वाई:-ओझर्डेच्या चिमुकल्या कवींची भरारी; ‘माझी पहिली कविता’ बालकवितासंग्रहाचे दिमाखात प्रकाशन!
पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-ओझर्डेच्या चिमुकल्या कवींची भरारी; ‘माझी पहिली कविता’ बालकवितासंग्रहाचे दिमाखात प्रकाशन!

सहावीच्या विद्यार्थ्यांनी शब्दांतून फुलविले कल्पनांचे विश्व; बालप्रतिभेच्या साहित्यिक आविष्काराचे मान्यवरांकडून भरभरून कौतुक.
सातारा | वाई, दि. २० :प्रतिभेला वयाची मर्यादा नसते, हे ओझर्डेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीतून सिद्ध करून दाखविले आहे. पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ओझर्डे येथील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वलिखित कवितांमधून साकारलेल्या ‘माझी पहिली कविता’ या बालकवितासंग्रहाचे प्रकाशन बुधवारी (दि. १८ नोव्हेंबर) उत्साहपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. चिमुकल्या हातांनी लिहिलेल्या या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली असून, विद्यार्थ्यांच्या साहित्यिक वाटचालीला या उपक्रमामुळे नवी दिशा मिळाली आहे.
विद्यार्थ्यांमधील कल्पकता, सर्जनशीलता आणि अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने शाळेतील शिक्षिका सौ. सविता सचिन क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांकडून कविता लेखनाचा अभिनव उपक्रम राबविला. त्यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील भावना, अनुभव आणि कल्पना कवितांच्या माध्यमातून कागदावर उतरविल्या. याच प्रयत्नांचे फलित म्हणजे ‘माझी पहिली कविता’ हा सुंदर बालकवितासंग्रह होय. या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आकर्षक मांडणी श्री. सचिन क्षीरसागर यांनी केली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाई पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे होते. शिक्षण विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर आणि कवठे केंद्राचे केंद्रप्रमुख वीरधवल भिलारेपाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक सुनील शेडगे यांनी या संग्रहाला प्रस्तावना लिहून बालकवींच्या साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन दिले आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण सोहळ्यात विद्यार्थ्यांनीच आपल्या कलागुणांची चुणूक दाखविली. सूत्रसंचालनापासून मान्यवरांचे स्वागत आणि सत्कारापर्यंत प्रत्येक बाब कवितांच्या आणि चारोळ्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या सादरीकरणाने कार्यक्रमाला वेगळीच साहित्यिक उंची प्राप्त झाली. पुस्तक प्रकाशनानंतर झालेल्या कविसंमेलनात निमंत्रित कवी-कवयित्रींनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांना साहित्याच्या आनंदात रमविले.
गटशिक्षणाधिकारी हर्षवर्धन मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या लेखनाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ यमक जुळविण्याचा प्रयत्न केलेला नाही, तर त्यांच्या कवितांमधून आशयपूर्ण विचार आणि समाजाला योग्य संदेश देण्याची क्षमता दिसून येते. कविता लिहिण्यासाठी वयाची अट नसते. एवढ्या लहान वयात विद्यार्थ्यांनी केलेली साहित्यनिर्मिती कौतुकास्पद असून, याच विद्यार्थ्यांमधून भविष्यात उत्तम साहित्यिक घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिक्षण विस्तार अधिकारी साईनाथ वाळेकर यांनी या कवितासंग्रहाचे कौतुक करत त्याचा उल्लेख ‘बालभारतीचे पुस्तक’ असा केला. विद्यार्थ्यांनी लेखनाची आवड अशीच जोपासली, तर भविष्यात ओझर्डे गावाची ओळख ‘कवितांचे गाव’ म्हणून निर्माण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. केंद्रप्रमुख वीरधवल भिलारेपाटील यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षिकेचे अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशस्वी साहित्यप्रवासात पालकांनीही आनंदाने सहभाग नोंदविला. योगेश पिसाळ, सुवर्णा भोसले, श्रावणी फरांदे आणि रुबीना मुलाणी यांनी मनोगत व्यक्त करत मुलांच्या कविता पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित होणे ही संपूर्ण कुटुंबासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब असल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश पिसाळ, उपाध्यक्ष कोमल जाधव, सदस्य रविराज पिसाळ, मुख्याध्यापिका रेखा जमदाडे, जयश्री कांबळे, शशिकला भंडारे, सुनील गायकवाड, शोभा पवार, मंगल फरांदे, शिवांजली जमदाडे, अनुष्का पिसाळ, सुषमा पिसाळ, सुप्रिया जाधव, नितीन पिसाळ, उषा बेलोशे, सचिन क्षीरसागर यांच्यासह पालक, ग्रामस्थ, शिक्षक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेतील एका कल्पक उपक्रमातून बालसाहित्याची नवी वाट निर्माण झाली आहे. ‘माझी पहिली कविता’ हा केवळ कवितांचा संग्रह नसून, बालमनातील निरागस भावना, कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलतेचा सुंदर आविष्कार आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते किती उत्तुंग भरारी घेऊ शकतात, याचे ओझर्डे शाळेने घालून दिलेले हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
2) वाई:-तायक्वांदोच्या मैदानात विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; ब्लॅक ड्रॅगन अकॅडमीच्या शिबिराचा उत्साहात समारोप!

मंजुषा गायकवाड हिने पटकावला प्रथम क्रमांक; आयुष सपकाळ, अनवित जगताप यांचाही विशेष गौरव.
सातारा |
वाई, दि. २० :*खेळाच्या माध्यमातून शारीरिक क्षमता वाढविण्यासोबतच शिस्त, आत्मविश्वास, जिद्द आणि नेतृत्वगुणांची रुजवण करणाऱ्या ब्लॅक ड्रॅगन तायक्वांदो मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या हिवाळी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व विकास शिबिर २०२६-२७ चा समारोप उत्साहात पार पडला. शिबिरात विविध क्षेत्रांत कौशल्य आणि गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
शिबिरातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांच्या निवडीत मंजुषा गायकवाड हिने आपल्या गुणवत्तेची छाप उमटवत प्रथम क्रमांक पटकावला. आयुष सपकाळ याने द्वितीय, तर अनवित जगताप याने तृतीय क्रमांक मिळवून यश संपादन केले.
विशेष पुरस्कारांमध्ये आयुष सपकाळ याला ‘सर्वोत्कृष्ट शिस्तबद्ध विद्यार्थी’, मंजुषा गायकवाड हिला ‘सर्वाधिक मेहनती विद्यार्थिनी’, तर प्राची बेलोशे हिला ‘उत्कृष्ट प्रगती करणारी विद्यार्थिनी’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिबिरात सहभागी झालेल्या अन्य विद्यार्थ्यांनाही पदके आणि प्रेरणादायी प्रमाणपत्रे देऊन त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.
मेजर डॉ. समीर पवार, नगरसेवक संग्राम सपकाळ, सचिन सावंत, दिपाली सावंत, पत्रकार प्रशांत थोरवे आणि दिनकर दळवी यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक करताना क्रीडा क्षेत्रातील संधींची माहिती दिली. यशस्वी होण्यासाठी शिस्त, सातत्यपूर्ण सराव आणि कठोर परिश्रम या गुणांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख प्रशिक्षक व मार्गदर्शक विशाल कुमठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक प्रेमजीत चव्हाण, विष्णू खोत, ब्लॅक बेल्ट सीनियर इन्स्ट्रक्टर मंजुषा गायकवाड, राष्ट्रीय खेळाडू रिद्धी क्षीरसागर, राज्यस्तरीय खेळाडू प्राची बेलोशे, रोहन देशपांडे, ओमकार घाडगे आणि विराज भानसे यांनी शिबिराच्या यशस्वितेसाठी विशेष मेहनत घेतली.
दरम्यान, नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या पुढाकारातून नगरपालिका शाळा क्रमांक एक येथे तायक्वांदो प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली असून, ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी नवे व्यासपीठ मिळत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विठ्ठल माने यांनी मानले.




