आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-घाटांचा वारसा उद्ध्वस्त करून कसला विकास? वाईतील दगडी पार गायब; प्रशासनाला जाब.

पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-घाटांचा वारसा उद्ध्वस्त करून कसला विकास? वाईतील दगडी पार गायब; प्रशासनाला जाब.

पाथवे-ड्रेनेजच्या कामामुळे ऐतिहासिक रचनांचे नुकसान; रामडोह आळीतील पायऱ्यांचीही दुरवस्था.

वाई, दि. ०७ : शेकडो वर्षांचा इतिहास आपल्या दगडी रचनेत जपणाऱ्या वाईच्या कृष्णाकाठच्या ऐतिहासिक घाटांवर विकासकामांचा घाव बसत असल्याचे चित्र समोर आले आहे. पाथवे आणि ड्रेनेजच्या कामादरम्यान ऐतिहासिक दगडी रचनांचे नुकसान झाले असल्याच्या तक्रारी असून, विकासाच्या नावाखाली वाईचा ऐतिहासिक वारसा गमावण्याची वेळ तर येत नाही ना? असा सवाल आता वाईकरांकडून उपस्थित केला जात आहे.

ब्राह्मणशाही घाटावरील वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेले चार दगडी पार नागरिक, भाविक आणि पर्यटकांसाठी विसाव्याचे महत्त्वाचे ठिकाण होते. घाटाच्या पारंपरिक सौंदर्यातही या पारांचे विशेष योगदान होते. मात्र पाथवे व ड्रेनेजच्या कामादरम्यान या पारांचे नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली होती. संबंधित सामाजिक संस्थांनी नगरपालिका प्रशासन तसेच ठेकेदाराकडे पत्रव्यवहार करून नुकसानग्रस्त पार पूर्ववत करण्याची मागणी केली होती. त्यावेळी पार दुरुस्त करून देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

मात्र आज चारपैकी एक पार पूर्णपणे गायब असून उर्वरित तीन पार भग्नावस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिलेले आश्वासन नेमके कुठे गेले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याहून गंभीर बाब म्हणजे गायब झालेला पार कुठे गेला? तो हटविण्याची परवानगी कोणी दिली? आणि त्याची जबाबदारी कोणाची? याचा स्पष्ट खुलासा प्रशासनाने करणे गरजेचे आहे.

रामडोह आळीतील ऐतिहासिक पायऱ्यांचीही वाताहत

रामडोह आळीतील ऐतिहासिक दगडी पायऱ्यांची अवस्थाही चिंताजनक आहे. एकेकाळी नागरिकांच्या वर्दळीने गजबजलेला हा परिसर आज तुटलेल्या पायऱ्या, विस्कटलेले दगड आणि दगडांच्या खचामुळे विद्रूप झाला आहे.

कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दीपप्रज्वलन असो किंवा गणपती विसर्जनाचा पारंपरिक मार्ग—या घाटाला वाईच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात वेगळे स्थान आहे. मात्र आज ज्यांनी हा इतिहास जपायला हवा, त्यांच्यासमोरच त्याची पडझड पाहण्याची वेळ आली आहे, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

दगडी घाटांवर सिमेंटचा मुलामा कशासाठी?

वाईच्या घाटांची ओळखच त्यांच्या पारंपरिक दगडी बांधकामामुळे आहे. त्यामुळे हा वारसा जतन करण्याऐवजी सिमेंट, फरशी आणि आधुनिक पाथवेच्या माध्यमातून घाटांचे मूळ स्वरूप बदलले जात असेल, तर त्याला सुशोभीकरण म्हणायचे की ऐतिहासिक वारशाची मोडतोड, असा थेट सवाल उपस्थित होत आहे.

काम सुरू करण्यापूर्वी ऐतिहासिक रचनांचे सर्वेक्षण करण्यात आले होते का? दगडी पार हटविण्याची परवानगी घेण्यात आली होती का? नुकसान झाल्यानंतर ते पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले असेल, तर त्याची अंमलबजावणी का झाली नाही? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गायब झालेल्या पाराचा हिशेब कोण देणार?

हे प्रश्न आता केवळ नागरिकांच्या नाराजीपुरते मर्यादित राहिलेले नसून संबंधित प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत.

पुरातत्त्व विभागाची भूमिका काय?

वाईच्या ऐतिहासिक घाटांवरील कामांपूर्वी संबंधित पुरातत्त्व विभागाने पाहणी केली होती का, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. ऐतिहासिक दगडी रचनांमध्ये बदल करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का? नगरपालिका प्रशासनाने कामाचे नियोजन करताना वारसा संवर्धनाच्या निकषांचा विचार केला होता का?

या सर्व बाबींची स्पष्टता प्रशासनाने जनतेसमोर आणावी. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर त्याची माहिती सार्वजनिक करावी आणि नियमांचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वाईचा विकास हवा; पण इतिहासाच्या किंमतीवर नाही!

विकासकामांना विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली वाईची ऐतिहासिक ओळखच पुसली जाऊ नये, एवढीच नागरिकांची अपेक्षा आहे. आज एक दगडी पार गायब झाला, उद्या पायऱ्या नाहीशा झाल्या आणि परवा घाटाचे मूळ स्वरूपच बदलले, तर पुढच्या पिढीला वाईचा हा समृद्ध वारसा दाखवणार कोण?

वाईतील ऐतिहासिक घाटांचे तातडीने तज्ज्ञांकडून सर्वेक्षण करावे, नुकसानग्रस्त पार व पायऱ्या मूळ दगडी धाटणीतच पुनर्स्थापित कराव्यात, संबंधित विकासकामांची चौकशी करावी आणि भविष्यात ऐतिहासिक वास्तूंना कोणताही धक्का लागणार नाही, यासाठी कठोर वारसा-संवर्धन नियमावली लागू करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

इतिहास जपणे ही जबाबदारी आहे; तो गमावून केलेला विकास वाईच्या भविष्यासाठी किती मोलाचा ठरेल, याचा विचार आता प्रशासनानेच करावा.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button