वाई:-“होता जीवा म्हणून वाचला शिवा” — वीर जिवा महाले स्मारकाच्या कामाला गती – श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा पुढाकार; जिवा महाले यांच्या वंशजांना ५ लाखांचा निधी सुपूर्द.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-“होता जीवा म्हणून वाचला शिवा” — वीर जिवा महाले स्मारकाच्या कामाला गती – श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा पुढाकार; जिवा महाले यांच्या वंशजांना ५ लाखांचा निधी सुपूर्द.

सातारा | प्रतिनिधी
वाई : “होता जीवा म्हणून वाचला शिवा” ही इतिहासात अजरामर झालेली ओळ पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जनमानसात जागी झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणारे शूरवीर वीर जिवा महाले यांच्या १४ व्या पिढीतील वंशजांची दारुण अवस्था समोर आल्यानंतर त्यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी आणि कुटुंबाच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदे फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.
वाई तालुक्यातील कोंढवली गावातील वीर जिवा महाले यांचे १४ वे वंशज प्रकाश सपकाळ हे गेली ११ वर्षे अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळले आहेत. मजुरी करून संसार चालवणारी पत्नी आणि शिक्षण अर्धवट सोडून सलूनमध्ये काम करणारा मुलगा अशा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हे कुटुंब जीवन जगत आहे. स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या मावळ्यांच्या वंशजांवर आलेली ही परिस्थिती महाराष्ट्राला वेदना देणारी ठरली.
एका यूट्यूब चॅनेलच्या ग्राउंड रिपोर्टमधून ही बाब समोर आल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ दखल घेत मदतीचे आदेश दिले. उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना थेट कोंढवली येथे पाठवण्यात आले. प्रकाश सपकाळ यांच्या उपचारांची जबाबदारी स्वीकारण्यात आली असून कुटुंबाला तातडीची १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
याचबरोबर वीर जिवा महाले यांच्या स्मृती जतन करण्यासाठी कोंढवली येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकासाठी ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. स्मारकाचे काम पूर्ण होईपर्यंत आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
दि. २७ मे २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मंगेश चिवटे यांच्या हस्ते वीर जिवा महाले यांच्या पुतळ्यासाठी तसेच त्यांच्या वंशजांना धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी शिवसेना आरोग्यदूत मिलिंद शिंदे, बाजीराव चव्हाण, अजित सपकाळ, विशाल सपकाळ, सचिन कदम, वाई तालुका शिवसेना प्रमुख रविंद्र आप्पा भिलारे, योगेश फाळके, प्रणव थोरवे, प्रतीक काळे तसेच शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
वीर जिवा महाले स्मारक समितीचे अध्यक्ष गणपत चोरट, उपाध्यक्ष महेश जाधव, संदीप ओंबळे, राजेंद्र चोरट, गणेश शिंदे, दत्तात्रय चोरट, मनोहर चोरट, संदीप चोरट, रविंद्र चोरट तसेच जिवा महाले कुटुंबीय आणि नाभिक समाजाचे प्रमुख कार्यकर्ते संपतराव सूर्यवंशी व निनाद तावरे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीचा प्रश्न असो किंवा स्वराज्याच्या इतिहासाचे जतन करण्याचा विषय असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेहमीच शिवप्रेमी भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात प्रतापगडावरील अनधिकृत कबर हटवून त्यांनी स्वराज्याच्या अस्मितेला न्याय दिला होता. आता वीर जिवा महाले यांच्या वंशजांच्या पाठीशी उभे राहत त्यांनी पुन्हा एकदा “स्वराज्याचा मावळा” म्हणून आपली ओळख अधोरेखित केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य उभे केले. त्याच स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मावळ्यांच्या पराक्रमामुळेच आज महाराष्ट्र अभिमानाने इतिहासाचा टिळा मस्तकी लावतो. कोंढवली गावचा सुपुत्र वीर जिवा महाले हा कान्होजी जेधे यांच्यासोबत कायम एकनिष्ठ राहिलेला शूर मावळा होता. भोर तालुक्यातील आंबवडे येथे कान्होजी जेधे यांच्या समाधीजवळच वीर जिवा महाले यांची समाधी आजही इतिहासाची साक्ष देत उभी आहे.
आजवर अनेक राजकीय नेत्यांनी दुर्लक्ष केलेल्या या कुटुंबासाठी श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेनेने घेतलेला पुढाकार हा केवळ मदतीचा हात नसून स्वराज्याच्या इतिहासाला दिलेला मानाचा मुजरा असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दरम्यान, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कोंढवली ग्रामस्थांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत गावातील विविध प्रश्न जाणून घेतले. पश्चिम भागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
2) वाई:-पाणी दिलं महाराष्ट्राला; पण पश्चिम भाग तहानलेलाच!

धरणग्रस्तांचे बलिदान, आश्वासनांचा पाऊस आणि विकासाचा कायम दुष्काळ.
सातारा प्रतिनिधी :
वाई दि ३०: वाई तालुक्याचा पश्चिम भाग निसर्गसंपन्न, ऐतिहासिक वारसा लाभलेला आणि धार्मिक-सांस्कृतिक परंपरांनी समृद्ध असला, तरी विकासाच्या बाबतीत मात्र आजही उपेक्षित असल्याची भावना नागरिकांमधून तीव्रतेने व्यक्त होत आहे. धोम, बलकवडी आणि जांभळी बंधारा परिसरातील अनेक गावांनी धरणांसाठी आपली जमीन, घरे आणि पिढ्यानपिढ्यांचा संसार गमावला; मात्र त्यागाच्या बदल्यात अपेक्षित विकास मिळालेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
धोम धरणामुळे सातारा जिल्ह्यासह अनेक तालुक्यांतील शेतीला जीवनदान मिळाले. खंडाळा, फलटण, बारामती, कोरेगाव, भोर आणि इतर भागांपर्यंत पाणी पोहोचले. मात्र ज्यांच्या जमिनी धरणासाठी संपादित झाल्या, त्या पश्चिम भागातील अनेक गावांना आजही सिंचनाच्या पाण्याचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेती आणि रोजगाराच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर वाढल्याचे चित्र आहे.

धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही अद्याप पूर्णपणे सुटलेला नाही. अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत असून, पुनर्वसन प्रक्रियेतील त्रुटी, विलंब आणि दलालांच्या हस्तक्षेपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. अनेक धरणग्रस्तांना आजही न्याय मिळालेला नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
आरोग्य सुविधांची अवस्था देखील चिंताजनक आहे. डोंगरदऱ्यांनी वेढलेल्या या भागात सर्पदंश, अपघात किंवा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यासारख्या घटना घडल्यास रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण ठरते. धरणाच्या दोन्ही बाजूंना अत्याधुनिक आरोग्य केंद्रे आणि कायमस्वरूपी ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध व्हावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
वीजपुरवठा खंडित होणे, एसटी सेवेतील अनियमितता आणि विद्यार्थ्यांचे हाल हे देखील येथील वास्तव आहे. अनेक गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी वाईला जातात; मात्र अपुऱ्या वाहतूक सुविधांमुळे त्यांना रात्री उशिरापर्यंत बसस्थानकांवर थांबावे लागते.
पर्यटनाच्या दृष्टीने कमळगड, केंजळगड, पांडवगड, धोम परिसर, जांभळी बंधारा, प्राचीन मंदिरे आणि निसर्गरम्य स्थळे ही मोठी ताकद असतानाही या भागासाठी कोणताही ठोस पर्यटन विकास आराखडा राबविण्यात आलेला नाही. जलपर्यटन, बोट क्लब, पर्यटन महोत्सव आणि स्थानिक युवकांना रोजगार देणारे प्रकल्प उभारण्याची मागणी सातत्याने होत आहे.
गेल्या चार-पाच दशकांत विविध पक्षांच्या अनेक नेत्यांना या भागाने मोठी राजकीय पदे दिली. मात्र विकासाच्या प्रश्नावर ठोस बदल घडले नसल्याची टीका नागरिक करत आहेत. पक्षीय राजकारण, गटबाजी आणि वैयक्तिक वादांमध्ये पश्चिम भागाचा विकास मागे पडल्याचे मतही व्यक्त होत आहे.
आज पश्चिम भागातील ग्रामस्थांचा एकच सवाल आहे — “धरणासाठी आम्ही सर्वस्व दिले, पण बदल्यात आम्हाला मिळाले तरी काय?”
आरोग्य, शिक्षण, रोजगार, सिंचन, पर्यटन, रस्ते, वीज आणि धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावून पश्चिम भागाला न्याय द्यावा, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.
पश्चिम भागाच्या प्रमुख मागण्या
धरणग्रस्तांचे प्रलंबित पुनर्वसन तातडीने पूर्ण करावे
धरणाच्या दोन्ही बाजूंना अत्याधुनिक आरोग्य केंद्रे उभारावीत
कायमस्वरूपी ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करावी
नियमित वीजपुरवठा व सक्षम यंत्रणा उभारावी
एसटी फेऱ्या वाढवून विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी
जलपर्यटन, बोट क्लब आणि पर्यटन महोत्सव सुरू करावेत
स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य द्यावे
सिंचनाच्या पाण्याचा लाभ पश्चिम भागातील गावांनाही द्यावा.




