वाई:-“विकास” की जीवघेणा सापळा? वाईत सुरक्षेच्या नियमांना हरताळ; पाईपलाईन कामांमुळे नागरिक धोक्यात! २४ तास पाणी योजनेच्या नावाखाली रस्ते उखडले; फलक, रिफ्लेक्टर गायब — प्रशासनाला अपघाताचीच प्रतीक्षा?
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“विकास” की जीवघेणा सापळा? वाईत सुरक्षेच्या नियमांना हरताळ; पाईपलाईन कामांमुळे नागरिक धोक्यात!
२४ तास पाणी योजनेच्या नावाखाली रस्ते उखडले; फलक, रिफ्लेक्टर गायब — प्रशासनाला अपघाताचीच प्रतीक्षा?

वाई, दि. ०१ : वाई शहरात २४ तास पाणी पुरवठा योजनेसाठी सुरू असलेले पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. विकासाच्या नावाखाली रस्ते खोदले जात असताना सुरक्षेच्या मूलभूत नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी ना इशारा देणारे फलक, ना रात्री दिसणारे रिफ्लेक्टर — त्यामुळे अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
लग्नसराईच्या हंगामामुळे शहरात आधीच वाहनांची वर्दळ वाढलेली असताना, खोदकामामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. अर्धवट बुजवलेले खड्डे, नीट न केलेले मातीकाम यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळी कोणतीही खबरदारी न घेतल्याने वाहनचालकांना धोका ओळखणे कठीण होत आहे.
दोन दिवसांपूर्वी वाई-धोम रस्त्यावर मेणवली हद्दीत स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयासमोर झालेल्या भीषण अपघाताने परिस्थितीची गंभीरता अधोरेखित केली. दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू झाला, तर १३ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. या अपघातामागे रस्त्यावरील अस्ताव्यस्त पार्किंग आणि अरुंद मार्ग हे प्रमुख कारण असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
स्थानिकांनी यापूर्वी पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. परिणामी दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, आता वाई शहरातही तशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, एवढ्या गंभीर समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “विकास हवा, पण तो जीव घेऊन नको,” अशी भावना व्यक्त करत नागरिकांनी किमान सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याची मागणी केली आहे.
आता प्रश्न एकच — आणखी किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार?




