आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-बेंदूराचा बट्ट्याबोळ! डॉल्बीच्या दणदणाटाने परंपरेचा गळा घोटला.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-बेंदूराचा बट्ट्याबोळ! डॉल्बीच्या दणदणाटाने परंपरेचा गळा घोटला.

बैल दुय्यम… डॉल्बीच ठरला ‘राजा’; बेशिस्त तरुणांच्या धिंगाण्याने बेंदूराची पुसली ओळखच.

सातारा | वाई, दि. २८ :
शेतकऱ्यांच्या श्रमाचा साक्षीदार, मुक्या जनावरांप्रती कृतज्ञतेचा आणि ग्रामीण संस्कृतीचा अभिमान असलेला बेंदूर सण यंदा वाई तालुक्यात डॉल्बीच्या दणदणाटात अक्षरशः गुदमरला. बैलांच्या पूजनापेक्षा कानठळ्या बसवणाऱ्या डॉल्बीचा आवाज, बेशिस्त नृत्य आणि मद्यधुंद तरुणांचा धिंगाणा यांचीच अधिक चर्चा रंगली. परिणामी, परंपरेचा उत्सव की डॉल्बीचा तमाशा? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला.


दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसात शेतकऱ्यांनी आपल्या सर्जा-राजाला प्रेमाने सजवून मिरवणुकीत सहभागी केले. घुंगरमाळा, रंगीत शिंगे, फुलांचे हार आणि पारंपरिक साजाने बैल खुलून दिसत होते. मात्र मिरवणुकीत बैलांपेक्षा डॉल्बीच्या ट्रॉलीभोवतीच गर्दी उसळल्याचे चित्र सर्वत्र दिसले. अनेक ठिकाणी अवघे दोन-तीन बैल आणि त्यापेक्षा कितीतरी मोठा डॉल्बी असा विसंगत प्रकार पाहायला मिळाला.
कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे बैल सैरभैर होत असताना त्यांना सावरण्यासाठी मालकांची धावपळ सुरू होती; पण डॉल्बीवर बेभान नाचणाऱ्यांना त्याचे कोणतेही सोयरसुतक नव्हते. काही ठिकाणी मद्यधुंद अवस्थेतील तरुणांच्या बेशिस्त वर्तनामुळे कुटुंबासह आलेल्या नागरिकांनीही नाराजी व्यक्त केली. ज्यांच्या सन्मानासाठी हा सण, त्याच मुक्या जनावरांचा विचार सर्वाधिक दुर्लक्षित राहिल्याचे चित्र होते.
पसरणी, बावधन, ओझर्डे, खानापूर, बोपेगाव, कवठे, भुईंज, बोपर्डी तसेच वाई शहरातील विविध भागांतून मिरवणुका उत्साहात निघाल्या. किसनवीर चौकात सजविलेल्या बैलजोड्या दाखल होताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. बाजारपेठेला जत्रेचे स्वरूप आले; मात्र या उत्साहावर डॉल्बीच्या अतिरेकाने विरजण घातल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
बेंदूरच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने ध्वनीप्रदूषण आणि कायदा-सुव्यवस्थेबाबत सूचना दिल्या होत्या. तरीही अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसविल्याचे चित्र दिसले. ध्वनीप्रदूषणावर प्रभावी नियंत्रण आणि बेशिस्तपणावर कठोर कारवाईचा अभाव नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरला.
दरम्यान, या सर्व गोंधळातही आकर्षक सजावटीतील ‘पेढा’ या रुबाबदार रेड्याने मिरवणुकीचे खरे आकर्षण ठरवत नागरिकांची मने जिंकली. त्याच्यासोबत छायाचित्रे काढण्यासाठी मोठी गर्दी झाली आणि “बेंदूराची खरी शान अजूनही बैलच आहेत,” याची जणू सर्वांनाच आठवण करून दिली.
परंपरेला डॉल्बीची जोड नव्हे, तर संस्कृतीची ओढ हवी. बेंदूर हा जल्लोषाचा नव्हे, तर कृतज्ञतेचा सण आहे. मुक्या जनावरांचा सन्मान, ग्रामीण संस्कृतीचे जतन आणि सणाचे पावित्र्य टिकवणे ही प्रशासन, आयोजक आणि समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याची भावना यंदाच्या बेंदूरनिमित्त पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली.

2) शिरवळ:-शिरवळमध्ये सायबर फसवणुकीचा मोठा पर्दाफाश; तरुणीसह साथीदारांवर गंभीर गुन्हा दाखल.

सातारा | शिरवळ, दि. २८ :
शिरवळ परिसरात सायबर गुन्हेगारीचे मोठे जाळे उघडकीस आले असून, नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून मिळवलेले ₹८ लाख ३० हजार ८२ स्वतःच्या बँक खात्यात वळविल्याप्रकरणी श्रेया अभय गायकवाड (रा. शिरवळ, ता. खंडाळा) व तिच्या इतर साथीदारांविरोधात शिरवळ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्याच्या महिला अंमलदार सुनंदा जुनघरे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल तसेच महाराष्ट्र सायबर विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, शिरवळ येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत श्रेया गायकवाड हिने उघडलेल्या बचत खात्याचा ‘म्यूल बँक अकाऊंट’ म्हणून वापर करण्यात आला. या खात्यामार्फत डिजिटल अरेस्ट, पार्ट-टाईम जॉब ऑफर्स आणि इन्व्हेस्टमेंट स्कीम यांच्या आमिषाने देशभरातील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.
या खात्यात केरळ, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यांतील तब्बल ११ नागरिकांकडून फसवणुकीची रक्कम जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध विविध कायदेशीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

3) खंडाळा:-केसुर्डीजवळ अज्ञात वाहनाची पादचाऱ्याला जोरदार धडक; गंभीर जखमी, चालक फरार.

सातारा |
शिरवळ, दि. २८ : खंडाळा तालुक्यातील केसुर्डी गावाजवळ पुणे–सातारा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत पायी चालणारे संतोष बापूराव शेळके (वय ३५, रा. बिरोबा वस्ती, लोणंद, ता. खंडाळा) हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोरुग्ण असलेले संतोष शेळके हे घरातून बाहेर पडले होते. दि. १९ जुलै रोजी पहाटे केसुर्डी येथील नेटवायरल कंपनीजवळ पुणे–सातारा महामार्गावर ते चालत असताना किंवा रस्ता ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर वाहनचालकाने कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले.
या अपघातात संतोष शेळके यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अमोल दशरथ शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार तुषार कुंभार करीत आहेत.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button