सातारा:-छत्रपती शाहू महाराजांच्या तख्ताच्या वाड्याचे पुनरुज्जीवन व्हावे; येसूबाई फाउंडेशनचे निवेदन.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-छत्रपती शाहू महाराजांच्या तख्ताच्या वाड्याचे पुनरुज्जीवन व्हावे; येसूबाई फाउंडेशनचे निवेदन.

मराठेशाहीच्या राजधानीच्या ऐतिहासिक अस्मितेच्या जतनासाठी पुढाकार; गुरुवार बागेत तत्कालीन स्थापत्यशैलीत ‘तख्ताचा वाडा’ उभारण्याची मागणी.
सातारा :- सातारा ही केवळ जिल्ह्याचे मुख्यालय नसून मराठा साम्राज्याच्या इतिहासाची राजधानी म्हणून ओळखली जाते. छत्रपती शाहू महाराजांनी ज्या तख्तावरून न्याय, लोककल्याण आणि दूरदृष्टीचा राज्यकारभार केला, त्या ऐतिहासिक तख्ताच्या वाड्याचे वैभव आज काळाच्या ओघात लोप पावत आहे. या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करून साताऱ्याची ऐतिहासिक ओळख पुन्हा उजळविण्यासाठी येसूबाई फाउंडेशनने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे.
फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांची भेट घेऊन गुरुवार पेठेतील छत्रपती शाहू उद्यान परिसरात तत्कालीन स्थापत्यशैलीत ‘तख्ताचा वाडा’ पुनर्निर्माण करून तेथे छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यकारभाराचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले.
इतिहासातील विविध संदर्भांनुसार, याच ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचे तख्त होते आणि येथूनच मराठा साम्राज्याचा राज्यकारभार चालत होता. अनेक महत्त्वपूर्ण राजकीय निर्णय, पत्रव्यवहार, सनदा आणि प्रशासनाचे निर्णय याच वास्तूमधून होत असत. छत्रपती शाहू महाराजांनी समतेवर आधारित, लोककल्याणकारी आणि न्यायप्रिय राज्यकारभार करत मराठा साम्राज्याला नवी दिशा दिली. त्यामुळे हा वाडा केवळ ऐतिहासिक वास्तू नसून मराठेशाहीच्या वैभवाचे आणि सुशासनाचे प्रतीक असल्याचे फाउंडेशनने निवेदनात नमूद केले आहे.
आजही या परिसरात प्राचीन तलाव, अष्टकोनी विहीर, भुयार आणि तख्ताच्या वाड्याशी संबंधित काही अवशेष इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. मात्र देखभालीअभावी या ऐतिहासिक ठेव्याची दुरवस्था झाली असून, अनेक पर्यटकांना या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्वही माहीत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
पुण्यातील विश्रामबाग वाडा, नाना वाडा आणि लाल महाल यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व पुनर्निर्माण करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर साताऱ्यातही तख्ताचा वाडा उभारून ‘शाहूपर्व’ दर्शविणारे आधुनिक संग्रहालय, ऐतिहासिक दालन, संशोधन केंद्र, ध्वनी-प्रकाश व्यवस्था आणि छत्रपती शाहू महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी येसूबाई फाउंडेशनने केली आहे.
या प्रकल्पामुळे साताऱ्याचा ऐतिहासिक वारसा जपला जाईल, पर्यटनाला मोठी चालना मिळेल, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि नव्या पिढीला मराठेशाहीचा प्रेरणादायी इतिहास प्रत्यक्ष अनुभवता येईल, असा विश्वास फाउंडेशनने व्यक्त केला.
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या दालनात झालेल्या बैठकीस उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर, मुख्याधिकारी विनोद जळक, बंटीराजे भोसले, सुधीर विसापूरे, योगेश चौकवाले, निलेश पंडित, श्रेयस शेटे, दिलीप गायकवाड, विश्वतेज मोहिते, सचिन राजेशिर्के, संजय जाधव आणि पप्पू राजेशिर्के आदी उपस्थित होते. यावेळी जिज्ञासा मंचचे निलेश पंडित यांनी तख्ताच्या वाड्याचे ऐतिहासिक महत्त्व पुराव्यांसह मांडले.
चर्चेनंतर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी या प्रस्तावावर सकारात्मक विचार करून संबंधित विभागांशी चर्चा करत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
“छत्रपती शाहू महाराजांच्या तख्ताच्या वाड्याचे पुनरुज्जीवन हा केवळ एका वास्तूचा विकास नसून साताऱ्याच्या ऐतिहासिक अस्मितेचा, मराठेशाहीच्या वैभवाचा आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान निर्माण करण्याचा संकल्प आहे. या ऐतिहासिक वारशाचे जतन करणे ही शासन, प्रशासन आणि समाजाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे मत येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक सुहास राजेशिर्के यांनी व्यक्त केले.




