आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई:-पसरणीत ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; तहसीलदार सोनाली मिटकरींकडून नागरिकांच्या प्रश्नांना दिलासा.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-पसरणीत ‘महाराजस्व समाधान’ शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; तहसीलदार सोनाली मिटकरींकडून नागरिकांच्या प्रश्नांना दिलासा.

 सातारा जिल्हा प्रतिनिधी सारिका गवते

वाई दि. १५ : पसरणी व पश्चिम भागातील नागरिकांच्या महसूल विषयक प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात अनेक दाखल्यांचे जागीच वितरण करत महसूल प्रशासनाने नागरिकांना दिलासा दिला.
वाई महसूल विभागाच्या वतीने पसरणी येथे हे शिबिर पार पडले. दुर्गम भागातील नागरिकांना दाखल्यांसाठी वारंवार शहरात चकरा माराव्या लागू नयेत, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात उत्पन्न, रहिवासी, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र यांचे जागीच वाटप करण्यात आले. तसेच प्रलंबित फेरफार नोंदी, ७/१२ उताऱ्यावरील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे उतारे आणि शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असलेले मोफत दाखले देण्यात आले.
कार्यक्रमात वाई पंचायत समितीचे सदस्य स्वप्निल गायकवाड यांनी प्रशासनासमोर स्थानिक समस्यांचा मुद्देसूद पाढा मांडला. विशेषतः कुणबी दाखले मिळवताना नागरिकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी, पाणंद रस्त्यांचे प्रश्न आणि रेशनिंग कार्डाशी संबंधित समस्या याकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
यावर उत्तर देताना तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असून, सर्व त्रुटींचे येत्या काळात प्राधान्याने निरसन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सोनाली मिटकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते अशोकराव बापू गायकवाड, सरपंच हेमलता गायकवाड, नायब तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे, अमोल मर्ढेकर, माजी सरपंच राजेंद्र शिर्के, यादव आबा

महांगडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पसरणी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सामान्य माणसाला शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. महसूल विभागाने कुणबी दाखल्यांच्या प्रक्रियेत अधिक सुलभता आणणे गरजेचे आहे.”
— स्वप्निल गायकवाड, सदस्य, वाई पंचायत समिती

2) कोरेगाव:-कष्टकरी हातांना मायेचा आधार: पिंपोडे बुद्रुकची ‘बांधकाम कामगार सामाजिक संस्था’

कोरेगाव दि. १५ : बांधकाम क्षेत्रात राबणाऱ्या कष्टकरी हातांना संघटित करून त्यांच्या आयुष्यात प्रकाशाची किरणे पसरवण्याचे काम पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथील ‘बांधकाम कामगार बहुउद्देशीय सामाजिक संस्था’ अत्यंत प्रभावीपणे करत आहे. शासनाच्या योजना आणि कामगार यांच्यातील दुवा बनलेली ही संस्था आज खऱ्या अर्थाने कामगारांसाठी ‘आधारवड’ ठरत आहे.
अनेक बांधकाम कामगारांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती नसते, तर काहींना कागदपत्रांच्या तांत्रिक अडचणींमुळे लाभापासून वंचित राहावे लागते. अशा वेळी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष सचिन टिके आणि त्यांचे सहकारी कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत आहेत. नोंदणी प्रक्रिया, विमा संरक्षण, शैक्षणिक अर्थसाहाय्य आणि इतर शासकीय लाभांसाठी संस्थेमार्फत सातत्याने पाठपुरावा केला जातो. यामध्ये कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी कामगारांना योग्य दिशा दाखवणे, कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आवाज उठवणे तसेच केवळ कामापुरते मर्यादित न राहता कामगारांच्या कुटुंबातील सुख-दु:खात सहभागी होणे. या कामांचा समावेश आहे.
पिंपोडे बुद्रुकमध्ये सुरू झालेले हे कार्य आता केवळ गावापुरते मर्यादित न राहता संपूर्ण सातारा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे. सचिन टिके यांच्या निस्वार्थी नेतृत्वामुळे कामगार वर्गामध्ये संस्थेबद्दल मोठी आपुलकी आणि विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. भविष्यातही ही संस्था अधिक व्यापक स्वरूपात कामगारांच्या कल्याणासाठी कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

3) शिरवळमध्ये ‘महाराजस्व अभियान’ समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ८७०

शिरवळ, दि. १५ : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत शिरवळ मंडल स्तरावरील ‘समाधान शिबिर’ शनिवार, दि. १४ मार्च २०२६ रोजी कै. तुकाराम संतोबा कबुले हॉल येथे उत्साहात पार पडले. या शिबिरातून महसूल विभागाने सेवा थेट नागरिकांच्या दारात पोहोचवत एकाच छताखाली शेकडो प्रलंबित प्रश्न निकाली काढले.
या शिबिराचे उद्घाटन पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (पुनर्वसन) नंदकुमार कोष्टी यांच्या हस्ते झाले. यावेळी वाईचे उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे, सातारा विशेष भूसंपादन अधिकारी अभिषेक देशमुख आणि खंडाळा तहसीलदार सुहास थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या अर्चनाताई यादव, सरपंच रविराज दुधगावकर, माजी सभापती राजेंद्र तांबे, माजी उपसरपंच अमोल कबुले, संजय गांधी योजनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्यासह शिरवळ ग्रामपंचायतीचे सदस्य आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने या शिबिरासाठी केलेल्या नियोजनामुळे शिरवळ मंडळातील गावांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. शिबिरात ८७० विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये ७०५ डिजिटल ७/१२, २५९ ‘८अ’ उतारे, १४१ फेरफार प्रकरणे निकाली, तर सातबारा दुरुस्तीचे ४२ अर्ज स्वीकारले गेले. तसेच १२१ अर्जांवर जागीच कार्यवाही करण्यात आली. भूसंपादन व अकृषक (NA) परवानगीची काही प्रलंबित प्रकरणे मार्गी लावत गाव दप्तर अद्यावत करण्याचे कामही करण्यात आले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी शिरवळचे मंडल अधिकारी एम. आर. डोईफोडे, निवासी नायब तहसीलदार हेमंत कामत, पुरवठा विभागाच्या स्मिता आगाशे, निवडणूक नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी तसेच विविध गावांतील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांनी विशेष परिश्रम घेतले.

4) वाई:-मंत्र्यांच्या आदेशालाच प्रशासनाची केराची टोपली? नियुक्ती आदेश असूनही दीपाली वाडकर यांना रुजू होण्यापासून रोखल्याचा गंभीर आरोप.

वाई, दि. १५ : शासनाकडून अधिकृत नियुक्ती आदेश मिळूनही स्थानिक प्रशासनाच्या टोलवाटोलवीमुळे एका महिलेला कर्तव्यावर रुजू होण्यापासून रोखण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वाई तालुक्यात समोर आला आहे. प्रभाग समन्वयक पदासाठी नियुक्त झालेल्या दीपाली शिवाजी वाडकर यांनी प्रशासनावर मानसिक छळ व दप्तरदिरंगाईचे गंभीर आरोप केले असून, न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली वाडकर यांना १६ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्रामजीवनोन्नती अभियानांतर्गत प्रभाग समन्वयक पदासाठी नियुक्ती आदेश प्राप्त झाला. त्यानंतर त्यांनी सातारा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे (DRDA) आपला हजर रिपोर्ट सादर केला. मात्र, १८ फेब्रुवारी रोजी वाई पंचायत समितीत रुजू होण्यासाठी गेल्यानंतर त्यांना विविध कारणे सांगून परत पाठवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वाडकर यांनी गटविकास अधिकाऱ्यांची (BDO) भेट घेतल्यानंतर संबंधित कार्यालयात पत्र देण्यास सांगण्यात आले. मात्र, तालुका व्यवस्थापकांनी “जिल्हा स्तरावरून मेल आलेला नाही” किंवा “नेटवर्क समस्या आहे” अशी कारणे देत त्यांना रुजू करून घेण्यास नकार दिला. तसेच “BDO यांना भेटल्याशिवाय पत्र स्वीकारायचे नसते” असे सांगत कर्मचाऱ्यांनी वाद घातल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, २२ फेब्रुवारी रोजी वाडकर यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. मंत्र्यांनी त्यांना वाई तालुक्यातच सामावून घेण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचे सांगितले जाते. मात्र, मंत्र्यांच्या सूचनेनंतरही स्थानिक अधिकाऱ्यांनी जवळपास १५ ते २० दिवस कोणताही निर्णय न घेता त्यांना कार्यालयात बसवून ठेवले, असा आरोप वाडकर यांनी केला आहे.
दरम्यान, ४ मार्च २०२६ रोजी प्रकल्प संचालकांनी त्यांचा नियुक्ती आदेश रद्द झाल्याचे तोंडी सांगितले. संबंधित पत्र वाचू न देताच त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा दावा वाडकर यांनी केला असून, त्यांनी त्यास स्पष्ट नकार दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आता जिल्हा प्रशासन याबाबत काय भूमिका घेते आणि मंत्र्यांच्या आदेशाचा मान राखला जातो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
चौकट : पीडित उमेदवाराची भूमिका
“माझ्याकडे वैध नियुक्ती आदेश असतानाही मला रुजू करून घेतले जात नाही. प्रशासकीय स्तरावर माझा मानसिक छळ होत आहे. मला न्याय न मिळाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आमरण उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडणार आहे.”
— दीपाली शिवाजी वाडकर, पीडित उमेदवार
चौकट : प्रशासनाची बाजू
“या प्रकरणाशी वाई पंचायत समितीचा थेट संबंध नाही. प्रभाग समन्वयक हा कर्मचारी पंचायत समितीच्या अखत्यारीत येत नाही. शासनाच्या आदेशानुसार ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. दीपाली वाडकर यांची नियुक्ती शासनाने नियुक्त केलेल्या खासगी कंपनीमार्फत झाली होती. त्या कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर विश्वास सिद्ध यांनीच नियुक्ती रद्द केल्याने आम्ही त्याची अंमलबजावणी केली.”
— नारायण घोलप, गटविकास अधिकारी, वाई
ठळक मुद्दे
• मंत्र्यांच्या सूचनेनंतरही २० दिवस निर्णय नाही
• मेल असूनही ‘नेटवर्क समस्या’चे कारण पुढे
• जुन्या कर्मचाऱ्याने चार्ज सोडला नसल्याचा आरोप
• हजर रिपोर्टवर तातडीने निर्णय घेऊन दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी.

5) कराड:-आर्थिक स्वावलंबनातूनच महिलांचे खरे अस्तित्व: डॉ. स्वाती थोरात.

समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालयात ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा
कराड दि. १५ : “परिवर्तन हा समाजजीवनाचा नियम आहे. महिलांनी केवळ घरापुरते मर्यादित न राहता शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि सामाजिक क्षेत्रातही धाडसाने पुढे यावे. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभे राहिल्यासच समाजाला महिलांच्या अस्तित्वाची खरी जाणीव होते,” असे प्रतिपादन मलकापूर नगरपरिषदेच्या नगरसेविका व मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. स्वाती थोरात यांनी केले.
मलकापूर येथील समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहनाज शेख होत्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वाचनालयाच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. स्वाती थोरात यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ. सोनाली थोरात यांनी सोशल मीडियाच्या युगातही वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले, तर अध्यक्षा शहनाज शेख यांनी महिलांचे हक्क आणि स्त्रीविषयक कायद्यांविषयी सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमास सुलोचना भिसे (मुख्याध्यापिका, प्र. चव्हाण कन्या शाळा), शिला पाटील (विभाग प्रमुख, आदर्श ज्युनिअर कॉलेज), ज्योती शिंदे (मुख्याध्यापिका, आदर्श प्राथमिक विद्यालय) यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच वाचनालयाचे संचालक सुधीर लादे, दत्तात्रय शिर्के, रंजना काटवटे, सविता कोळी यांच्यासह परिसरातील महिला व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल वैशाली शेवाळे यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय उपाध्यक्षा सुरेखा खंडागळे यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया माने यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कोमल पवार यांनी केले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button