पुणे:-(वारजे)-वयाची साठी-सत्तरी मागे सारत ज्येष्ठांचा जल्लोष! गप्पा, गाणी, फुगड्या अन् विटी-दांडूने रंगला ‘आपुलकी ग्रुप’चा आनंदसोहळा.
पत्रकार विजय देवकुळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुणे:-(वारजे)-वयाची साठी-सत्तरी मागे सारत ज्येष्ठांचा जल्लोष! गप्पा, गाणी, फुगड्या अन् विटी-दांडूने रंगला ‘आपुलकी ग्रुप’चा आनंदसोहळा; भूगावच्या ‘निसर्गछाया’त ३८ सदस्यांनी लुटला निवांतपणाचा क्षण.

पुणे / वारजे : धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत आनंदाचे क्षण शोधण्यासाठी फार दूर जाण्याची गरज नसते; आपली माणसं, जुन्या आठवणी आणि मनमुराद हसण्याची संधी मिळाली की आयुष्य पुन्हा एकदा तरुण होतं.याचाच सुंदर प्रत्यय सिंहगड रोड परिसरातील ‘आपुलकी ग्रुप’ च्या ज्येष्ठ सदस्यांनी भूगाव येथील ‘निसर्गछाया’ येथे आयोजित केलेल्या अनोख्या एकदिवसीय सहलीतून दिला. वयाची साठी-सत्तरी पार केलेल्या सदस्यांनी गाणी, नृत्य, फुगड्या, संगीत खुर्ची, विटी-दांडू, कॅरम, टेबल टेनिस आणि विविध मनोरंजक खेळांमध्ये सहभागी होत अक्षरशः बालपण पुन्हा जगले.

दर रविवारी नियमित भेटणाऱ्या ‘आपुलकी ग्रुप’च्या बैठकीत दरमहा येणारे वाढदिवस सर्वांनी एकत्रितपणे, आपल्या जोडीदारांसह साजरे करण्याची संकल्पना पुढे आली. या संकल्पनेला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तब्बल ३८ जणांचा उत्साही ताफा या आनंदसोहळ्यासाठी सज्ज झाला.
सकाळी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात सहलीला सुरुवात
सकाळी आठ वाजता वारजे येथील आयडीबीआय बँकेच्या गेटसमोर सर्व सदस्य एकत्र जमले. खास एकसारखी वेशभूषा परिधान करून ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात सात गाड्यांमधून भूगावच्या दिशेने प्रवासाला सुरुवात झाली. वारजेपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या निसर्गरम्य ‘निसर्गछाया’ येथे पोहोचताच प्रसन्न वातावरणाने सर्वांचे मन प्रसन्न झाले.
गरमागरम पोहे, चहा-कॉफीचा नाश्ता झाल्यानंतर आनंदोत्सवाला सुरुवात झाली. पुरुषांचे स्वतंत्र नृत्य, महिलांचे नृत्य आणि त्यानंतर ‘माऊली माऊली’ या गाण्यावर सर्व ३८ सदस्यांनी एकत्र धरलेला ठेका हा विशेष आकर्षण ठरला.
फुगड्या, संगीत खुर्ची अन् विटी-दांडूने जाग्या झाल्या बालपणीच्या आठवणी
संगीताच्या तालावर फुगड्या खेळताना आणि संगीत खुर्चीच्या खेळात सहभागी होताना सदस्यांनी वयाचे भानच विसरले. विशेष म्हणजे आजच्या डिजिटल युगात जवळपास विस्मरणात गेलेल्या विटी-दांडू या पारंपरिक खेळाने उपस्थितांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.
कॅरम, टेबल टेनिस, बुद्धिबळ, पत्ते आणि हौझी अशा विविध खेळांमध्येही सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेक वर्षांनंतर बालपणीचा खेळ हातात घेतल्याने ज्येष्ठ सदस्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहण्यासारखा होता.
सहा वाढदिवसांचा एकत्रित सोहळा; केक कापून दिल्या शुभेच्छा
या आनंदसोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते सहा सदस्यांचा सामूहिक वाढदिवस. श्री. संतोषकुमार दोशी, श्री. काशिनाथ हिरेमठ, श्री. संजय वनारसे, श्री. सुधीर गलांडे, श्री. अजित ओस्तवाल आणि श्री. हेमंत सातपुते या सहाही उत्सवमूर्तींचा त्यांच्या सौभाग्यवतींसह केक कापून आणि गाण्यांच्या गजरात वाढदिवस साजरा करण्यात आला. टाळ्यांचा कडकडाट आणि शुभेच्छांच्या वर्षावात हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
अस्सल शाकाहारी भोजनाचा घेतला मनमुराद आस्वाद
दुपारच्या भोजनामध्ये फुलके, टोमॅटोचे सार, बटाटा-मटार भाजी, बिरड्याची उसळ, गुलाबजाम, पुलाव-तूप, मीठ, लिंबू आणि पापड अशा स्वादिष्ट शाकाहारी पदार्थांची मेजवानी होती. उत्तम चव आणि सुंदर व्यवस्थेमुळे सर्व सदस्यांनी भोजनाचा मनमुराद आस्वाद घेतला.
भोजनानंतर काही काळ निवांत गप्पांचे सत्र रंगले. निवृत्त बँकर्स असलेल्या सदस्यांनी बँकेतील जुन्या आठवणी, ग्राहकांचे किस्से, अध्यात्म आणि स्वामी समर्थांच्या महत्त्वावर चर्चा केली. महिला सदस्यांनी गप्पांसोबतच गाण्यांच्या अंताक्षरीचा रंगतदार फडही रंगवला.
वडापाव-चहासोबत पुन्हा सुरू झाला हास्याचा फड
संध्याकाळी पाच वाजता गरमागरम अमर्यादित वडापाव आणि चहाचा आस्वाद घेतल्यानंतर लॉनवर विविध वैयक्तिक आणि सामूहिक खेळांचे आयोजन करण्यात आले. रिंग पास करणे, शारीरिक खुणांवरून शब्द ओळखणे अशा खेळांमध्ये सदस्य इतके रंगून गेले की काही सदस्य हसता-हसता लॉनवर घसरून पडले आणि त्यानंतर उपस्थितांमध्ये हास्याचा एकच फवारा उडाला.
‘निसर्गछाया’ उपक्रमाचेही सदस्यांकडून कौतुक
कोथरूडचे आमदार व मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि सौ. अमृता देवगावकर यांच्या प्रयत्नातून साकारलेला ‘निसर्गछाया’ हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सदस्यांनी सांगितले. सुरक्षित, निसर्गरम्य आणि वाजवी दरात एक दिवस आनंदात घालवण्यासाठी पुण्याजवळ असे ठिकाण उपलब्ध करून दिल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
दिवसभराच्या आनंदाला वरुणराजानेही हलक्या सरींची साथ दिली. त्यामुळे या अविस्मरणीय दिवसाची सांगता आणखी रम्य झाली.
“आयुष्यात अनेक वाढदिवस साजरे केले; मात्र मित्रांसोबत आणि पत्नीसोबत असा मनमुराद आनंद, हास्य आणि धिंगाणा पहिल्यांदाच अनुभवला,” अशी भावना सहाही वाढदिवसाच्या उत्सवमूर्तींनी व्यक्त केली.
आयुष्याच्या उत्तरार्धातही मैत्रीचा उत्सव जिवंत ठेवण्याचा संदेश
या संपूर्ण आयोजनाचे श्रेय ग्रुप ॲडमिन श्री. संतोषकुमार दोशी, श्री. चंद्रकांत सोमण तसेच संयोजक आप्पा उर्फ श्री. चंद्रशेखर लंगडे यांना देत सर्व सदस्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुक केले.
फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून या दिवसाच्या सुवर्ण आठवणी मोबाईलमध्ये साठवत सर्व सदस्य पुढील भेटीच्या उत्सुकतेने पुण्याच्या दिशेने रवाना झाले.
‘वय वाढतं, पण मन कधीच म्हातारं होत नाही’, याचा जिवंत प्रत्यय देणारा हा ‘आपुलकी ग्रुप’चा सोहळा ठरला. आजच्या मोबाईल आणि धावपळीच्या युगात मित्रमैत्रिणी, कुटुंबीय आणि आप्तेष्टांसोबत वेळ घालवून आनंद साजरा करण्याचा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून समाजाला मिळाला.
फोटो ओळ : भूगाव येथील ‘निसर्गछाया’ येथे आयोजित ‘आपुलकी ग्रुप’च्या वाढदिवस सोहळ्यात सहभागी झालेले ३८ ज्येष्ठ सदस्य.




