आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाईला अखेर कायम गटशिक्षणाधिकारी; हर्षवर्धन मोरे यांची नियुक्ती – शिक्षक संघाकडून जंगी सत्कार; शैक्षणिक वर्तुळात आनंदाची लाट.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाईला अखेर कायम गटशिक्षणाधिकारी; हर्षवर्धन मोरे यांची नियुक्ती – शिक्षक संघाकडून जंगी सत्कार; शैक्षणिक वर्तुळात आनंदाची लाट.

 सातारा प्रतिनिधी सारिका गवते

वाई, दि. १६ : वाई तालुका शिक्षण विभागाचा कारभार प्रभावीपणे सांभाळणारे कार्यक्षम अधिकारी हर्षवर्धन मोरे यांची वाई तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी पदावर कायमस्वरूपी पदस्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाल्यानंतर ते गेल्या आठ महिन्यांपासून वाई येथे परिविक्षाधीन कालावधीत कार्यरत होते. त्यांच्या कार्यपद्धतीला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे शासनाने त्यांच्या कायम नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले असून, तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षक संघाची मागणी आणि मंत्र्यांचा पाठपुरावा
मोरे यांची कामाची पद्धत, शिक्षकांशी असलेला सुसंवाद आणि प्रशासकीय कार्यातील समन्वय लक्षात घेता त्यांची वाई तालुक्यातच कायम पदस्थापना व्हावी, अशी आग्रही मागणी वाई तालुका शिक्षक संघाने केली होती. या मागणीची दखल घेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे यांच्याकडे विशेष शिफारस पत्र देत पाठपुरावा केला. त्यानंतर शासनाने मोरे यांच्या कायम नियुक्तीला मंजुरी दिली.
शिक्षक संघाकडून सत्कार या निर्णयाचे स्वागत करत वाई तालुका शिक्षक संघाच्या वतीने हर्षवर्धन मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय जाधव, सरचिटणीस दत्तात्रय गोळे, ज्येष्ठ नेते महेंद्र इथापे, भास्कर पोद्दार, सहदेव फणसे, सुशांत मोतलिंग, कार्याध्यक्ष विशाल जरंडे, राहुल हावरे, प्रसिद्धीप्रमुख अमोल माने, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, फुलचंद महांगडे, किरण पवार, ज्ञानेश्वर धायगुडे, नवनाथ भांगरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय जाधव म्हणाले, “मोरे साहेबांच्या कायम नियुक्तीमुळे वाई तालुक्यातील प्रलंबित शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील आणि प्रशासकीय कामकाजात अधिक सुसूत्रता येईल. शिक्षक संघाच्या मागणीला न्याय मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे.”
दरम्यान, हर्षवर्धन मोरे यांच्या रूपाने अभ्यासू, संयमी आणि प्रशासनाशी सुसंवाद राखणारा अधिकारी तालुक्याला कायमस्वरूपी मिळाल्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

2) वाई:-भुईंज पेटलं! वीज प्रश्नावर शेतकऱ्यांचा संताप उसळला; महावितरणला ‘रास्ता रोको’चा इशारा – डॉ.सुरभी भोसले आक्रमक; वाई कार्यालयात धडक, अधिकाऱ्यांना सुनावलं खडसावून.

वाई, दि. १८ : ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर भुईंज परिसरात वीज प्रश्नाने अक्षरशः भडका उडाला असून, महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर येण्याच्या तयारीत आहे. “इतर गावांना दिवसा वीज, मग भुईंजलाच अन्याय का?” असा जळजळीत सवाल करत शेतकरी आता आक्रमक झाले आहेत.
भुईंज आणि परिसरातील गावांमध्ये शेतीपंपासाठी दिवसा वीज न देता रात्री किंवा अत्यंत गैरसोयीच्या वेळेत वीज पुरवठा केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे पिके करपण्याच्या मार्गावर असून, शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारात जीव मुठीत धरून पाणी भरण्यासाठी शेतात जावे लागत आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसत असतानाच शारीरिक आणि मानसिक त्रासही प्रचंड वाढला आहे.
या अन्यायाविरोधात पंचायत समिती सदस्या डॉ. सुरभी मदन भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट वाई येथील कार्यकारी अभियंता कार्यालय गाठले. अतिरिक्त कार्यकारी अभियंता केरनाथ साळी यांची भेट घेत त्यांनी शेकडो शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन सादर करत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं.
“महावितरण जाणीवपूर्वक भुईंजच्या शेतकऱ्यांची अडवणूक करत आहे. तात्काळ दिवसा वीज पुरवठा सुरू झाला नाही, तर पुणे-सातारा महामार्गावर तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलन छेडू,” असा इशारा डॉ. भोसले यांनी दिला.
भुईंज शाखा अभियंत्यांच्या कामकाजावरही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून, “दुजाभाव का?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय दबावाचा संशयही व्यक्त केला जात आहे.
शेतीपंपासाठी दिवसा अखंडित वीज, विस्कळीत पुरवठ्याचा कायमस्वरूपी तोडगा आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या कारभारात सुधारणा या प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
यावेळी सरपंच विजय वेळे, चेअरमन मदन शिंदे, माजी उपसरपंच प्रशांत जाधवराव, प्रगतशील शेतकरी प्रभाकर भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
आता महावितरण या संतापाच्या ज्वालेला शांत करण्यासाठी काय निर्णय घेते, याकडे संपूर्ण वाई तालुक्याचे लक्ष लागले आहे.

3) वाई:-भाजी मंडईत ‘ऑपरेशन क्लीन’; ८ दिवसांत टपऱ्या हटवा, नाहीतर बुलडोझर सज्ज! – अतिक्रमणावर कडक कारवाईचा इशारा.

‘वन वे’ + बूम बॅरियरने मंडईत शिस्तीचा फास.

वाई दि. १७ :
वर्षानुवर्षे अतिक्रमण, गोंधळ आणि वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या वाईच्या भाजी मंडईत अखेर प्रशासनाने ‘ऑपरेशन क्लीन’ची बिगुल वाजवली असून, बेकायदा टपऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा देत ८ दिवसांचा अल्टिमेटम जारी केला आहे. नियम न पाळणाऱ्यांवर आता बुलडोझर फिरणार, असा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.
वाई पोलीस आणि नगरपरिषद यांच्या संयुक्त पाहणीनंतर मंडईतील अराजकतेला लगाम घालण्यासाठी कडक निर्णय घेण्यात आले. रस्ते अडवून बसलेल्या बेवारस टपऱ्या आणि शेड्स हटवण्यासाठी व्यापाऱ्यांना अंतिम मुदत देण्यात येणार असून, त्यानंतर थेट जप्ती आणि कारवाई होणार आहे.
मंडईत शिस्त आणण्यासाठी जागांचे मार्किंग करून ठरावीक हद्दीबाहेर व्यवसाय करणाऱ्यांवर दंडाचा बडगा उगारला जाणार आहे. यासोबतच वाहतूक कोंडी मोडून काढण्यासाठी संपूर्ण परिसर ‘वन वे’ करण्यात येणार असून प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘बूम बॅरियर’ बसवण्याचा मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे.
टपऱ्यांसाठी ६x८ ही प्रमाणित साईज निश्चित करत नियोजनबद्ध भाडे आकारणी लागू केली जाणार आहे. विशेष म्हणजे, मंडईत आता केवळ भाजी विक्रेत्यांनाच स्थान मिळणार असून इतर दुकाने लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. विनापरवाना फ्लेक्स लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
कारवाईपूर्वी दोन दिवस जनजागृती करून शेवटची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर विशेष पथकाच्या माध्यमातून दंड, जप्ती आणि कठोर अंमलबजावणी सुरू होणार आहे. यासाठी स्वतंत्र अतिक्रमण विभाग स्थापन करण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या निर्णायक मोहिमेमुळे वाईकरांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी आता खरोखरच मंडई अतिक्रमणमुक्त होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वाई मंडईत अतिक्रमणाविरुद्ध ‘धडक कारवाई’; आता नियम मोडणाऱ्यांची खैर नाही!

4) वाई:-समाजसेवेचा दीप जिवंतच! कै. गोविंदा सणस (पाटील) यांचे प्रथम पुण्यस्मरण भावपूर्ण वातावरणात संपन्न.

रेणावळे येथे ३५० आंब्यांच्या रोपांचे वाटप; ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा प्रेरणादायी संदेश
वाई, दि. १८ : गोरगरिबांचे खरे कैवारी आणि न्यायनिष्ठ नेतृत्वाची ओळख असलेले समाजसेवक कै. गोविंदा मारुती सणस (पाटील) यांचे प्रथम पुण्यस्मरण रेणावळे (दत्तवाडी) येथे त्यांच्या निवासस्थानी अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या निमित्ताने आयोजित वृक्षवाटप उपक्रमाने कार्यक्रमाला सामाजिक बांधिलकीची अर्थपूर्ण जोड मिळाली.


सलग ४३ वर्षे पाटीलकीची जबाबदारी निष्ठेने सांभाळताना कै. सणस यांनी गावातील कोणताही वाद पोलीस ठाण्यापर्यंत जाऊ दिला नाही. सामोपचाराने प्रश्न सोडवत त्यांनी गावातच ‘लोकन्यायालय’ उभं केलं होतं. “दुसऱ्याचे दुःख आपले समजून धावून जाणारा माणूस” अशी त्यांची ओळख आजही परिसरात आदराने घेतली जाते.
पुण्यस्मरण कार्यक्रमाची सुरुवात सकाळी हरी कीर्तन व हरिपाठाने झाली. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र केवळ धार्मिक विधींवर मर्यादित न राहता, सणस परिवाराने सामाजिक जबाबदारी जपत तब्बल ३५० आंब्यांच्या रोपांचे वाटप केले. या उपक्रमातून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा पर्यावरण संवर्धनाचा मोलाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला पश्चिम भागातील ग्रामस्थ, महिला, प्रगतशील शेतकरी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कै. गोविंदा सणस यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी भावपूर्ण प्रार्थना त्यांचे पुतणे जगन्नाथ शंकर सणस, अनुसया, लक्ष्मी, द्रोपदा, नंदा तसेच नातू गणेश सणस, किरण सणस आणि समस्त सणस परिवाराने व्यक्त केली.

5) पाटण:-मालदन सोसायटीवर भाजपचा भगवा; पालकमंत्री शंभुराज देसाई पॅनेलला मोठा धक्का! १३ पैकी ११ जागांवर ‘श्री बहिरदेव ग्रामविकास शेतकरी पॅनेल’ची दणदणीत सरशी.


पाटण, दि. १६ : पाटण तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेची मानली जाणारी मालदन विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने जोरदार विजय मिळवत आपला झेंडा रोवला आहे. भाजप नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील *‘श्री बहिरदेव ग्रामविकास शेतकरी पॅनेल’*ने १३ पैकी तब्बल ११ जागांवर दणदणीत विजय मिळवत सोसायटीवर वर्चस्व प्रस्थापित केले.
या निवडणुकीत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील *‘श्री भैरवनाथ ग्रामविकास शेतकरी परिवर्तन पॅनेल’*ला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वर्तुळात या निकालाने मोठी खळबळ उडाली आहे.
मालदन गावासह परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या या सोसायटीच्या निवडणुकीत दोन्ही पॅनेलमध्ये चुरशीची लढत झाली. मात्र, मतदारांनी पाटणकर गटाच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपच्या पॅनेलला स्पष्ट बहुमत दिले.
निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि जल्लोष करत विजय साजरा केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गीतांजली कुंभार यांनी काम पाहिले.
विजयी उमेदवारांचे भाजप नेते सत्यजितसिंह पाटणकर, प्राना फाऊंडेशनच्या डॉ. प्राची पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, मालदनच्या सरपंच सौ. गीतांजली काळे, माजी सरपंच संदीप पाटील, नितीन पाटील (भैय्यासाहेब) यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.
या विजयासाठी सरपंच सौ. गीतांजली काळे, संदीप पाटील, शामराव काळे, प्रतापराव काळे, अजितराव काळे, जगदीश काळे, वैभव काळे, एम. डी. पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट : विजयी उमेदवार
भाजप – श्री बहिरदेव ग्रामविकास शेतकरी पॅनेल :
सुरेश दिनकरराव काळे, श्रीकांत राजाराम घारगे, जितेंद्र शंकरराव काळे, समाधान शरदराव काळे, पोपट बाळकृष्ण यादव, काशिनाथ लक्ष्मण पानवळ, संजय जोती साबळे, उज्वला भास्कर गायकवाड, खशाबा गणपती गायकवाड, अनिल कृष्णा सपकाळ, पांडूरंग सखाराम नलवडे.
भैरवनाथ ग्रामविकास शेतकरी परिवर्तन पॅनेल :
संजय मोहनराव काळे, विमल हणमंत मोरे.

6) सातारा:-आले व्यापारातून वेगळी ओळख; गणेशवाडीचे रवींद्र जाधव ‘राजधानी गौरव कृषी उद्योग भूषण’ पुरस्काराने सन्मानित.


सातारा, दि. १६ : आले शेती व्यापार आणि कृषी व्यवसाय क्षेत्रात कल्पकता, प्रामाणिक कष्ट आणि दूरदृष्टीच्या बळावर वेगळी ओळख निर्माण करणारे गणेशवाडी (ता. जि. सातारा) येथील उद्योजक रवींद्र शंकर जाधव यांना यावर्षीचा मानाचा ‘राजधानी गौरव कृषी उद्योग भूषण पुरस्कार – २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला.
आले उत्पादन आणि व्यापार क्षेत्रात काम करताना रवींद्र जाधव यांनी केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता आले उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची व योग्य बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत झाली असून कृषी व्यापारात पारदर्शकता आणि शेतकऱ्यांचा फायदा ही तत्त्वे त्यांनी सातत्याने जपली आहेत.
कार्यक्रमावेळी मान्यवरांनी जाधव यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, “शेतीपूरक व्यवसायातून प्रगती साधताना समाजाचे देणे लागते या भावनेतून रवींद्र जाधव यांनी केलेले कार्य तरुण उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.”
या पुरस्कारामुळे सातारा जिल्हा तसेच गणेशवाडी परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपल्या कामगिरीची दखल घेतल्याबद्दल रवींद्र जाधव यांनी आयोजकांचे आभार मानले असून, “हा पुरस्कार माझ्या कार्याची जबाबदारी अधिक वाढवणारा आहे,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button