वाई:-वेळे गावाने लोकसहभागातून घडवला जलसंधारणाचा आदर्श; ‘वनराई बंधाऱ्या’तून पाणीटंचाईवर मात करण्याचा निर्धार.
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-वेळे गावाने लोकसहभागातून घडवला जलसंधारणाचा आदर्श; ‘वनराई बंधाऱ्या’तून पाणीटंचाईवर मात करण्याचा निर्धार.

वाई दि. ०६ : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला कृतीची जोड देत वेळे (ता. वाई) ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व सेवा संकल्प अभियानांतर्गत ग्रामस्थ, महिला आणि प्रशासनाच्या एकजुटीतून वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. लोकसहभागातून साकारलेल्या या उपक्रमामुळे गावाच्या जलसंधारणाच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळाली आहे.
वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली वेळे ग्रामपंचायतीने हा उपक्रम राबविला. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा जास्तीत जास्त उपयोग करणे, पाणी जमिनीत मुरवून भूजलपातळी वाढविणे तसेच आगामी उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रभावीपणे मात करणे, हा या वनराई बंधाऱ्यामागील प्रमुख उद्देश आहे.
या श्रमदान मोहिमेत सरपंच अर्चना गायकवाड, उपसरपंच सिंधु ढमाळ, ग्रामपंचायत अधिकारी श्रुतिका जाधव, पालक अधिकारी रुपाली कुदळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल ननावरे, दशरथ पवार यांच्यासह ग्रामसंघाच्या अध्यक्षा, सीआरपी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि महिला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
विशेष म्हणजे, महिलांनी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी श्रमदानात मोठ्या संख्येने सहभागी होत ‘जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे’, असा संदेश दिला. त्यामुळे हा उपक्रम केवळ बंधारा उभारण्यापुरता मर्यादित न राहता गावाच्या एकजुटीचे आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला.
शासकीय अभियानाला ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाची जोड मिळाल्याने वेळे गावात जलसंधारणाच्या कामांना वेग आला आहे. एकजुटीच्या श्रमातून उभा राहिलेला हा वनराई बंधारा भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजनेचा आधार ठरण्यासोबतच ‘लोकसहभागातून गावविकास’ या संकल्पनेचा प्रेरणादायी वस्तुपाठ ठरला आहे. या उपक्रमाचे परिसरातून विशेष कौतुक होत आहे.




