सातारा जिल्ह्यात मतदानासाठी मतदान यंत्रणा सज्ज,,,..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
1) सातारा जिल्ह्यात मतदानासाठी मतदान यंत्रणा सज्ज,,,..
सातारा दि: सातारा जिल्हा परिषदेच्या ६५ गट आणि ११ पंचायत समितीच्या १३० गणासाठी शनिवारी दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीमध्ये मतदान होत आहे. या मतदानासाठी जिल्ह्यात ११ हजार ८२२ मतदान यंत्र तैनात करण्यात आले आहेत. सातारचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील २१ लाख९४ हजार ११० मतदार मतदान करणार आहेत. यासाठी वीस हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील जावळी, पाटण, महाबळेश्वर, वाई ,कराड येथील काही अति दुर्गम व मागास भागातही मतदान यंत्रणा पोहोचवण्यासाठी हालचाली सुरू आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये आठ वर्षानंतर होणाऱ्या सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात सत्ताधाऱ्यांतर्गतच तसेच विरोधी पक्षातील उमेदवारांची कसोटी लागणार आहे. बऱ्याच अपेक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत . स्थानिक जिरवा जिरवीच्या राजकारणामुळे काही अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज ठेवून या निवडणुकीत आपलं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
सातारा जिल्ह्यात अकरा लाख ८ हजार २०३ पुरुष व दहा लाख ८५ हजार८४७ महिला आणि इतर ६० मतदार नोंदणी झालेली आहे. जिल्ह्यातील २,८७७ मतदान केंद्रावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस व खाजगी वाहनाने मतदान यंत्रणा व कर्मचाऱ्यांना जाण्या येण्यासाठी सोय केली आहे. तर दुसऱ्या बाजूला परगावातील मतदारांसाठी आर्थिक दृष्ट्या सक्षम उमेदवारांनी वाहनांचे नियोजन केले आहे.
खऱ्या अर्थाने राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्याबाबत शासकीय काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घातले आहे. प्रस्थापित उमेदवारांच्या प्रचारा निमित्त ग्रामीण भागात जेवणावळी सुरू आहे . अद्यापही एकाही ठिकाणी कारवाई झालेली नाही. निवडणुका म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचा उत्साह पूर्वी होता. आता सत्ताधाऱ्यांच्या समवेतच काही प्रशासकीय पक्षनिष्ठा व व्यक्तीनिष्ठांचा उद्रेक झालेला आहे. अनेक ठिकाणी विनापरवाना प्रचाराची वाहने हिंडत आहेत. सत्ताधाऱ्यांच्या सोबतच अनधिकृत व्यावसायिक प्रचारामध्ये उतरले आहेत . लेखी तक्रारीची गंभीर दखल घेतली नसल्याचा अनुभव आहे. याची सुद्धा उघडपणे चर्चा ग्रामीण भागात होताना दिसत आहे आहे.
सातारा जिल्ह्यात तालुका निहाय सातारा -३७१ कराड – ४८६ पाटण- ४०१ कोरेगाव२५३ – वाई- १८१ खंडाळा – ११४ महाबळेश्वर- १०९ जावळी- १५४ फलटण- २८२ माण – २१७ आणि खटाव– ३०९ अशी मतदान यंत्रणा आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना या यंत्रणेची तपासणी करूनच मतदानाला सुरुवात करावी लागणार आहे. तसेच काही ठिकाणी तक्रार असेल तर त्या तक्रारीचे तातडीने जागेवरच निरसन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. भरारी पथकही सोबत असले तरी त्यांना सुद्धा मर्यादा येत आहेत.
या निवडणुकीमध्ये अटीतटीची लढत असल्यामुळे ग्रामीण भागात आतापासूनच मतदान पत्रिका व त्यावरील राजकीय पक्षाचे चिन्ह खुलेआम छपाई करून आणलेले आहेत. या चिन्हाबाबत आता नियमावली करणे गरजेचे बनले आहे असे जेष्ठ नागरिकांनी सांगितले.
————————-
चौकट–
सर्वसामान्य जनतेपर्यंत निवडणूक यंत्रणेसंदर्भात शासकीय पातळीवरील माहिती पोहोचवण्याची जबाबदारी ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून असते. परंतु, काही ठिकाणी वेळेत माहिती न मिळाल्यामुळे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून काही प्रसारमाध्यमांना माहिती घ्यावी लागते. ही सुद्धा बाब उघड झाली आहे.
2) ओ.बी.सी. चळवळ जिवंत ठेवण्यासाठी मूळ ओ.बी.सींना मतदान करा- प्रमोद क्षीरसागर

सातारा दि: सातारा जिल्हा परिषद व अकरा पंचायत समितीमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे. सर्व समाजाचे हक्क अबाधित राखणाऱ्या उमेदवारांनाच निवडून दिले हे लोकशाहीतील कर्तव्य आहे. अशाच पद्धतीने मूळ ओबीसी असलेल्या उमेदवाराला चळवळ जिवंत ठेवण्यासाठी मतदान करणे जबाबदारी आहे ती निश्चित पार पाडावी असे नम्र आवाहन सातारा जिल्हा ओबीसी बहुजन आघाडीचे कार्य अध्यक्ष श्री प्रमोद क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
ओबीसींच्या आरक्षणाला व हक्काला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल अशी घोषणा करणाऱ्या भाजपने काही ठिकाणी मूळ ओबीसी ऐवजी बोगस कुणबी मराठा दाखला काढून निवडणूक लढवण्यास प्रवृत्त केले आहे. हे कमळाचे फुल आपल्या गोरगरिबांच्या झेंडू फुलावर अतिक्रमण करत आहे. याचे भान आता सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे. आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून कुणबी मराठा करण होत आहे. यापासून सावध राहिले पाहिजे.
ज्यांच्या जातीच्या दाखल्यावर पाच ते दहा वर्षांपूर्वी नोंदी झालेली आहेत असे कुणबी मराठा बांधव हे आमचे ओबीसी आहेत. त्यांना आमचा कदापी विरोध राहणार नाही. परंतु त्यांनीही ओबीसी चळवळीला तेवढ्याच तत्परतेने योगदान देणे याची आठवण आम्ही करून देत आहोत. त्यांना आमचा कधीही पाठिंबाच राहील. परंतु आर्थिक निकषावर आणि संधी साधूपणा म्हणून एका बाजूला कुणबी मराठा दाखला काढायचा दुसऱ्या बाजूला आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे हिंदू मराठा किंवा मराठा असे दाखल्यावर नोंदी आढळून येणे म्हणजे एक प्रकारे एक व्यक्ती आणि दोन जात.. एक फुल दो माली असा त्याचा ढोबळ अर्थ आहे. या प्रवृत्तीला आमचा विरोध राहील.
निवडणुका येतील व जातील.. परंतु, चळवळ जर संपली तर भावी पिढीला आपल्याला तोंड दाखवता येणार नाही. आज काही कुणबी मराठा उमेदवारासाठी तत्परतेने सर्वसाधारण सुवर्ण समाज व उमेदवार प्रचारात आघाडीवर आहे. त्यांनी ओ.बी.सी. समाजाच्या चळवळीला कधी सक्रिय सहभाग घेतला. याचा पुरावा द्यावा. स्वतःच्या फायद्यासाठी ओबीसी बनणे आणि ओबीसींवर अन्याय होईल त्यावेळेला अन्याय करणारा ची बाजू घेणे हा दुटप्पी पणा आहे. त्यामुळे ही निवडणूक माझी खऱ्या अर्थाने लोकशाहीची सत्वपरीक्षा आहे. आज सातारा जिल्ह्यातील सातारा व कोरेगाव, वाठार स्टेशन, कुडाळ, म्हसवे, केंजळ, शेंद्रे, कराड, फलटण, खटाव व वाई, महाबळेश्वर, खंडाळा, कोडोली , वर्णे, कुकुडवाड, माण तालुक्यात मोठ्या प्रमाणात ओ.बी.सी. समाजामध्ये जनजागृती झालेली आहे. ५७ जातीचे ओ.बी.सी. युवा पिढी मध्ये जागृती झालेली आहे परंतु काही लाचार व स्वाभिमान शून्य ओबीसी आपली जात विकण्यास काढत आहे त्यांनीही सावध राहावे असे आवाहन केले आहे.
यावेळी रामचंद्र बनवडे ,सिद्धार्थ खरात, दत्ताजीराव जाधव, अनिल लोहार, बबन झोरे, बाळासाहेब ढेबे, विठ्ठल चव्हाण, प्रकाश काशीद, नम्रता शेडगे, संदीप ससाणे, जयवंत बोराटे, ज्योतिराव फरांदे, कमल गोरे यांच्यासह ओबीसी घटकातील विशेषतः मूळचे कुणबी मराठा असलेले प्रकाश पाटील यांचाही सहभाग होता.
3) सातारा:-दिवंगत अजितदादांच्या वैचारिक वारसदारांच्या हस्ते साताऱ्यात अस्थि विसर्जन….

सातारा दि: संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुःखाची छाया पसरणारा प्रसंग म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघाती निधन होय. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली. सातारा जिल्हा व अजित दादा पवार यांचे नाते हे कौटुंबिक आणि भूमिपुत्र म्हणून कायमचे स्मरणात राहणार आहे. सातारा येथील संगम माहुली कृष्णा तीरी दिवंगत अजितदादांचे अस्थी विसर्जन करण्यात आल्या.त्यांच्या विचाराचे वारसदार असलेले जावळीचे सुपुत्र श्री अमितदादा कदम यांच्या हस्ते अस्थी विसर्जन झाले. यावेळी अनेकांचे डोळे पाणवले.
सातारा जिल्ह्यामध्ये १९९९ साली ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्याचवेळी सातारा जिल्ह्यातील जुन्या व नव्या पिढीतील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या हाती बांधले. एवढेच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्हा राष्ट्रवादीमय केला.

सहकार, समाजकारण राजकारण व शैक्षणिक तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी शिवाय पर्याय राहिला नव्हता. आणि ही किमया करण्यामध्ये दिवंगत अजितदादा पवार यांचा करिष्मा होता. त्यांच्यामुळेच सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि जिल्हा बँक तसेच सहकारी चळवळीतील संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवण्यात यश आले होते.
आज दुर्दैवाने त्याच नेत्याच्या अस्थी
विसर्जनाचे काम युवा नेते अमित दादा कदम यांना पार पाडावे लागले. जड अंतकरणाने हातात घेतलेल्या अस्थी कृष्णा कोयनेच्या संगमावर सोडताना श्री अमितदादा कदम यांचे हृदय गहिवरून आले होते. अनेक आठवणी मनामध्ये जतन केल्या असल्या तरी दिवंगत अजितदादा पवार यांच्या अस्थी पाण्याच्या प्रवाहात सोडताना दोन्ही हात थरथर होते.
मायेची ऊब देणाऱ्या नेत्यांची अस्थी पाण्याच्या प्रवाहात वाहत असताना अनेक आठवणी सुद्धा तरंगत असल्याचा भास निर्माण झाला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर- पाटील,बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, , सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, सीमा जाधव स्मिता देशमुख राजेंद्र लवगांरे, महिला पदाधिकारी तसेच युवा कार्यकर्ते यांच्यासह जावळी- महाबळेश्वर तालुक्यातील अनेक निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळेला अजित दादांनी केलेल्या सहकार्याबद्दल अनेक मान्यवरांनी आठवणींना उजाळा दिला.
4) जावळी:-जावळीत काहींना साडी- चोळी किंवा टॉवेल- टोपी द्या पण, स्थानिक उमेदवारांनाच मतदान करा…

करहर दि: छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळी खोऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या तीन गट व पंचायत समितीच्या सहा गणासाठी अंतिम टप्प्यात प्रचार आलेला आहे. आता मतदानाची घटिका जवळ आली आहे. अशा वेळेला स्थानिक व परिचित उमेदवारांना प्राधान्य द्या आणि हक्काने मतदान करा. वेळ पडल्यास माणुसकी म्हणून निवडणुकीपुरते आलेल्या पाहुणे उमेदवारांचा आदरतिथ्य ठेवा. त्यांना साडी- चोळी द्या किंवा पुरुष उमेदवाराला टावेल- टोपी द्या पण, आपल्या हक्काचे मतदान स्थानिक व परिचित उमेदवारांनाच करा असे आवाहन आता स्थानिक मतदारांतून होऊ लागलेले आहे. जे उमेदवार स्थानिक राहत आहेत. तेच आपले खरे लोकप्रतिनिधी असतात. याची आठवण करून दिली आहे.
निवडणुका म्हटलं की, पैशाचा बाजार असतो. या बाजारामध्ये खरे चालतात. म्हणून खोटे सिक्के चालवले जातात. त्याचा परिणाम पाच वर्ष भोगावा लागतो. याचा जावळी तालुक्याने निवडणुकीच्या काळात अनेकदा अनुभव घेतला आहे. फक्त मतदार यादीमध्ये नाव आहे आणि मूळचे गाव आहे. म्हणून, काहीजण उमेदवारी लादतात .त्यानंतर पराभूत झाल्यानंतर आपापल्या रहिवास असलेल्या ठिकाणी निघून जातात. काही वेळेला गावात घडलेल्या सुखदुःखाच्या प्रसंगी स्थानिक उमेदवारास सक्रिय सहभाग घेतात. अशा उमेदवारांची नाळ जोडले गेलेले असते. याउलट राजकीय पक्ष किंवा व्यक्तीनिष्ठे पायी काही उमेदवार वैचारिक भूमिका मांडत असतात परंतु त्यांना आपल्या घराच्या शेजाऱ्यातील भावकीतील लोक सुद्धा ओळखत नाहीत . मतदान झाल्यानंतर त्यांना शोधताना नाकी नऊ येणार आहे.
स्थानिक उमेदवारांचा जय हो किंवा पराजय हो.. ते गावातच राहतात. गावातच थांबतात .गावातीलच सुखदुःखात सक्रिय सहभाग घेतात. याची आता प्रत्येक खेड्यापाड्यात चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट झाल्याचे मानले तर वावगे ठरणार नाही.
जावळी तालुक्यामध्ये कुडाळ, कुसुंबी व म्हसवे असे तीन गट आहे. या तिन्ही गटांमध्ये पुरुष व महिला अशा पाच उमेदवार हे आपापल्या गावांमध्ये स्थायिक आहेत. त्यांना परिसराची चांगली जाण आहे. तसाच म्हसवे, खर्शी बारामुरे, कुडाळ, सायगाव, आंबेघर, कुसुंबी गणात सुद्धा असाच प्रकार आहे.
जावळी तालुक्यात गट व गणातील काही राजकीय पक्षाचे व अपक्ष उमेदवार हे चक्क नवी मुंबई, पुणे, मुंबई, पाचगणी, पुणे, सातारा शहर या ठिकाणी राहून आपापले संसार करतात. अधून मधून गावी येतात. त्यामुळे स्थानिक पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी त्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यापेक्षा आपल्या स्थानिक उमेदवार हा चोवीस तास उपलब्ध होऊ शकतो. असे ज्येष्ठ मतदारांना वाटत आहे. त्यासाठी त्यांनीही जनजागृती सुरू केली आहे. ही खरी अर्थाने परिवर्तनाची नांदी आहे.
काहींच्या गावात उमेदवारी दिली असली तरी गावातील ज्येष्ठ नागरिकांशी त्यांचा कोणताही परिचय नाही. संपर्क नाही. त्यापेक्षा नेहमी संपर्कात असणाऱ्या उमेदवारांना पसंती दिली जात आहे. हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. स्थानिक उमेदवारांना प्राधान्य मिळत असल्याने त्यांच्या विजयासाठी स्थानिक मतदार नक्कीच मतदान करतील असा काही उमेदवारांनी विश्वास व्यक्त केला.
5) सातारा:-खोटा ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केल्याप्रकरणी फिर्यादीवर कारवाई करण्याचे न्यायालयाचे निर्देश.
सातारा दि:-कोरेगाव पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली महाराष्ट्र बँकेच्या व्यवस्थापकाविशुद्ध दाखल केलेल्या फिर्यादीवरून सातारा येथील सत्र न्यायालयात खटला चालून आरोपी व्यवस्थापक शितल बर्गे यांची सत्र न्यायाधीशसो अमित शेटे यांनी को निर्दोष मुक्तता करत खोटी फिर्याद दिलेप्रकरणी फिर्यादी विशाल मिसळे यांचे विरुद्ध फौजदारी खटला दाखल कण्याचे निर्देश दिले. त्यामुळे या न्यायनिर्णयाची परिसरात चर्चा सुरू आहे.
फिर्यादी विशाल मिसळे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात त्याने महाराष्ट्र बँकेकडे प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळण्यासाठी त्याने व त्याचेसोबत इतरांनी अर्ज केला होता. दि. ६/३/२०१९ रोजी त्याने इतरांसोबत बँकेत जाऊन तत्कालीन व्यवस्थापक शीतल बर्गे यांच्याकडे कर्ज मंजुर करणेकरीता विनंती केली असता शीतल बर्गे यांनी “मागास वर्गीयांना भांडणाशिवाय काही जमतेच का ? तुमची कर्जे, घेण्याची लायकी आहे का? तुम्ही कुठे जायच तिथ जावा, मोर्चा काढा आंदोलने करा तुम्हाला कर्जे मिळणार नाही कर्जाचा कोठा पुर्ण झालेला आहे मी तसे माझ्या वरिष्ठांना कळविले आहे तुम्हाला काय करायचे ते करू शकता? तुमच्या ऐपती-प्रमाणे तुम्ही पैसे मागा, ऐपतीप्रमाणेच पैसे मिळतील” असे विधान करून आम्ही अनुसूचित जातीमधील असल्याने अपमानित केल्यामुळे दि. २३/३/२०१९ रोजी कोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
सदर प्रकरणी तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र दाखल होऊन सातारा येथील विशेष सत्र न्यायालयात खटला चालला. न्यायालयात फिर्यादी याने उलटतपासात कबुल केलेल्या घटनांमुळे खोटी कागदपत्रे तयार करून त्याआधारे कर्ज मंजुर करन्याचा प्रयत्न उघड झाला व कर्ज मंजूर न केल्यामुळे चिडुन फिर्याद दिल्याचे स्पष्ट झाले. तसेच अन्य साक्षीदार व तपास अधिकारी यांच्याही उलट तपासात काही बाबी उघड झाल्या. आरोपी शीतल वर्ग यांचे वतीने ॲड. राजेद्र गलांडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन मा. न्यायाधीश शेटे यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता करून खोटी फिर्याद दिले प्रकरणी मूळ फिर्यादी विशाल मिसळे यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.





