आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-‘उत्तरायण’ हा आयुष्यातील परमोच्च काळ; ज्येष्ठांनी तन-मन-धन जपून आनंदी जीवन जगावे : अशोकराव थोरात.

पत्रकार सारिका गवते सातारा जिल्हा महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) कराड:-‘उत्तरायण’ हा आयुष्यातील परमोच्च काळ; ज्येष्ठांनी तन-मन-धन जपून आनंदी जीवन जगावे : अशोकराव थोरात.

शास्त्रीनगरमध्ये ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात; ज्येष्ठांचा सन्मान, अल्पोपहार व भेटवस्तूंचे वाटप.

कराड | प्रतिनिधी
मलकापूर, दि. ३ : ज्येष्ठत्व म्हणजे आयुष्याचा शेवटचा टप्पा नव्हे, तर अनुभव, परिपक्वता आणि समाधानाने जीवनाकडे पाहण्याचा ‘उत्तरायण’ काळ आहे. या काळात ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्यासोबतच मनःशांती, आर्थिक नियोजन आणि कौटुंबिक नातेसंबंधांची जपणूक करून आनंदी व समाधानी जीवन जगावे, असे प्रतिपादन अशोकराव थोरात यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शास्त्रीनगर, मलकापूर येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., जखिनवाडी शाखा–शास्त्रीनगर आणि आधार ज्येष्ठ नागरिक संघ, शास्त्रीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोकराव थोरात बोलत होते.
मार्गदर्शन करताना थोरात म्हणाले, “आयुष्याचे उत्तरायण हा जीवनातील परमोच्च काळ आहे. चार आश्रमांपैकी वृद्धत्वाचा काळ हा अनुभव आणि परिपक्वतेचा काळ मानला जातो. त्यामुळे ज्येष्ठांनी या टप्प्यात तन, मन आणि धन यांची योग्य काळजी घेऊन उर्वरित आयुष्य आनंदाने व आत्मविश्वासाने जगावे.” आरोग्याची काळजी, योग्य आर्थिक नियोजन, आप्तस्वकीयांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि सकारात्मक विचारसरणी यामुळे ज्येष्ठांचे जीवन अधिक समृद्ध होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये माजी उपप्राचार्य अवसरे सर, संचालिका वाघ मॅडम, जामदार मॅडम, गरुड सर, पवार सर आणि दरेकर सर यांचा समावेश होता. सत्कारानंतर सन्मानित ज्येष्ठांनी आपले मनोगत व्यक्त करताना आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमाला शास्त्रीनगर परिसरातील ज्येष्ठ महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठांच्या अनुभवांचा आणि त्यांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करणाऱ्या या उपक्रमामुळे सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था, जखिनवाडी शाखा–शास्त्रीनगरच्या शाखाप्रमुख शर्मिला श्रीखंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपावेळी पतसंस्थेच्या वतीने उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना अल्पोपहार व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.
ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद, समाधान आणि आपुलकीचा भाव या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. ज्येष्ठांच्या अनुभवाला सलाम आणि त्यांच्या योगदानाला सन्मान देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनात कायमची आठवण निर्माण करून गेला.

2) पाटण तालुक्यात पुरवठा विभागाचा विशेष कॅम्प; हजारो नागरिकांची कामे जागेवरच मार्गी.

तारळे, मल्हारपेठ, ढेबेवाडीत शिधापत्रिका दुरुस्तीपासून ई-केवायसीपर्यंत विविध सुविधा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

पाटण | दि. ०३ : ग्रामीण भागातील नागरिकांना पुरवठा विभागाच्या सेवा सहज आणि त्यांच्या गावाजवळ उपलब्ध करून देण्यासाठी पाटण तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागामार्फत तारळे, मल्हारपेठ आणि ढेबेवाडी येथे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, हजारो नागरिकांनी विविध शासकीय सेवांचा थेट लाभ घेतला.
पुरवठा मंत्रालय, भारत सरकार यांच्या सूचनांनुसार तसेच महाराष्ट्राचे पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पमध्ये नागरिकांच्या विविध प्रलंबित कामांवर जागेवरच कार्यवाही करण्यात आली. दुबार शिधापत्रिका दुरुस्ती, शिधापत्रिकेत नवीन सदस्यांची नावे समाविष्ट करणे, नावे कमी करणे तसेच ई-केवायसी यांसह विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.
तहसील कार्यालयात एखाद्या कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी गावपातळीवरच सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांची वेळ आणि श्रम दोन्ही वाचले. अनेक नागरिकांनी कॅम्पमध्ये उपस्थित राहून प्रलंबित कामे पूर्ण करून घेतली. पुरवठा विभागाच्या सेवा थेट गावाच्या परिसरात उपलब्ध झाल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले.
ढेबेवाडी विभागातील कॅम्पदरम्यान सीताई स्वयंसहायता समूह, तळमावलेच्या अध्यक्षा कविता कचरे यांनी उपस्थित नागरिकांचे श्रीफळ देऊन स्वागत केले. कॅम्पच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसहायता समूहाच्या पदाधिकारी तसेच सर्व संबंधितांचे त्यांनी आभार मानले.
ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय पुरवठा सेवांचा लाभ सुलभ, जलद आणि गावाजवळच मिळावा, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या विशेष कॅम्पमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत असल्याचे चित्र या कॅम्पमधून दिसून आले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button