वाई:-जिद्दीच्या जोरावर शेतकरी कन्या बनली PSI! व्याहळीच्या भाग्यश्री थोरवेंचा ऐतिहासिक मान.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-जिद्दीच्या जोरावर शेतकरी कन्या बनली PSI! व्याहळीच्या भाग्यश्री थोरवेंचा ऐतिहासिक मान.

वाई, दि. १२ : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील एका शेतकरी कन्येने यशाचे शिखर गाठत इतिहास रचला आहे. व्याहळी कॉलनी येथील भाग्यश्री विद्या विजय थोरवे यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथील एक वर्षाचे कठोर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाची शपथ घेतली. वाईच्या पश्चिम भागातील पहिल्या महिला पोलीस अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
नाशिक येथे झालेल्या दीक्षांत संचलन सोहळ्यात महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत भाग्यश्री थोरवे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांच्या या यशामुळे व्याहळी परिसरासह संपूर्ण वाई तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाग्यश्री यांचे वडील विजय थोरवे व आई विद्या थोरवे हे शेतकरी असून अत्यंत साध्या ग्रामीण कुटुंबातून त्या पुढे आल्या आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, व्याहळी कॉलनी येथे, माध्यमिक शिक्षण द्रविड हायस्कूल, वाई येथे तर बी.कॉम.चे शिक्षण किसनवीर महाविद्यालयातून पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एम.कॉम. पदवी विशेष प्राविण्यासह संपादन केली.
स्पर्धा परीक्षेतील सातत्यपूर्ण अभ्यासामुळे त्यांनी एमपीएससी २०२२ मधून पोलीस उपनिरीक्षक आणि एमपीएससी २०२३ मधून महसूल सहाय्यक पदासाठी निवड मिळवली. मात्र समाजसेवेची ओढ आणि खाकी वर्दीचे आकर्षण यामुळे त्यांनी पोलीस सेवेला प्राधान्य दिले. नाशिक येथे शारीरिक क्षमता, शस्त्र हाताळणी, कायदा-सुव्यवस्था आणि गुन्हे अन्वेषण यांसारख्या विविध विषयांचे कठोर प्रशिक्षण त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केले.
थोरवे कुटुंबात देशसेवेची परंपराही कायम आहे. त्यांचा धाकटा भाऊ भारतीय सैन्यात कार्यरत असून मोठा भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. कुटुंबातील पहिली वर्ग-२ अधिकारी बनल्याने पालकांसह संपूर्ण गावाचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.
भाग्यश्री थोरवे यांचे हे यश ग्रामीण भागातील असंख्य मुलींसाठी प्रेरणादायी ठरत आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी मेहनत, ध्येय आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर यश मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल ग्रामस्थ, शिक्षक, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“शेतकरी कुटुंबातील मुलगी म्हणून हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. आई-वडिलांचे कष्ट, त्याग आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच मी आज अधिकारी बनू शकले. पोलीस अधिकारी म्हणून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रामाणिकपणे काम करणे हेच माझे ध्येय आहे,” असे नवनियुक्त PSI भाग्यश्री थोरवे यांनी सांगितले.
वाईच्या पश्चिम भागासाठी अभिमानाचा क्षण; भाग्यश्री थोरवे ठरल्या नव्या पिढीच्या प्रेरणास्त्रोत!
2) वाई:-बावधनमध्ये भीषण दुर्घटना! भरधाव ट्रकने दुकानात घुसून घेतला वृद्धाचा बळी; एक जण गंभीर.

वाई दी.१२-पाचवड मार्गावरील बावधन ओढा परिसरात गुरुवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वेगातील ट्रक थेट रस्त्यालगतच्या किराणा दुकानात घुसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कंपनीचा एपी 29 टीसी 0972 क्रमांकाचा ट्रक वाईहून पाचवडकडे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर ट्रक विरुद्ध बाजूला जाऊन बावधन ओढा पुलालगत असलेल्या “किराणा अँड स्नॅक्स सेंटर” या दुकानात घुसला. या अपघातात बाळासाहेब लक्ष्मण पिसाळ (वय 72) यांचा मृत्यू झाला, तर बंडा मोहिते हे गंभीर जखमी झाले आहेत.
ट्रकच्या जोरदार धडकेमुळे दुकानाचे मोठे नुकसान झाले. तसेच दुकानासमोर उभी असलेली एमएच 11 सीएफ 0767 क्रमांकाची होंडा शाईन दुचाकीही चक्काचूर झाली. ही दुचाकी विश्वजीत अशोक शिंदे यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली आहे.
ट्रक चालक नितीन कांबळे (रा. व्याहळी) हा वाहन चालवत होता. अपघातानंतर चालकाने मद्यप्राशन केले होते का, याबाबत स्थानिकांमध्ये चर्चा सुरू असून पोलीस या अनुषंगाने तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पीएसआय अमित सुर्वे, वाहतूक शाखेचे रुपेश जाधव तसेच पोलीस कर्मचारी गोरखनाथ दाभाडे, विशाल येवले, राम कोळी, धीरजकुमार भोसले आणि राहुल भोईर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
अपघातानंतर जखमींना त्वरित उपचार मिळावेत यासाठी 112 आपत्कालीन सेवेशी संपर्क साधण्यात आला. मात्र शासकीय रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. अखेर पोलिसांनी स्वतःच्या वाहनातून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करून तत्परतेचे उदाहरण घालून दिले.
त्यानंतर वरद आयसीयू हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेद्वारे मृत व्यक्ती आणि जखमींना पुढील उपचार व शवविच्छेदनासाठी वाई येथे हलविण्यात आले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली असून अपघातग्रस्त भागात तातडीने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
गतिरोधक नसल्याने वाढतोय धोका
बावधन गावाच्या हद्दीतील वाई-पाचवड मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने येथे गतिरोधक उभारण्याची मागणी ग्रामपंचायतीकडून अनेक वेळा करण्यात आली होती. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. परिसरात शेती, वस्ती आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. भविष्यात जीवितहानी टाळण्यासाठी तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी युवा नेते विजयसिंह शशिकांत पिसाळ यांनी केली आहे.
3) वाई:-मालुसरेवाडी दुर्घटनेनंतर मंत्री मकरंद पाटील ॲक्शन मोडमध्ये; दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन.

वाई, दि. १२ : मालुसरेवाडी (ता. वाई) येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या अभिजित वाडकर यांच्या कुटुंबीयांची राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी वाडकर कुटुंबीयांना धीर देत या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ठाम आश्वासन दिले.
मंत्री पाटील यांनी शासन वाडकर कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच भविष्यात धरण परिसरातून कोणत्याही प्रकारचा अनधिकृत माती उपसा होऊ दिला जाणार नाही, यासाठी प्रशासनाला कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम भागातील रस्त्यांच्या सुरक्षेचाही मुद्दा चर्चेत आला. परिसरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन रस्त्यांचे रुंदीकरण करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि आवश्यक कार्यवाही लवकरच सुरू केली जाईल, असे आश्वासन मंत्री पाटील यांनी ग्रामस्थांना दिले.
यावेळी अपघातातील मृत अभिजित वाडकर यांच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून १ लाख रुपयांचा धनादेश मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी आनंद चिरगुटे, पंकज वाडकर, मालतपूरचे उपसरपंच निलेश वाडकर, रामचंद्र विरकर यांच्यासह ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, मंत्र्यांच्या भेटीनंतर गावकऱ्यांनी दुर्घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई करण्याबरोबरच रस्त्यांच्या समस्याही कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी केली आहे.
4) कोरेगाव:-शाळेची भिंत कोसळली; सुट्ट्यांमुळे टळला मोठा अनर्थ, जि.प.अध्यक्षा डॉ.प्रिया शिंदे यांची तातडीची पाहणी.

सातारा | कोरेगाव दि. १२ : चिलेवाडी (ता. कोरेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जुन्या इमारतीची भिंत वादळी वारे व मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने शाळेला उन्हाळी सुट्ट्या सुरू असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.
१९५४ साली उभारण्यात आलेली ही दगडी शाळा इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याने वादळी पावसाचा तडाखा सहन करू शकली नाही. कोसळलेल्या भिंतीमुळे इमारतीची सुरक्षितता धोक्यात आल्याचे प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले आहे.
घटनेनंतर डॉ. प्रिया शिंदे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून इमारतीच्या निर्लेखनाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत उर्वरित वर्गखोल्यांमध्ये शिक्षण न भरवण्याचे आदेशही त्यांनी दिले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांची तात्पुरती व्यवस्था गावातील हायस्कूलच्या इमारतीत करण्याबाबत शिक्षण विभाग व ग्रामपंचायतीला सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच चिलेवाडी येथे तळमजल्यावर अंगणवाडी आणि पहिल्या मजल्यावर प्राथमिक शाळा अशा स्वरूपाची आदर्श संयुक्त इमारत उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्मार्ट स्कूलच्या निकषांनुसार चार नवीन वर्गखोल्यांसह आधुनिक शाळा उभारण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
“विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच आमची पहिली प्राथमिकता आहे. जिल्ह्यातील वादळी पाऊस आणि वाऱ्यांमुळे नुकसान झालेल्या सर्व जिल्हा परिषद शाळांची पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर केली जातील. नुकसानग्रस्त शाळांसाठी आवश्यक निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल,” असे डॉ. प्रिया शिंदे यांनी सांगितले.
चिलेवाडी येथील पाहणीनंतर त्यांनी नागेवाडी येथील अंगणवाडी व प्राथमिक शाळेलाही भेट देऊन तेथील सुविधांचा आढावा घेतला. या दौऱ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नागेश ठोंबरे, जिल्हा परिषद सदस्य हणमंतराव जगदाळे, स्थानिक पदाधिकारी, अभियंते, अधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या घटनेनंतर प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून नवीन शाळा इमारतीच्या उभारणीची अपेक्षा व्यक्त केली आहे.




