शिवडी-(मुंबई)-स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे! ‘स्वच्छ शिवडी – सुंदर शिवडी’ अभियानांतर्गत शिवडीत स्वच्छता मोहिमेचा उत्साहात शुभारंभ.
पत्रकार विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिवडी-(मुंबई)-स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे!
‘स्वच्छ शिवडी – सुंदर शिवडी’ अभियानांतर्गत शिवडीत स्वच्छता मोहिमेचा उत्साहात शुभारंभ.

स्वच्छता मोहीम क्रमांक २० अंतर्गत टी.जे. रोड परिसर चकाचक करण्यासाठी प्रशासन व शिवसैनिकांचा पुढाकार.
शिवडी, मुंबई | प्रतिनिधी
‘स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे’ या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड देत स्वच्छ_शिवडी_सुंदर_शिवडी या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम क्रमांक २० राबविण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, शिवसेना आमदार श्री. अजय चौधरी यांच्या सूचनेनुसार प्रभाग क्रमांक २०६ मधील टी. जे. रोड, शिवडी येथील स्वर्गीय मोहन रावले उद्यान ते बहारी बिल्डिंग परिसरात या विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण विभाग कार्यालयाच्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहिमेत परिसरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

या स्वच्छता मोहिमेच्या प्रसंगी शिवसेना आमदार श्री. अजयजी चौधरी, शिवसेना शाखाप्रमुख हनुमंत बैजू हिंदोळे, महिला शाखा समन्वयिका भारती देवाडिगा, तसेच शाखेचे महिला व पुरुष उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आणि स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभाग, मेंटेनन्स विभाग, आरोग्य विभाग, पी.सी.ओ. विभाग आदी विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनीही स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. प्रशासन, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
‘स्वच्छ शिवडी – सुंदर शिवडी’ हा उपक्रम केवळ स्वच्छता मोहिमेपुरता मर्यादित न राहता, नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी कायमस्वरूपी जनजागृती निर्माण करणारा ठरावा, तसेच शिवडी परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी करण्यासाठी सर्वांनी सामूहिकपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.




