई:-वाईत गुटख्याचे साम्राज्य फोफावले; ८० किलो साठा जप्तीनंतर पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार – आरोपीवर यापूर्वीही अनेक कारवाया; तरीही अवैध व्यवसाय सुरूच, धाड मात्र अन्न व औषध प्रशासनाची.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाईत गुटख्याचे साम्राज्य फोफावले; ८० किलो साठा जप्तीनंतर पोलिसांवर प्रश्नांचा भडिमार – आरोपीवर यापूर्वीही अनेक कारवाया; तरीही अवैध व्यवसाय सुरूच, धाड मात्र अन्न व औषध प्रशासनाची.

वाई प्रतिनिधी |
वाई. ३१: वाई शहरातील रामडोह आळी परिसरातील इंद्रजा आयकॉन इमारतीमधील एका अनधिकृत गोदामावर अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या धाडीत तब्बल ८०.७४ किलो वजनाचा व २ लाख ५९ हजार ४८४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या कारवाईनंतर वाई शहरातील अवैध गुटखा व्यवसाय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत आरएमडी पान मसाला, विमल पान मसाला, टोबॅकोसह विविध प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. जप्त केलेला माल ताब्यात घेऊन गोदाम सीलबंद करण्यात आले असून संबंधित आरोपी सतीश पवार यांच्याविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सतीश पवार यांच्यावर यापूर्वीही अवैध गुटखा विक्रीप्रकरणी चार ते पाच वेळा कारवाई झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे वारंवार धाडी, गुन्हे आणि जप्ती होत असतानाही हा व्यवसाय सुरूच कसा राहिला, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याचा साठा शहराच्या मध्यवर्ती भागातील इमारतीत ठेवला जात असताना स्थानिक यंत्रणांना त्याची माहिती कशी मिळाली नाही, याबाबत नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. अन्न व औषध प्रशासनाला गोपनीय माहितीच्या आधारे धाड टाकता येते, मग स्थानिक गुप्त माहिती यंत्रणा नेमकी काय करत होती, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
गोदाम मालक घटनास्थळी उपस्थित नसल्याने पोलिसांच्या उपस्थितीत कुलूप तोडून तपासणी करण्यात आली. मात्र संपूर्ण कारवाईची सूत्रे अन्न व औषध प्रशासनाकडेच असल्याचे दिसून आल्याने अवैध धंद्यांविरोधातील स्थानिक पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या परिणामकारकतेवर चर्चा सुरू झाली आहे.
वाई शहरात गुटखा, तंबाखू, मटका, हातभट्टी दारू आणि इतर अवैध व्यवसायांबाबत सातत्याने तक्रारी होत असतात. त्यामुळे अशा रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचून आर्थिक साखळी आणि संबंधित सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी आता नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
दरम्यान, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती गायकवाड यांनी सहाय्यक आयुक्त एस. बी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.




