आरोग्य व शिक्षणक्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला तात्काळ फाशी द्या; वाईकर नागरिक आक्रमक.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला तात्काळ फाशी द्या; वाईकर नागरिक आक्रमक.

दोषीला फाशीची शिक्षा होण्यासाठी नवीन कायद्याची मागणी; पोलीस निरीक्षकांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.

वाई प्रतिनिधी:

वाई दि. ०५ : नसरापूर येथील अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद आता संपूर्ण वाई तालुक्यात उमटू लागले आहेत. या क्रूर कृत्याचा जाहीर निषेध करत, संबंधित नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी ‘समस्त वाईकर नागरिकांच्या’ वतीने वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना आज (मंगळवारी) निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, सदर घटनेतील आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले होते. मात्र, पुराव्याअभावी त्याची सुटका झाली होती. याच गोष्टीचा फायदा घेत त्याने पुन्हा एकदा एका निष्पाप बालिकेचा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. “अशा नराधमांना समाजात स्थान नसून त्यांना कठोरात कठोर शासन होणे गरजेचे आहे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
अशा घटनांमध्ये स्थानिक न्यायालयाने वस्तुनिष्ठ पुराव्यांच्या आधारे तात्काळ फाशीची शिक्षा सुनावून तिची अंमलबजावणी करावी, असा कायदा केंद्र सरकारने देशभरात लागू करावा. नसरापूर प्रकरणातील गुन्हेगाराला मृत्यूदंडाची शिक्षा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष प्रयत्न करावेत आणि महिला आणि बालिकांच्या सुरक्षिततेसाठी सध्याचे कायदे अधिक कडक करून खटले जलदगती न्यायालयात चालवावेत, अशा मागण्या निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आल्या.
वाईकर नागरिकांनी आपल्या भावना पोलीस प्रशासनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली आहे. या निवेदनावर विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समस्त वाईकर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आता शासन यावर काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

2) भुईंज:-नागरीकांचे गहाळ झालेले ९,३५,०००/- रुपये किमतीचे एकुण ४३ मोबाईल भुईज पोलिसानी केले हस्तगत – भुईज पोलीसाची दमदार कामगिरी.

भुईंज पोलीस ठाणे हद्दीमध्ये पाचवड, भुईज अशी मुख्य बाजारपेठ असुन आजुबाजुच्या गावातुन हजारोंच्या संख्येने नागरीक बाजारपेठेत खरेदी विक्री साठी ये – जा करत असल्यामुळे प्रवासा दरम्याण तसेच बाजारपेठेत त्यांचे मोबाईल फोन गहाळ होण्याचे प्रमाण अधिक वाढले होते.
पोलीस अधीक्षक निखिल पिगळे यांनी गहाळ मोबाईल बाबत पोलीस ठाणे स्तरावर एक विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे वाई विभाग वाई यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेणे करीता पोलीस ठाणे स्थरावर एक विशेष पोलीस पथक तयार केले होते. त्याअनुषंगाने पथकातील पो कॉ. कुंभार यांनी सी ई आय.आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबीच्या आधारे महाराष्ट्रासह इतर राज्यातून हस्ते परहस्ते गहाळ झालेले मोबाईल वापर असलेल्या मोबाईल धारकांशी वारंवार संपर्क करुन चिकाटीने सदरची मोहिम राबवून भुईंज पोलीस ठाणे हद्दीतून गहाळ झालेले ९.३५,०००/- (नऊ लाख पत्तीस हजार रुपये) किमतीचे एकुण ४३ स्मार्ट फोन हस्तगत करण्यात यश आले आहे. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोन मध्ये एक आयफोन-१६ प्रो मॅक्स हा महागडा मोबाईल देखील हस्तगत करण्यात आला आहे. यापुर्वी देखील भुईंज पोलीसांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये नागरीकांना ६,७०,०००/- रुपये किमतीचे एकुण ३० मोबाईल परत केले आहेत. यापुढे देखील अशाच प्रकारची गहाळ मोबाईल फोन शोधण्याची मोहिम सातत्याने रबविण्यात येणार असल्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, भुईंज पोलीस ठाणे यांनी सांगितले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे वाई विभाग वाई यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज ताटे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे , भुईंज पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सुरज शिंदे, सपोफौ वैभव टकले, पो.हवा. नितीन जाधव, पो. हवा. अप्पा कोलवडकर, पो.ना सुशांत धुमाळ, पो. कॉ कुंभार, पो.कॉ.सोमनाथ बल्लाळ, पो.कॉ. सागर मोहिते, पो. कॉ. किरण निबाळकर यांनी पुर्ण केली आहे.

3) वाई:-“दिसतं ते पूर्ण सत्य नसतं!” – जागतिक संघर्षांच्या आड दडलेलं वास्तव उलगडताना अभिजीत जोग यांचा थेट इशारा.

वाई दि. ४ :
वाई वसंत व्याख्यानमालेत “सध्याची युद्ध परिस्थिती आणि भारत” या विषयावर प्रख्यात वक्ते अभिजीत जोग यांचे अभ्यासपूर्ण आणि डोळे उघडणारे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमेश सणस होते.
आपल्या प्रभावी शैलीत बोलताना जोग यांनी जागतिक संघर्षांचे लपलेले पैलू उलगडून सांगितले. “भूराजकीय घटनांमध्ये युद्ध ही सर्वात मोठी घटना असते. मात्र दिसते ते पूर्ण सत्य नसते. हिमनगाप्रमाणे केवळ ३० टक्के भाग वर दिसतो, उर्वरित भाग पाण्याखाली दडलेला असतो,” असे सांगत त्यांनी प्रत्येक युद्धामागील अदृश्य समीकरणे समजून घेण्याची गरज अधोरेखित केली.
इतिहासाचा धागा पकडत त्यांनी सांगितले की, पूर्व रोमन साम्राज्यावर झालेल्या आक्रमणामुळे भारत-युरोप व्यापार मार्ग बंद झाला आणि त्यातूनच क्रिस्टोफर कोलंबस व वास्को-द-गामा यांच्या समुद्री मोहिमा घडल्या. परिणामी अमेरिकेचा शोध लागून जगाच्या इतिहासाला नवे वळण मिळाले.
विसाव्या शतकातील पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध या दोन घटनांनी आजच्या जागतिक रचनेची पायाभरणी केली, असे सांगत त्यांनी सीमारेषांचे राजकारण आणि त्याचे परिणाम स्पष्ट केले. पुढे फ्रान्सिस फुकूयामा आणि सॅम्युअल हंटिंग्टन यांच्या सिद्धांतांचा संदर्भ देत सध्याच्या परिस्थितीत ‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स’ अधिक वास्तव भासत असल्याचे मत व्यक्त केले.
जागतिक संघर्षातील प्रमुख घटकांवर प्रकाश टाकताना त्यांनी इस्रायल-इस्लामिक राष्ट्रांमधील तणाव, इराणची अण्वस्त्र क्षमता, तसेच चीनचा वाढता प्रभाव यावर सखोल विश्लेषण केले. अमेरिका-चीन स्पर्धा, ऊर्जा स्रोतांवरील नियंत्रण आणि इस्लामिक जगतातील सुन्नी-शिया संघर्ष यामुळे जागतिक परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाल्याचे त्यांनी नमूद केले.
रशिया-युक्रेन युद्धाचा संदर्भ देत त्यांनी नाटोच्या विस्तारामुळे निर्माण झालेला तणाव आणि सांस्कृतिक विभागणी यावरही भाष्य केले. तसेच ‘डीप स्टेट’ संकल्पना मांडत जागतिक स्तरावर अप्रत्यक्षपणे राजकीय बदल घडवण्याच्या रणनीतींचा उल्लेख केला.
भारताच्या संदर्भात इशारा देताना जोग म्हणाले, “समाजात फूट पाडणे, सांस्कृतिक मुळे कमकुवत करणे आणि विभागणी निर्माण करणे हे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी सजग राहून वरवरच्या घटनांवर विश्वास न ठेवता त्यांच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्मिता कान्हेरे यांनी केले. राजेश भोज यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. अंजली अरुण पतंगे व माजी न्यायाधीश प्रतापराव शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन ग्रंथपाल अमित वाडकर यांनी केले.
यावेळी वाईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button