वाई:-कळंभे गावात २०० वृक्षांचे भव्य वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनासाठी सीसीटीव्हीचा पहारा!
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-कळंभे गावात २०० वृक्षांचे भव्य वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनासाठी सीसीटीव्हीचा पहारा!
१२ लाखांच्या बक्षिसातून पाण्याचा टँकर, सोलर पॅनल, शाळा सुधारणा व मोफत रुग्णवाहिकेचे नियोजन.

वाई | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन पंचायत समिती वाई आणि ग्रामपंचायत कळंभे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, दिनांक २३ जुलै २०२६ रोजी कळंभे येथे भव्य वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम उत्साहात पार पडला. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत गणपतीचा माळ कळंभे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंभे तसेच वैकुंठ स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारच्या तब्बल २०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमास पाचवड पंचायत समिती गणाच्या सदस्या सौ. राणीताई कांतीलाल पवार, वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. नारायण घोलप, तालुका कृषी अधिकारी श्री. शांताराम गोळे, विस्तार अधिकारी श्री. पवार साहेब, तसेच पंचायत समिती वाईच्या विविध विभागांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी कळंभे गावच्या सरपंच सौ. निलम शिवथरे, उपसरपंच सौ. शकुंतला चव्हाण, माजी सरपंच सौ. ज्योती गायकवाड, माजी सरपंच सौ. सारीका गायकवाड, माजी उपसरपंच श्री. आबाजी सुतार, माजी उपसरपंच श्री. प्रकाश बाबर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. रघुनाथ भोईर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.
🌱 वृक्षलागवडीसोबत वृक्षसंवर्धनावरही भर
कळंभे येथील गणपतीचा माळ मंदिर व खाणी परिसरात यापूर्वी वृक्षलागवड करण्यात आलेल्या ठिकाणी काही समाजकंटकांकडून नशापाणी करण्याचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले. या परिसरात मोठ्या प्रमाणात रिकाम्या बाटल्या व काचेचा कचरा आढळून आल्याने वृक्षसंवर्धनासह परिसराच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित झाला.
वृक्षारोपण कार्यक्रमादरम्यान ही बाब उपस्थित शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. त्यामुळे वृक्षलागवड केलेल्या परिसराचे संरक्षण, झाडांची नासधूस रोखणे, गुरेढोरे झाडांचे नुकसान करू नयेत तसेच समाजकंटकांच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायत कळंभेच्या वतीने प्रथम टप्प्यात तातडीने तीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कळंभे गावाची चांगली ओळख आणि प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेऊन अशा गैरप्रकारांना आळा घालण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
☀️ १२ लाखांच्या बक्षिसातून गावाच्या विकासाला नवी दिशा!
कळंभे हे वाई तालुक्याचे प्रवेशद्वार मानले जाते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात वाई तालुक्यात कळंभे ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक पटकावल्याने १२ लाख रुपयांची बक्षीस रक्कम ग्रामपंचायतीस प्राप्त होणार आहे.
या बक्षिसाच्या रकमेतून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनासाठी आवश्यक असणारा पाण्याचा टँकर खरेदी करण्यात येणार आहे. तसेच गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी २० किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
याशिवाय उर्वरित निधीतून जिल्हा परिषद शाळेच्या आवश्यक सुधारणा करण्याबरोबरच गावातील नागरिकांसाठी कायमस्वरूपी मोफत सेवाशुल्काच्या धर्तीवर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा मानस ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे वृक्षसंवर्धनासोबतच पाणी, ऊर्जा, शिक्षण आणि आरोग्य या चारही क्षेत्रांना विकासाची जोड मिळणार आहे.
🌿 ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
या वृक्षारोपण अभियानात सौ. राणीताई कांतीलाल पवार, विस्तार अधिकारी श्री. पवार साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री. शांताराम गोळे, सरपंच सौ. निलम शिवथरे, उपसरपंच सौ. शकुंतला चव्हाण, माजी सरपंच सौ. ज्योती गायकवाड, सौ. सारीका गायकवाड, माजी उपसरपंच श्री. आबाजी सुतार, श्री. प्रकाश बाबर, ग्रामपंचायत अधिकारी श्री. रघुनाथ भोईर यांच्यासह सीआरपी सौ. नुतन बाबर, कृषीसखी सौ. उल्का शिवथरे, अंगणवाडी सेविका सौ. दिपाली नलवडे, सौ. दिपाली शिवथरे, श्री. रमेश वाघमारे गुरूजी, श्री. संजय बाबुराव गायकवाड, श्री. दत्तानाना गायकवाड, श्री. सुनिल शिवथरे-पाटील, माजी उपसरपंच श्री. राजाराम शिवथरे, श्री. आदिनाथ गायकवाड, श्री. विठ्ठल शिवथरे, श्री. यादवराव शिवथरे, श्री. सुरेश शिवथरे, श्री. शिवाजी पवार, श्री. दिलीप वाघ, सौ. माधुरी वाघ यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
“झाडे लावा, झाडे जगवा आणि कळंभे गाव हिरवेगार करा” हा संदेश देत या अभियानात सहभागी झालेल्या सर्व मान्यवर, अधिकारी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि ग्रामस्थांचे ग्रामपंचायत कळंभेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.




