पुणे:-जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनौषधी व पर्यावरण संवर्धन कार्यक्रम उत्साहात संपन्न.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनौषधी व पर्यावरण संवर्धन कार्यक्रम उत्साहात संपन्न.

पुणे, दि. ५ जून २०२६ : राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ (NMPB), आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या प्रादेशिक समन्वय व सुविधा केंद्र – पश्चिम विभाग (RCFC-WR) तसेच वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त “वनौषधी व आरोग्य” या विषयावरील विशेष कार्यक्रम तसेच “सोसायटी ऑफ एथ्नोबॉटनिस्ट – महाराष्ट्र चॅप्टर” उद्घाटन समारंभ, प्रा. टी. एस. महाबळे सभागृह, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार श्री. सिद्धार्थ शिरोळे साहेब उपस्थित होते. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी साहेब, विद्यापीठाचे अधिकारी डॉ. रासवे साहेब, वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद सरदेसाई, डॉ. दिगंबर मोकाट तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी, वनौषधी तज्ज्ञ आणि पारंपरिक वैद्य (Traditional Healers) मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन दोन टप्प्यांत करण्यात आले. यामध्ये पर्यावरण संवर्धन व औषधी वनस्पती लागवड उपक्रम राबविण्यात आले. तसेच मान्यवरांचे मार्गदर्शन व मनोगत झाले.
डॉ. दिगंबर मोकाट, डॉ. भुगावकर ताई, डॉ. गिरीश टिल्लू साहेब, श्री. पाटील साहेब तसेच पारंपारिक वैद्य श्री. रामेश्वर माने साहेब या मान्यवरांनी औषधी वनस्पतींचे मानवी आरोग्यातील महत्त्व, आयुर्वेदातील वनौषधींचा वापर, जैवविविधतेचे संवर्धन, वन संरक्षण, पर्यावरण संतुलन आणि पारंपरिक ज्ञानाचे जतन याविषयी अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. उपस्थितांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेत पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभागाची भूमिका घेण्याचा संकल्प व्यक्त केला.
डॉ. दिगंबर मोकाट साहेबांनी पारंपारीक वैद्य श्री रामेश्वर माने यांना विशेष आमंत्रण देऊन बोलावले होते तथा त्यांचे पुस्तक मेडिकल प्लांट ट्रेड इन इंडिया याचे विमोचन त्यांच्या आणि सहकारी यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिगंबर मोकाट यांनी केले.
यावेळी मान्यवरांनी ग्रामीण भागात आरोग्यसेवा व वनौषधी परंपरेचे जतन करणाऱ्या पारंपरिक वैद्य (Traditional Community Health Practitioners – TCHP) यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. पारंपरिक ज्ञान, वनौषधी उपचारपद्धती आणि लोकआरोग्य संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या या वैद्यांनी समाजासाठी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या पारंपरिक वैद्यांनी अधिक संघटितपणे पुढे येऊन आपले ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचवावे, संशोधन व संवर्धन उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा आणि समाजाच्या आरोग्यसेवेत अधिक प्रभावी भूमिका बजवावी, असे आवाहन मान्यवरांनी केले. TCHP वैद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
अखिल भारतीय परंपरागत वनौषधी प्रशिक्षित वैद्य महासंघाच्या वतीने राष्ट्रीय संपर्क प्रमुख वैद्य श्री. रामेश्वर माने, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष वैद्य श्री. देवेंद्र साठे तसेच पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रशांत दुरुगकर उपस्थित होते.
वनौषधी संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात हा कार्यक्रम यशस्वी ठरला.
– पारंपरिक वैद्य देवेंद्र रामचंद्र साठे
अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य
अखिल भारतीय परंपरागत वनौषधी प्रशिक्षित वैद्य महासंघ




