लोणी:-महंतांविरोधातील अवमानकारक वक्तव्यांचा मंत्री विखे पाटीलांकडून तीव्र निषेध; वारकरी संप्रदाय अधिक एकसंघ राहणार असल्याचा विश्वास.
पत्रकार आदिनाथ कडू अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महंतांविरोधातील अवमानकारक वक्तव्यांचा मंत्री विखे पाटीलांकडून तीव्र निषेध; वारकरी संप्रदाय अधिक एकसंघ राहणार असल्याचा विश्वास.

लोणी | प्रतिनिधी
हिंदुत्वासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या महंतांबद्दल करण्यात आलेले शब्दप्रयोग अत्यंत निषेधार्ह असून, अहील्यानगरचे भूमीपुत्र आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज, महंत भास्करगिरी महाराज आणि महंत रामगिरी महाराज यांच्या पाठीशी हिंदू समाज खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायासाठी कार्य करणाऱ्या महंतांविषयी करण्यात आलेल्या अवमानकारक उल्लेखाच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील यांनी श्रीक्षेत्र देवगड येथे महंत भास्करगिरी महाराज तसेच सरलाबेट येथे महंत रामगिरी महाराज यांची भेट घेत पाठिंबा दर्शविला.
मागील काही दिवसांपासून राज्यात वारकरी संप्रदाय आणि हिंदू धर्मासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींविषयी अवमानकारक लिखाण व वक्तव्य करून वारकरी संप्रदायात फूट पाडण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, अनेक वर्षांची परंपरा लाभलेला वारकरी संप्रदाय कोणत्याही वक्तव्याने विचलित होणारा नसून, संत परंपरेचा वारसा जपत तो अधिक जोमाने समाजाला अध्यात्माच्या माध्यमातून एकत्र बांधून ठेवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह पदाधिकारी आणि वारकरी संप्रदायातील कार्यकर्ते उपस्थित होते.
आचार्य गोविंददेव गिरीजी महाराज, ह.भ.प. भास्करगिरी महाराज आणि ह.भ.प. रामगिरी महाराज यांच्याविरोधातील वक्तव्यांचा तीव्र शब्दांत निषेध करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, “देव, देश आणि धर्मासाठी जीवन समर्पित करणाऱ्या व्यक्तींविषयी बोलताना काहींना भान राहिलेले नाही.”
“वारकरी कधीच निधर्मी होऊ शकत नाही. वारकरी परंपरेला धर्माचे अधिष्ठान आहे आणि त्या ताकदीवर समाज उभा आहे. कोणाच्याही मतांमुळे हे अधिष्ठान डळमळीत होणार नाही,” असे ते म्हणाले.
तसेच, “प्रत्येक गोष्टीकडे वोटबँकेच्या दृष्टीने पाहणारे लोक लव्ह जिहादपासून ते कॉर्पोरेट जिहादपर्यंतच्या घटनांवर मौन बाळगतात. मात्र हिंदुत्वासाठी स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या महंतांविरोधात अवमानकारक भाषा वापरून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जो अत्यंत निंदनीय आहे,” असेही मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.




