वाई:-परंपरेच्या बेड्या तोडत अनपटवाडीचा ऐतिहासिक निर्णय; गाव झाले ‘विधवा प्रथा मुक्त’
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

परंपरेच्या बेड्या तोडत अनपटवाडीचा ऐतिहासिक निर्णय; गाव झाले ‘विधवा प्रथा मुक्त’ – ९४ वर्षांच्या सुलोचना मांढरे आजींनीही स्वीकारला हळदी-कुंकवाचा मान; जयहिंद फाउंडेशनचा क्रांतिकारी उपक्रम.

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
वाई, दि. १५ : वाई तालुक्यातील अनपटवाडी येथे १४ मार्च रोजी सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. जयहिंद फाउंडेशन आणि ग्रामपंचायत अनपटवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात लोकसहभागातून संपूर्ण गाव ‘विधवा प्रथा मुक्त’ झाल्याची घोषणा करण्यात आली. परंपरेच्या नावाखाली लादल्या गेलेल्या अनिष्ट प्रथांना छेद देत गावातील विधवा महिलांना सन्मानाने हळदी-कुंकू लावून या सामाजिक क्रांतीची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात अनपटवाडी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करून केली. त्यानंतर ग्रामपंचायत परिसरात उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाचे उद्घाटन वीरपत्नी प्रियांकाताई नवनाथ दाभाडे, प्रियंकाताई सोमनाथ मांढरे आणि सैनिक पत्नी शारदाताई नंदकुमार अनपट यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीताने वातावरण भारावून गेले.
यानंतर ग्रामदैवत श्री वाकडेश्वर महाराज मंदिरात जयहिंद फाउंडेशनचे सभासद व माजी सैनिक चंद्रकांत इंगळे यांच्या हस्ते आरती व पूजन करून मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली.
या प्रसंगी दिशा अकॅडमीच्या संचालिका रुपाली कदम, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या प्रांत महिला उपाध्यक्ष शुभदा नागपूरकर, लोकमान्य टिळक स्मारक संस्थेच्या तनुजा इनामदार, बावधनच्या सरपंच वंदना कांबळे, डॉ. तृप्ती चक्के, समाजसेवक चक्रपाणी चाचर, नितीन मांढरे, पत्रकार तानाजी कचरे आदी मान्यवर उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवरांनी आपल्या मनोगतात विधवा प्रथा मुक्तीचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. शुभदा नागपूरकर यांनी जयहिंद फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत या चळवळीत सक्रिय सहभागी होण्याचे आश्वासन दिले. तर डॉ. तृप्ती चक्के यांनी हुतात्मा सैनिक कुटुंबियांना त्यांच्या रुग्णालयात ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर आरोग्य सेवा देण्याची घोषणा केली. सौ. हेमलता फडतरे यांनी उपस्थित महिलांना विधवा प्रथा मुक्तीची शपथ दिली.
या वेळी गावातील सुमारे २० महिलांना सौभाग्याचे लेण देऊन हळदी-कुंकू लावण्यात आले. वीरपत्नी प्रियांकाताई दाभाडे व प्रियंकाताई मांढरे यांचाही सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे ९४ वर्षीय सुलोचना तुकाराम मांढरे यांनीही उत्साहाने हळदी-कुंकवाचा मान स्वीकारत या क्रांतिकारी निर्णयाला समर्थन दिले.
दरम्यान, जयहिंद फाउंडेशनच्या वतीने बावधन ग्रामपंचायतीच्या सरपंच वंदना कांबळे यांना बावधन गावही विधवा प्रथा मुक्त करण्याबाबत निवेदन देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन जयहिंद फाउंडेशनच्या राष्ट्रीय संचालिका मनीषा अरबुणे यांनी केले, तर सूत्रसंचालन हनुमंत मांढरे यांनी केले. या सोहळ्यासाठी जयहिंद फाउंडेशनच्या खटाव, सातारा, बारामती आणि वाई येथील पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सांगता अनपटवाडी प्राथमिक शाळेत सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांच्या सहभोजनाने झाली.




