कराड:-‘वैश्विक सिद्धांत’ पुस्तकाचे प्रकाशन; दिवंगत राहुल सावंत यांच्या विचारांना अभिवादन.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

‘वैश्विक सिद्धांत’ पुस्तकाचे प्रकाशन; दिवंगत राहुल सावंत यांच्या विचारांना अभिवादन.

कराड :- दिवंगत रो. राहुल मधुकर सावंत यांनी लिहिलेल्या ‘वैश्विक सिद्धांत’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा कराड येथील हॉटेल द फर्न रेसिडेन्सी येथे भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रसिद्ध लेखिका डॉ. जया विकास कुऱ्हेकर यांनी केला आहे.
शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठानचे संस्थापक व मार्गदर्शक गुरुवर्य श्री. इंद्रजीत देशमुख (काकाजी) यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, शिवम प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच सावंत कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिजाऊ वंदन व प्रतिमा पूजनाने सोहळ्याची सुरुवात झाली. शिवम प्रतिष्ठानचे विश्वस्त देवेंद्र पिसाळ यांनी प्रास्ताविकातून पुस्तकाच्या निर्मितीचा व प्रकाशनाचा प्रवास उलगडून सांगितला. अनुवादक डॉ. जया कुऱ्हेकर यांनी पुस्तकातील वैशिष्ट्ये आणि अनुवाद करताना आलेले अनुभव उपस्थितांसमोर मांडले. माजी प्राचार्य डॉ. आर. ए. कुंभार यांनी राहुल सावंत यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकत त्यांच्या वैचारिक उंचीचा गौरव केला.
दिवंगत राहुल सावंत यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचे वडील व उद्योजक मधुकर सावंत (भाऊ) भावुक झाले. त्यांच्या भावना ऐकताना सभागृहातील अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. यामुळे कार्यक्रमाला एक भावनिक व प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.
गुरुवर्य इंद्रजीत देशमुख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून ‘वैश्विक सिद्धांत’ या पुस्तकातील तत्त्वज्ञानाचा उलगडा करत मानवी जीवनातील अध्यात्म, समाजसेवा आणि आत्मोन्नतीचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते यांनी केले, तर धनंजय पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. “तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे…” या प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
हा सोहळा केवळ पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम न ठरता, दिवंगत राहुल सावंत यांच्या विचारांना अभिवादन करणारा आणि समाजाला नवी दिशा देणारा प्रेरणादायी वैचारिक मेळावा ठरला.




