वाई:-मृत्यूला चुकवत पसरणी घाटात कंटेनरचा कहर! कारला जोरदार धडक देत कठड्यावर उलटला.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

1) वाई:-मृत्यूला चुकवत पसरणी घाटात कंटेनरचा कहर! कारला जोरदार धडक देत कठड्यावर उलटला.

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
वाई दि. २७ : वाई-पाचगणी मार्गावरील पसरणी घाटात बुधवारी सायंकाळी थरारक अपघात घडला. भरधाव वेगातील कंटेनरने कारला जोरदार धडक देत संरक्षक कठड्यावर उलटल्याने काही काळ घाट परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
ही घटना दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास बुवासाहेब मंदिराजवळ घडली. संपत दगडू आंब्राळे (वय ५५, रा. आंब्रळ, ता. महाबळेश्वर) हे आपल्या कारने वाईहून पाचगणीकडे जात होते.
त्याचवेळी समोरून वाईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरचा चालक मकसुदन श्रीरामाकांत उपाध्याय (रा. दहिसर, मुंबई) याचा वाहनावरील ताबा सुटला. भरधाव कंटेनरने प्रथम घाटातील संरक्षक कठड्याला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर आंब्राळे यांच्या कारवर आदळून रस्त्यावर उलटला. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या प्रकरणी संपत आंब्राळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चालक मकसुदन उपाध्याय याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जे. पी. शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली असून पोलीस हवालदार भोईर पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, पसरणी घाटात वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून वाहनचालकांनी घाटात वेगावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
2) वाई:-‘दरमहा ३० हजारांचे आमिष’ दाखवून ट्रॅक्टर लंपास; २३ वर्षीय भामटा गजाआड, १० लाखांचा मुद्देमाल जप्त!

वाई दि. २७ : “तुमचा ट्रॅक्टर कंपनीत भाड्याने लावतो, दरमहा ३० हजार रुपये मिळवून देतो,” असे आमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या २३ वर्षीय भामट्याला वाई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून तब्बल १० लाख रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून फसवणूकग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय संतोष चव्हाण (वय २३, रा. सरताळे, ता. जावली, जि. सातारा) याने स्वतःची ओळख ‘एजंट’ म्हणून करून देत तक्रारदार निखिल तानाजी धुमाळ (रा. नायगाव, ता. कोरेगाव) आणि प्रशांत बबन सोळस्कर यांचा विश्वास संपादन केला.
सोनगिरवाडी (वाई) येथे नोटरी करून, “ट्रॅक्टर कंपनीत भाड्याने लावतो आणि दरमहा ३० हजार रुपये देतो,” असे सांगत त्याने कुबोटा ट्रॅक्टर (क्र. MH 11 DN 9524) व ट्रॅक्टर (क्र. MH 11 DF 4514) ताब्यात घेतले. ट्रॅक्टर मिळताच आरोपीने मोबाईल बंद करून पोबारा केला.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित शेतकऱ्यांनी वाई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी अजय चव्हाण याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून दोन्ही ट्रॅक्टर हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, सपोनि अमोल गवळी, फौजदार सुधीर वाळुंज तसेच नितीन कदम, हेमंत शिंदे, स्नेहल सोनावणे, विक्रम धोत्रे, श्रावण राठोड, विशाल शिंदे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, “कोणालाही आपले वाहन किंवा मौल्यवान वस्तू भाड्याने देताना संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती व पडताळणी करा. केवळ कागदोपत्री करारावर विसंबून राहू नका,” असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
3) सातारा:-संत गाडगे महाराज हे समाजाचे खरे विश्वस्त; प्रा. श्रीधर साळुंखे यांचे सातार्यात प्रतिपादन.

गाडगे बाबांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सातार्यात १५० रक्तबॅगचे संकलन आणि जिल्हाभर स्वच्छता अभियान.
सातारा दि. २७ : “जीवनात शिक्षणाचे महत्त्व, अंधश्रद्धा निर्मूलन आणि व्यसनमुक्ती यावर कठोर प्रहार करणारे राष्ट्रसंत संत गाडगे महाराज हे मानवतेचे पुजारी आणि समाजाचे खरे विश्वस्त होते. मानवसेवा हीच माधवसेवा मानून त्यांनी उभे केलेले कार्य आजही समाजाला दिशा देणारे आहे,” असे गौरवपूर्ण प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. श्रीधर साळुंखे यांनी केले.
कामाठीपुरा, सातारा येथे संत गाडगेबाबा समाज सेवा संस्था व जिल्हा लॉन्ड्री संघटना यांच्या वतीने आयोजित गाडगे बाबांच्या १५० व्या जयंती उत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक भिकू राक्षे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक कल्याण राक्षे उपस्थित होते.
प्रा. साळुंखे पुढे म्हणाले, “अखिल मानवजातीसाठी कार्य करणाऱ्या संतांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करणे म्हणजे त्यांच्या अथांग कर्तृत्वाला खुजे करण्यासारखे आहे. बाबांनी सांगितलेली ‘दशसूत्री’ ही केवळ नियमावली नसून ती मानवोद्धाराची आचारसंहिता आहे. त्यांचा निष्काम कर्मयोग आणि चारित्र्यसंपन्न निर्व्यसनीपणा आजच्या पिढीने अंगीकारणे हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल.”
यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी झालेल्या समाजबांधवांचा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रवीण राक्षे (आदर्श पोलीस पाटील), अशोकराव कोकाटे (आदर्श एस.टी. महामंडळ अधिकारी) आणि चेतन पिसाळ (आदर्श मार्केट कमिटी अधिकारी) यांचा विशेष गौरव करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव काटकर यांनी सांगितले की, बाबांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जिल्हाभरात १५० ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले. तसेच आयोजित रक्तदान शिबिरात तरुणांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून तब्बल १५० रक्तबॅग संकलित करण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी दिलीपराव काटकर, चंद्रकांत शेडगे व महेश सुळे यांनी स्वागत केले. प्रास्ताविक सौ. माणिक हजारे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. बाळासाहेब काटकर यांनी केले, तर आभार पत्रकार जयवंत पिसाळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरविंद शेडगे, हणमंतराव साळुंखे, अरविंद राक्षे, वसंतराव गहिने, संतोष राक्षे व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
4) वाई पंचायत समिती वाईत ‘काम बंद’चा इशारा; कर्मचारी संघटनांचा एल्गार, प्रशासनासमोर मोठे आव्हान!
प्रशासकीय कामकाज ठप्प; विविध संघटनांच्या पाठिंब्याने आंदोलन तीव्र.
वाई दि. २७ : पंचायत समिती वाई येथील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांसाठी पुकारलेला संप आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. तालुक्यातील विविध कर्मचारी संघटनांनी लेखी पाठिंबा जाहीर केल्याने या आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली असून पंचायत समितीचे दैनंदिन प्रशासकीय कामकाज अक्षरशः ठप्प झाले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन (शाखा वाई) तसेच सातारा जिल्हा परिषद विस्तार अधिकारी (सांख्यिकी) संघटना यांनी अधिकृत पत्राद्वारे संपाला जाहीर पाठिंबा दर्शवला. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संदीप सावंत, तालुका अध्यक्ष रामदास निंबाळकर, मोहन कोळी, दिलीप जुनगरे, श्रीमती हाके व श्रीमती नुले उपस्थित होते.
याशिवाय शिक्षक समिती आणि अभियंता संघटना (वाई तालुका) यांनीही कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे स्पष्ट करत आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
या संपाचे नेतृत्व किरण पाटणे, कुणाल दीक्षित, बिपीन सुर्वे, संदीप कोकीळ, श्रीकांत देशमुख, अनिल धायगुडे, अतुल माने, इंद्रजित शेलार, सुजय करणे, नितीन पवार यांच्यासह फरिदा मुल्ला, शीतल गाढवे, शोभा पिसाळ, वसुंधरा वाजे, कुलकर्णी, नानजकर यांनी केले. तसेच सचिन जाधव, विश्वास क्षीरसागर, राजेंद्र भवारी आणि सागर जाधव यांनीही आंदोलनात हिरीरीने सहभाग नोंदवला. विस्तार अधिकारी संघटनेचे तालुका सचिव शाम राठोड यांनी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला ठाम समर्थन दिले.
विविध संघटनांच्या एकजुटीमुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून, “मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही,” असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, संपामुळे नागरिकांची कामे प्रलंबित राहत असून प्रशासनावर तोडगा काढण्याचा दबाव वाढला आहे.




