वाई:-सिद्धनाथवाडीत विद्युत डीपीने घेतला पेट! महावितरणच्या धावपळीमुळे मोठा अनर्थ टळला.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-सिद्धनाथवाडीत विद्युत डीपीने घेतला पेट! महावितरणच्या धावपळीमुळे मोठा अनर्थ टळला.

नगरपालिका शाळा क्रमांक १० शेजारील घटनेने परिसरात खळबळ; अर्ध्या तासात घरगुती वीजपुरवठा पूर्ववत.
सातारा | वाई, दि. २१ : सिद्धनाथवाडी येथील नगरपालिका शाळा क्रमांक १० शेजारी असलेल्या विद्युत वितरण रोहित्राला (डीपी) काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, स्थानिक ग्रामस्थांची सतर्कता आणि महावितरण कर्मचाऱ्यांची तातडीची धाव यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
डीपीमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागताच ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न करता महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर आवश्यक उपाययोजना करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.
या घटनेमुळे सिद्धनाथवाडी परिसरातील वीजपुरवठा काही काळ ठप्प झाला होता. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत अवघ्या अर्ध्या तासात घरगुती वीजपुरवठा सुरळीत केला. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
दरम्यान, घरगुती वीजपुरवठा पूर्ववत झाला असला, तरी रस्त्यावरील पथदिवे अद्याप बंद असल्याने रात्रीच्या वेळी परिसरातील रस्त्यांवर अंधार पसरला होता. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, पथदिव्यांचा वीजपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
वेळीच मिळालेली माहिती आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेली तत्परता यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. संकटाच्या क्षणी धावून आलेल्या कर्मचाऱ्यांच्या कार्यतत्परतेचे सिद्धनाथवाडीतील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
2) भुईंज:-सामाईक भिंतीच्या वादाने पेटला संघर्ष! शिरगावात महिलेसह मुलाला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल.

सातारा | वाई दि. २१ : घराच्या सामाईक भिंतीवरून सुरू असलेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाल्याची घटना वाई तालुक्यातील शिरगाव येथील शिवाजीनगर परिसरात घडली. यामध्ये एका ६० वर्षीय महिलेसह तिच्या मुलाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी चार जणांविरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत शर्मिला बजरंग चव्हाण (वय ६०, रा. शिवाजीनगर, शिरगाव) यांनी भुईंज पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, घराला लागून असलेल्या जुन्या घराच्या सामाईक भिंतीवरून यापूर्वीही संबंधितांमध्ये वाद झाला होता. ३ नोव्हेंबर रोजी याच कारणावरून शिवीगाळ व वादावादी झाल्याची तक्रारही त्यांनी केली होती.
दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी शर्मिला चव्हाण आणि त्यांचा मुलगा सागर हे घरात असताना चार जण घराच्या बाहेरील खोलीत आले. सामाईक भिंतीच्या कारणावरून वाद घालत त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यावेळी त्यातील एका व्यक्तीने बाहेरून काठी आणून शर्मिला चव्हाण यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर प्रहार केला. आईला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या मुलालाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
मारहाणीचा आवाज ऐकून शेजारी राहणारे नातेवाईक घटनास्थळी धावून आले. त्यांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. त्यानंतर जखमी मायलेक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. पुढील उपचार व तपासणीसाठी सातारा येथे जाण्याचा सल्ला देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेप्रकरणी भुईंज पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस हवालदार भाऊ धिगुडे अधिक तपास करीत आहेत.
3) मेढा:-चहाच्या टपरीवरील वाद पेटला! हातगेघरमध्ये चौघांकडून तरुणाला मारहाण.

दगड आणि लाकडी दांडक्याने हल्ला केल्याचा आरोप; सोन्याची चैनही हरवली, मेढा पोलिसांत गुन्हा दाखल.
सातारा |
मेढा, दि. २१ : चहा पिण्यासाठी गेलेल्या तरुणाचा झालेला शाब्दिक वाद पुढे थेट मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना जावळी तालुक्यातील हातगेघर येथे १८ नोव्हेंबर रोजी घडली. या घटनेत तरुणाला दगड आणि लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोप असून, शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रारही करण्यात आली आहे. याप्रकरणी मेढा पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, सुजित दत्तात्रय गोळे (वय २७, रा. हातगेघर, ता. जावळी) हे १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मित्रांसमवेत चहा पिण्यासाठी करहर येथील लक्ष्मी हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या काही तरुणांसोबत त्यांचा शाब्दिक वाद झाला. या वादातून संबंधितांनी गावात आल्यावर बघून घेण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास हातगेघर येथील आण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याजवळील चौकात चौघांनी सुजित गोळे यांना अडविल्याचा आरोप आहे. यावेळी एकाने धक्काबुक्की करून दगड फेकून मारला, तर दुसऱ्याने लाकडी दांडक्याने मारहाण केली. अन्य दोघांनीही हाताने मारहाण करत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या मारहाणीच्या झटापटीत तक्रारदाराच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटून हरवल्याचेही सांगण्यात आले आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करत वाद थांबविला. त्यानंतर जखमी सुजित गोळे यांनी मेढा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतले. उपचारानंतर त्यांनी मेढा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून आदिनाथ प्रशांत गोळे, गणेश नारायण पाट, आदेश प्रकाश गोळे आणि वैष्णव नारायण गोळे या चौघांविरोधात मेढा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पोलिस हवालदार मनोज चंद्रकांत जाईगुडे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला असून, पुढील तपास मेढा पोलिस करीत आहेत.
4) वाई:-सुरूरच्या वळणावर काळाचा घाला! भीषण अपघातात माय-लेकरांच्या कुटुंबातील दोघांचा मृत्यू.

अल्टो कार तीन वेळा पलटी; वर्षश्राद्ध आटोपून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा प्रहार, तिघे गंभीर जखमी.

सातारा | वाई दि. २१ : आईचे वर्षश्राद्ध आटोपून मुंबईहून चिपळूणकडे परतणाऱ्या कुटुंबाच्या प्रवासावर सुरूरजवळ काळाने घाला घातला. सातारा-पुणे महामार्गावरील सुरूर येथील भारत पेट्रोल पंपाजवळ, आई हॉटेलसमोर शनिवारी सकाळी आठच्या सुमारास अल्टो कारचा भीषण अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्याने भरधाव कारवरील नियंत्रण सुटले आणि कार सर्व्हिस रोडवरील दुभाजकाला धडकून तब्बल तीन वेळा पलटी झाली. या भीषण दुर्घटनेत वैष्णवी वैभव कदम (वय ४३) आणि विजय धोंडू पवार (वय ७०, दोघेही रा. चिपळूण) यांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिपळूण येथील कदम-पवार कुटुंबीय मुंबईत आईचे वर्षश्राद्ध उरकून अल्टो कारने आपल्या गावी परतत होते. वैभव वामन कदम (वय ४५) हे कार चालवत होते. सुरूर येथील भारत पेट्रोल पंपाजवळ आले असता चालकाला डुलकी लागली. क्षणभराच्या या निष्काळजीपणामुळे कारवरील ताबा सुटला. कारने सर्व्हिस रोडवरील दुभाजकाला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर ती रस्त्यावर तीन वेळा उलटली. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघाताचा मोठा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. उलटलेल्या कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मात्र, या दुर्घटनेत वैष्णवी कदम आणि विजय पवार यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबातील दोन सदस्यांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने घटनास्थळी शोकाकुल वातावरण निर्माण झाले.
या अपघातात चालक वैभव वामन कदम (४५), वैशाली विजय पवार (६२) आणि वेदांत वैभव कदम (१३) हे तिघे जखमी झाले. त्यांना तातडीने सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जोशीविहीर महामार्ग पोलीस अधिकारी आशीष कवठेकर यांनी किशोर नलवडे, मिथुन मोरे, हेमंत ननवरे, संतोष कचरे आणि अक्षय शिंदे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मदतकार्यात सहभागी होत अपघातामुळे विस्कळीत झालेली महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
आईचे वर्षश्राद्ध आटोपून आनंदाने घराकडे परतणाऱ्या कुटुंबावर नियतीने वाटेतच घाला घातला. सुखरूप घरी पोहोचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या कुटुंबातील दोघांचा प्रवास कायमचा संपला. या दुर्दैवी घटनेमुळे चिपळूण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे करीत आहेत.
5) मेढा:-मोळेश्वरमध्ये वीज रोहित्र फोडून तांब्याच्या कॉईलची चोरी; महावितरणला ५० हजारांचा फटका!

जय मल्हार हॉटेलजवळील ६३ केव्हीए ट्रान्सफॉर्मर चोरट्यांनी पाडला; १२५ किलो तांब्याच्या तारांवर डल्ला, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल.
सातारा | मेढा दि. २१ : जावळी तालुक्यातील मोळेश्वर गावच्या हद्दीत चोरट्यांनी महावितरणच्या विद्युत रोहित्राला लक्ष्य करत त्यातील तांब्याच्या कॉईलची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी ६३ केव्हीए क्षमतेचे रोहित्र खाली पाडून त्यातील ऑईल सांडवले आणि सुमारे १२५ किलो तांब्याच्या तारा चोरून नेल्या. या प्रकारात महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून १९ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.१५ वाजेपर्यंतच्या कालावधीत मोळेश्वर गावच्या हद्दीतील जय मल्हार हॉटेलजवळ ही चोरी झाली. चोरट्यांनी विद्युत रोहित्र खाली पाडून त्यातील ऑईल जमिनीवर सांडवले. त्यानंतर रोहित्रातील तांब्याच्या तारा काढून त्या चोरून नेल्या.
१९ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास बाह्यस्रोत कर्मचारी संजय पाटणे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तत्काळ महावितरणच्या मेढा शाखेचे सहाय्यक अभियंता अजित कांबळे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यानंतर कांबळे यांनी सहकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता रोहित्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आणि आतील तांब्याच्या तारा चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले.
चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये अंदाजे १२५ किलो तांब्याच्या तारांचा समावेश असून, तक्रारीनुसार त्यांची किंमत सुमारे ७० हजार रुपये आहे. मात्र, दाखल एफआयआरमधील मालमत्तेच्या तपशिलात ५० हजार रुपयांचे नुकसान नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी २० नोव्हेंबर २०२६ रोजी मेढा पोलीस ठाण्यात सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम, भारतीय विद्युत अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार प्रदीप उधगे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला असून, विद्युत रोहित्राची मोडतोड करून तांब्याच्या तारांवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.




