पुसेसावळी:-(खटाव)-अधिक मास पारायण सोहळा २०२६ : पाचव्या दिवशी हरिनाम, प्रवचन व कीर्तनाने भक्तिमय वातावरण.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

अधिक मास पारायण सोहळा २०२६ : पाचव्या दिवशी हरिनाम, प्रवचन व कीर्तनाने भक्तिमय वातावरण.

पुसेसावळी येथील ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरात सुरू असलेल्या वर्ष २९ व्या अधिक मास पारायण सोहळ्याच्या पाचव्या दिवशी भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाच्या निमित्ताने भाविकांची मोठी उपस्थिती लाभली.
यावेळी ह.भ.प. निवृत्ती महाराज कांबळे यांचे ज्ञानेश्वरीवरील प्रवचन झाले. त्यांच्या ओजस्वी व विचारप्रवर्तक निरूपणातून अध्यात्म, भक्ती आणि संत साहित्याचे महत्त्व उलगडून सांगण्यात आले. त्यानंतर ह.भ.प. श्रीपाद महाराज जाधव (सातारा) यांच्या रसाळ कीर्तन सेवेने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. संतांच्या अभंग, ओव्या आणि हरिनामाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला.
निर्जला एकादशीचे औचित्य साधून भाविकांसाठी खिचडी प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच सकाळ, दुपार व रात्री फराळाचे आयोजन करण्यात आल्याने भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मंदिर परिसरात दिवसभर “जय जय राम कृष्ण हरी” आणि “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
“हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥”
या संतवचनाचा प्रत्यय देणारा हा सोहळा भाविकांसाठी अध्यात्मिक ऊर्जा व भक्तीचा अनमोल ठेवा ठरत असून आगामी दिवसांतील कार्यक्रमांबाबतही ग्रामस्थांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.




