वाई:-“गड जपताना शिवरायांचे विचारही जपा!” – विकास खारगे यांचे वाईत प्रभावी प्रतिपादन.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“गड जपताना शिवरायांचे विचारही जपा!” – विकास खारगे यांचे वाईत प्रभावी प्रतिपादन.

वाई, ता. ९ :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील १२ गड-किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ मानांकन मिळाल्याने महाराष्ट्राच्या वैभवात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मात्र गड-किल्ल्यांच्या संरक्षणाबरोबरच छत्रपती शिवरायांच्या नीतिमूल्यांची जपणूक करण्याची जबाबदारीही आता अधिक वाढली आहे, असे प्रतिपादन महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले.
लो. टिळक स्मारक संस्था संचलित वसंत व्याख्यानमालेत “युनेस्कोचा गड सर करताना” या विषयावर आयोजित मुलाखतीत ते बोलत होते. मुलाखत डॉ. रुपाली अभ्यंकर यांनी घेतली. यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून श्री. खारगे यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेण्यात आला.
सामान्य कुटुंबातून आलेल्या श्री. खारगे यांनी इचलकरंजी येथे प्राथमिक शिक्षण घेतले, तर कोल्हापूर व पुणे येथे उच्च शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत १९९४ मध्ये ते आयएएस अधिकारी झाले. चंद्रपूर, यवतमाळ, संभाजीनगर, पुणे अशा विविध ठिकाणी त्यांनी महत्त्वाची प्रशासकीय जबाबदारी सांभाळली. तसेच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
युनेस्को मानांकन प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवरायांचे गड-किल्ले हे केवळ स्थापत्य नव्हे, तर स्वराज्य, इतिहास आणि संस्कृतीचे प्रतीक आहेत. किल्ल्यांची रचना, युद्धनीती, स्थापत्य वैशिष्ट्ये आणि इंटेलिजन्स व्यवस्थेचा अभ्यास करून पुरातत्त्व तज्ज्ञांच्या मदतीने आवश्यक पुरावे सादर करण्यात आले. या खडतर प्रक्रियेनंतर अखेर महाराष्ट्रातील गडांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली.
ते पुढे म्हणाले की, आता खरी जबाबदारी सुरू झाली आहे. किल्ल्यांची स्वच्छता, दुरुस्ती, पावित्र्य आणि पर्यटकांसाठी सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. पुढील दहा वर्षांचा अहवाल युनेस्कोला सादर करावा लागणार असून शासन त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार आहे. स्पेशल ट्रेन सुरू झाल्याने देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढेल. त्यामुळे स्थानिक गाईड, बचतगट आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील.
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य केवळ स्वराज्य स्थापनेपुरते मर्यादित नसून प्रशासन, मराठी भाषा, युद्धनीती आणि शेती धोरणातही त्यांचे योगदान मोठे असल्याचे सांगून, तरुणांनी विकसित भारत आणि स्कील इंडियामध्ये योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित क्षीरसागर यांनी केले. परिचय विद्या साळी यांनी करून दिला. डॉ. चिंतामणी केळकर यांच्या हस्ते श्री. खारगे यांचा सत्कार करण्यात आला. प्रायोजक म्हणून डॉ. नितीन कदम व डॉ. अर्चना केळकर उपस्थित होते. आभार प्रदर्शन प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मेटकरी, नायब तहसीलदार अतुल मर्ढेकर, भाऊसाहेब जगदाळे यांच्यासह महसूल कर्मचारी व वाईकर श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट :
महाराष्ट्रातील लोहगड, रायगड, साल्हेर, शिवनेरी, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, खांदेरी तसेच तामिळनाडूमधील जिंजी या १२ गड-किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ मानांकन मिळाले आहे.
छायाचित्र ओळ :
वाई : वसंत व्याख्यानमालेत विकास खारगे यांचा सत्कार करताना डॉ. चिंतामणी केळकर. यावेळी तनुजा इनामदार, दत्ता मर्ढेकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, भद्रेश भाटे, अनिल जोशी, अमित वाडकर उपस्थित होते.




