मुंबई:-बिडीडी चाळींतील १२७ वीज मीटर प्रकरणावर BEST अधिकाऱ्यांना नगरसेवक सचिन भाऊ पडवळ यांचा जाब.
पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“बीडीडी चाळींतील १२७ वीज मीटर गायब; रहिवाशांच्या प्रश्नांवर BEST अधिकारी निरुत्तर!”
“सचिन भाऊ पडवळ यांचा थेट सवाल – अदानीच्या स्मार्ट मीटरसाठी रहिवाशांना वेठीस का धरता?”
बिडीडी चाळींतील १२७ वीज मीटर प्रकरणावर BEST अधिकाऱ्यांना नगरसेवक सचिन भाऊ पडवळ यांचा जाब.

मुंबई, दि. २७ मे :
बीडीडी चाळींतील रहिवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता काढून टाकण्यात आलेल्या १२७ वीज मीटरच्या गंभीर प्रकरणावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रभाग क्रमांक २०६ चे लोकप्रिय नगरसेवक, सुधार समिती सदस्य व मुंबई महानगरपालिका सभागृह उपनेते सचिन भाऊ पडवळ यांनी बुधवारी (दि. २७ मे) कुलाबा येथील BEST भवनात चिफ इंजिनिअर (ग्राहक सेवा) जी. जी. चंदनकर यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन जाब विचारला.
या बैठकीस बिडीडी चाळीतील अनेक रहिवासी उपस्थित होते. बैठकीदरम्यान सचिन भाऊ पडवळ यांनी BEST प्रशासन व अदानी कंपनीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत रहिवाशांच्या वतीने अनेक प्रश्न उपस्थित केले.
सर्वप्रथम त्यांनी रहिवाशांना कोणतीही नोटीस अथवा सूचना न देता खासगी कंपनीच्या अनोळखी व्यक्तींमार्फत वीज मीटर काढण्यात आल्याबाबत तीव्र आक्षेप नोंदवला. “जे मीटर काढले गेले, ते पुन्हा पूर्ववत बसविण्यास BEST प्रशासन टाळाटाळ का करत आहे?” असा थेट सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला.
यावेळी रहिवाशांनीही आपली व्यथा मांडताना सांगितले की, रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास सुपारी बाग येथील BEST कार्यालयात वारंवार संपर्क साधूनही फोन उचलले जात नाहीत. परिणामी तक्रार नोंदवण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष मोटारसायकलवर घेऊन येण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.
विभागात केवळ एकच रिपेअरिंग व्हॅन उपलब्ध असल्याने विद्युत बिघाड दुरुस्तीसाठी दोन ते तीन तासांचा विलंब होत असल्याचे निदर्शनास आणून देत, “BEST प्रशासन अतिरिक्त दुरुस्ती वाहने कधी उपलब्ध करून देणार?” असा प्रश्नही पडवळ यांनी उपस्थित केला.
तसेच काढून टाकलेल्या जुन्या मीटरचे अंतिम रिडींग रहिवाशांना न दाखवता स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. या प्रक्रियेमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या कोणत्याही आर्थिक अथवा तांत्रिक वादासाठी BEST प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
“काढून टाकलेले मीटर पुन्हा बसविणार आहात की नाही? याबाबतची भूमिका लेखी स्वरूपात द्यावी,” अशी मागणी करत पडवळ यांनी प्रशासनाला स्पष्ट उत्तर देण्यास भाग पाडले.
यावेळी स्थानिक वडाळा BEST विभागीय अभियंता मुकने यांच्या कथित बेजबाबदार वर्तणुकीबाबत आणि अदानी कंपनीशी संगनमत असल्याच्या संशयावरून रहिवाशांनी किडवाई पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केल्याची माहितीही देण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याचेही बैठकीत ठामपणे सांगण्यात आले.
बैठकीत उपस्थित रहिवाशांचा तीव्र रोष, नगरसेवक सचिन भाऊ पडवळ यांचे आक्रमक प्रश्न आणि वाढता जनक्षोभ पाहून BEST चे चिफ इंजिनिअर जी. जी. चंदनकर काही काळ गोंधळलेल्या अवस्थेत दिसून आले. अखेर त्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
बीडीडी चाळीतील वीज मीटर प्रकरणामुळे निर्माण झालेला वाद आता अधिक तीव्र होण्याची चिन्हे असून, रहिवाशांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याची भूमिका नगरसेवक सचिन भाऊ पडवळ यांनी स्पष्ट केली.





