“वाई पालिकेत सत्तेचा ठसा ठळक; विषय समित्या बिनविरोध, राष्ट्रवादी बाहेर… भाजपचा स्पष्ट संदेश!”
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

“वाई पालिकेत सत्तेचा ठसा ठळक; विषय समित्या बिनविरोध, राष्ट्रवादी बाहेर… भाजपचा स्पष्ट संदेश!”

वाई | प्रतिनिधी | ५ फेब्रुवारी २०२६
वाई नगरपालिकेतील विषय समित्यांच्या निवडीत सत्ताधारी भाजपने आपला दबदबा ठसठशीतपणे दाखवून दिला. बांधकाम, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण आदी सर्व महत्त्वाच्या समित्यांची निवड बिनविरोध पार पडत सभापतींची अधिकृत घोषणा करण्यात आली. अनेक दिवस रखडलेली प्रक्रिया अखेर पूर्ण झाल्याने पालिकेच्या प्रशासनिक गाड्याला आता वेग येणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विषय समित्यांची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी मुख्याधिकारी, उपनगराध्यक्ष घनश्याम उर्फ पिंटू चक्के व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापतीपदी नगराध्यक्ष अनिल सावंत यांची निवड करण्यात आली असून घनश्याम उर्फ पिंटू चक्के, केतकी मोरे, अपर्णा जमदाडे, नूतन मालुसरे, पद्मा जाधव पाडळे व नामनिर्देशित सदस्य विजय ढेकणे यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
नियोजन व विकास समितीची धुरा उपनगराध्यक्ष घनश्याम उर्फ पिंटू चक्के यांच्याकडे सोपवण्यात आली असून दीपाली सावंत व संग्राम सपकाळ सदस्य आहेत. शिक्षण समितीच्या सभापतीपदी नूतन मालुसरे, तर सदस्यपदी प्रसाद बनकर व ज्योती गांधी यांची निवड झाली आहे. स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदाची जबाबदारी केतकी मोरे यांच्याकडे देण्यात आली असून जागृती पोरे व संग्राम सपकाळ सदस्य आहेत.
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी अपर्णा जमदाडे, तर सदस्यपदी ज्योती गांधी व प्रसाद बनकर यांची निवड झाली आहे. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पद्मा जाधव पाडळे, तर दीपाली सावंत व जागृती पोरे सदस्यपदी आहेत.
दरम्यान, संख्याबळ असूनही राष्ट्रवादी काँग्रेसला एकाही समितीत स्थान मिळाले नाही. पुरेसा वेळ देऊनही नामनिर्देशन न करता राष्ट्रवादी सदस्यांनी सभात्याग करत निवड प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. या घटनेमुळे पालिकेतील राजकीय वातावरण तापले असून “सत्ता कुणाच्या हातात?” हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
एकूणच, वाई नगरपालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट झाले असून येत्या काळात विकासकामे की राजकीय संघर्ष, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.




