वाई:-गर्जा महाराष्ट्राचा जल्लोष! सर्वोदय सेवा ट्रस्टचा उपक्रम उत्साहात; ‘गर्जा महाराष्ट्र माझा २०२६’ ठरला दणक्यात यशस्वी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-गर्जा महाराष्ट्राचा जल्लोष! सर्वोदय सेवा ट्रस्टचा उपक्रम उत्साहात; ‘गर्जा महाराष्ट्र माझा २०२६’ ठरला दणक्यात यशस्वी.

वाई, दि. १ मे २०२६ : महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि मराठी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधत सर्वोदय सेवा ट्रस्ट, वाई यांच्या वतीने ‘गर्जा महाराष्ट्र माझा २०२६’ हा सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम जुनी महात्मा फुले भाजी मंडई येथे उत्साहात पार पडला. सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक अभिमान आणि कर्तृत्वाचा गौरव यांचा संगम साधणाऱ्या या कार्यक्रमाला वाईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन नगराध्यक्ष अनिल सावंत होते. प्रमुख उपस्थितीत बापूसाहेब शिंदे, आनंदा (बाळासाहेब) चिरगुटे, नगरसेवक भारत दादा खामकर, विजय ढेकाणे, काशिनाथ शेलार, समाजसेविका लक्ष्मीताई कळंबे,माजी पंचायत समिती सदस्या सुनिता कांबळे, सर्वोदय ट्रस्टचे संजय जेधे, प्रकाश वाडकर, ज्ञानदेव वाशिवलेसर, रामदास राऊत, किशोर महांगडे, तसेच जीवन विद्या मिशनच्या अध्यक्षा स्वाती मांढरे यांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली. यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार धनंजय घोडके, पांडुरंग भिलारे, विकास जाधव, प्रशांत थोरवे, संजीव महामुनी, सारिका गवते व गजानन जाधव उपस्थित होते.
सर्वोदय सेवा ट्रस्ट ही सातारा जिल्ह्यातील एक अग्रगण्य, राजकारणविरहित संस्था असून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवते. वृक्षलागवड, रक्तदान शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, आपत्तीग्रस्तांना सहाय्य, करिअर मार्गदर्शन, क्रीडा स्पर्धा आदी उपक्रमांतून संस्थेने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कार्यक्रमात ‘गाथा महाराष्ट्राची’ या विषयावर प्रख्यात व्याख्याते दशरथ शिरसाठ (मुंबई) यांचे प्रभावी व्याख्यान झाले. त्यांनी महाराष्ट्राच्या परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकोपा यांचा वेध घेत उपस्थितांना प्रेरित केले.
अध्यक्षीय भाषणात अनिल सावंत यांनी कृष्णा सेवा कार्य फाउंडेशनच्या नदी स्वच्छता उपक्रमाचे कौतुक केले. तसेच वाई नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला.
यावेळी ‘सर्वोदय सेवा गौरव पुरस्कार’ कृष्णानदी सेवा कार्य फाउंडेशन तसेच आदर्श चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्याचा उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सन्मान केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश वाडकर यांनी केले. सूत्रसंचालन संतोष वाडकर व वैशाली वाडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन आनंद गायकवाड यांनी मानले. या उपक्रमाच्या यशासाठी अध्यक्ष संजय जेधे, सचिव संतोष वाडकर, उपाध्यक्ष प्रकाश वाडकर, खजिनदार ज्ञानदेव वाशिवले आणि सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सामाजिक जाणीव, सांस्कृतिक ओळख आणि प्रेरणादायी विचार यांचा संगम घडवणारा हा कार्यक्रम वाईकरांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवून गेला.
2) वाई:-सोशल मीडियावरील माहिती धोकादायक ठरू शकते – सम्राट फडणीस.

वाई, दि. १ मे : वाई येथील लो. टिळक स्मारक संस्था संचलित वसंत व्याख्यानमालेच्या ११० व्या ज्ञानसत्राचा शुभारंभ उत्साहात झाला. या वेळी दैनिक सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी “माध्यमांतर” या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल जोशी होते.
फडणीस म्हणाले की, आज सोशल मीडियावर अनेक अप्रमाणित माहिती वेगाने पसरते आणि ती कधी कधी खूप धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कोणतीही माहिती लगेच विश्वास ठेवण्याऐवजी तपासून पाहणे गरजेचे आहे.
माध्यमांचा प्रभाव समाजावर मोठ्या प्रमाणात पडतो. सध्या डिजिटल माध्यमांमुळे लोकांना त्यांच्या आवडीप्रमाणेच माहिती वारंवार दिसते, त्यामुळे वेगळे विचार समोर येत नाहीत. यामुळे लोकांचा दृष्टिकोन मर्यादित होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.
मोबाईलचा जास्त वापर केल्याने एकाग्रता कमी होत असल्याचीही त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच ‘फॉरवर्ड’ करण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सुरुवात अंजली काणे यांच्या पुढाकाराने ‘शिवतांडव स्तोत्रा’ने झाली. यावेळी रामभाऊ जोशी : जीवनप्रवास या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाला वाईकर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
वाई येथील आर्ट गॅलरीमध्ये देवेंद्र पोरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन २१ मेपर्यंत खुले आहे.
3) वाई:-बारावी निकालात साताऱ्याची धडाकेबाज कामगिरी; ९१.२५% निकालाने जिल्ह्याची ‘यशस्वी घोडदौड’ कायम! – कोकण विभाग राज्यात अव्वल; साताऱ्यात पुन्हा मुलींचाच दबदबा.
वाई, दि. ०२ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात सातारा जिल्ह्याने पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत ९१.२५ टक्के निकालाची नोंद केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांनी समान ताकदीने यश मिळवत जिल्ह्याची शैक्षणिक परंपरा उंचावली आहे.
राज्याच्या चित्राप्रमाणेच साताऱ्यातही मुलींनी आघाडी घेतली असून, मुलांच्या तुलनेत त्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी सुमारे ५ टक्क्यांनी अधिक आहे. सातारा, कराड आणि वाई तालुक्यांतील अनेक महाविद्यालयांनी १०० टक्के निकालाची नोंद करत उत्कृष्टतेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.
विज्ञान शाखेने यंदाही ९५ टक्क्यांहून अधिक निकालासह आपली आघाडी कायम ठेवली आहे. वाणिज्य व कला शाखांमध्येही लक्षणीय सुधारणा दिसून येत असून, व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल स्पष्ट जाणवतो आहे.
वाई तालुक्यात निकालानंतर उत्साहाचे वातावरण असून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले यश विशेष कौतुकास्पद ठरत आहे.
निकाल आज दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाइन
विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल आज दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी बैठक क्रमांक (Seat Number) आवश्यक आहे.
“यंदाचा निकाल पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीत मिळवलेले यश प्रेरणादायी आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन!”




